You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फेसबूकवर मैत्री, प्रेम अन् लग्न; 10 वर्षांनी एका फोन कॉलमुळं पोलीस घरी पोहोचले अन् सगळंच बदललं
- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
'प्रेमाला सीमा नसते', असं म्हटलं जातं. परंतु, गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील लांभवेल गावात राहणाऱ्या तरुण पटेल यांच्या आयुष्यात मात्र ही सीमाच सर्वात मोठा अडथळा ठरली आहे.
बांगलादेशातील एका महिलेशी लग्न करून संसार थाटणारे तरुण आता आपल्या कुटुंबाची ताटातुट होऊ नये म्हणून धडपड करत आहेत.
साधारण 10 वर्षांपूर्वी सीमापार झालेला हा विवाह आता या कुटुंबासाठी कायदेशीर अडचणीचं कारण ठरलं आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशी महिला भारतात अवैधरित्या राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.
त्यानंतर आता तिच्यावर मायदेशी पाठवण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
गुजरात पोलिसांच्या 'ऑपरेशन डेल्टा हंट' सुरू व्हायच्या आधीपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं. परंतु, या मोहिमेमुळे त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य अचानकच बदलून गेलं.
आता आपल्या मुलांना आईपासून दूर जावं लागू नये, हेच तरुण यांचं एकमेव उद्दिष्ट आहे.
'एक फोन आणि...'
2 जूनचा तो दिवस तरुण आजही विसरू शकलेले नाहीत. त्यादिवशी पोलीस त्यांच्या घरी आले होते. एका साध्या फोन कॉलमुळे हा संपूर्ण प्रकार घडला होता.
ते सांगतात, "काजलची आई बांगलादेशात राहते. तिथल्या अस्थिर परिस्थितीमुळे तिला तिच्या आईची खूप काळजी वाटत होती. त्यामुळे तिने आईची विचारपूस करण्यासाठी एक फोन केला. त्या फोन कॉलचा माग (ट्र्रेस) काढण्यात आला आणि त्यानंतर पोलीस थेट आमच्या घरीच आले."
तरुण म्हणाले की, "पोलिसांनी त्यांचा फोन तपासला. त्यात 'काजल्स मॉम' नावाने सेव्ह केलेला नंबर दिसला. त्यांनी हा नंबर कुणाचा आहे, अशी विचारणा केली."
"मी माझी पत्नी बांगलादेशची असल्याचं आणि हा फोन तिच्या आईला केल्याचं सांगितलं. त्यानंतर काजलची चौकशी झाली, तिला पोलीस ठाण्यात नेलं आणि ताब्यात घेतलं."
पोलिसांचं म्हणणं होतं की, त्यांच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रं नाहीत. पासपोर्ट नाही आणि विवाहाच्या नोंदणीचा कोणता पुरावाही नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.
काजल बांगलादेशातील तिच्या कुटुंबाशी नियमित संपर्कात होती का?
यावर उत्तर देताना तरुण पटेल म्हणाले, "काजल अधूनमधून तिच्या आईशी बोलायची. पोलिसांनी ज्या फोन कॉलचा माग काढला तो फोन तिच्या आईच्या शस्त्रक्रियेच्या वेळी केला होता. त्यावेळी बांगलादेशातील परिस्थितीही अस्थिर होती आणि तिची आईही आजारी होती. त्यामुळे काजल खूप चिंतेत होती."
"ती रडू लागली आणि मला म्हणाली की तिला तिच्या आईशी बोलायचं आहे. त्यामुळे मी माझ्या मोबाइलवरून तिच्यासाठी आंतरराष्ट्रीय (आयएसडी) कॉल लावला. त्या संपूर्ण संभाषणात तिने फक्त एवढंच विचारलं, 'आई, तू कशी आहेस? तुझी तब्येत कशी आहे? काही गंभीर गोष्ट तर नाही ना?'"
"बस, इतकंच. तो एकच फोन कॉल ट्रेस केला गेला. तिने कधीही चुकीच्या ठिकाणी फोन केलेला नाही."
आनंदचे पोलीस अधीक्षक जीजी जसानी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "काजल गुजरातमध्ये बेकायदेशीरपणे राहत असल्याचं दिसून आलं आहे.
ती बांगलादेशातून गुजरातमध्ये आली तेव्हा तिच्याकडे ना पासपोर्ट होता, ना विवाह नोंदणीचा कोणताही पुरावा होता."
'फेसबुकवरील मैत्री ते लग्नाचा प्रवास'
2012 मध्ये बांगलादेशातील गोपालपूर गावात राहणाऱ्या 'काजुली'ची फेसबुकवर तरुणशी ओळख झाली. या ओळखीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तरुण यांनी तिला पासपोर्ट काढून गुजरातला यायला सांगितलं. परंतु, तिचे कुटुंबीय तिच्यावर बांगलादेशातीलच युवकाशी लग्न करण्यासाठी दबाव आणत होते.
पासपोर्ट बनवण्यासाठी काजुलीने एका एजंटला 12 ते 13 हजार रुपये दिले. पण त्या एजंटने तिची फसवणूक केली.
कुटुंबीयांच्या दबावामुळे काजुली बांगलादेशातून पळून आधी कोलकाता येथे आली. त्यानंतर ती आनंदला गेली. तिथे तरुण आणि काजुली यांनी लग्न केलं. लग्नानंतर काजुलीने आपलं नाव बदलून 'काजल' असं केलं.
पण, आवश्यक कागदपत्रं नसल्यामुळे त्यांच्या विवाहाची कायदेशीर नोंदणी होऊ शकली नाही.
तरुण म्हणाले, "पुढे जाऊन ही गोष्ट इतकी मोठी अडचणीची ठरेल, असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. त्या परिस्थितीत तिला कोणतीही कागदपत्रं आणता आली नव्हती."
मूळची मुस्लिम असलेल्या काजलने लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारला. आता तिला बांगलादेशात परत पाठवलं तर तिचं कुटुंब तिला स्वीकारणार नाही, अशी भीती तरुण यांना वाटते.
कुटुंबाला मोठा धक्का
काजलला ताब्यात घेतल्यापासून तरुण आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठ्या धक्का बसला आहे. सध्या काजलला आनंद येथील महिला संरक्षणगृहात ठेवण्यात आलं आहे.
तरुण म्हणाले, "माझी मुलं रोज रडतात आणि आई कधी परत येणार, असा प्रश्न सतत विचारतात. माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. काजलला बांगलादेशात पाठवलं, तर आमचं कुटुंब पूर्णपणे विस्कळीत होईल."
काजलच्या सासू इंदुबेन पटेल म्हणाल्या, "काजल गेल्यापासून आमच्यापैकी कोणालाही नीट जेवण जात नाहीये. मुलं सतत रडत आहेत. काजल माझ्यासाठी फक्त सून नव्हती, ती माझ्या मुलीसारखीच होती."
"जे झालं ते चुकीचं झालं. काजल गेल्यापासून घरात कोणालाच नीट जेवणही जात नाही. मुलं सतत रडत आहेत. त्यांची अवस्था पाहिली की, माझ्याही डोळ्यांत अश्रू येतात.
काजलशिवाय संपूर्ण घर रिकामं झाल्यासारखं वाटतं. ती पुन्हा घरी परत यावी, इतकीच मी प्रार्थना करते."
बीबीसी गुजरातीशी बोलताना जागृती महिला संघटनेच्या अध्यक्षा आशा दलाल म्हणाल्या, "काजल सतत मानसिक तणावाखाली आहे. ती सतत रडते. तिला नेहमी तिच्या कुटुंबाची, विशेषतः तिच्या दोन्ही मुलांची खूप आठवण येते. तिला सर्वात जास्त भीती ही वाटते की, जर तिला बांगलादेशात पाठवलं, तर कदाचित ती पुन्हा कधीच भारतात परत येऊ शकणार नाही."
"अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्यानंतर, आम्ही कधी-कधी तिला दूरून तिच्या मुलांना पाहू देतो. त्यामुळे तिला थोडासा दिलासा मिळतो."
"परंतु, ती अजूनही खूप दुःखी असते. आम्ही तिला सतत समजावण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तीही शेवटी एक माणूसच आहे. अनेकवेळा तिला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं."
आशा दलाल म्हणाल्या, "निवारा केंद्रात काजल सर्वांशी मिळून-मिसळून राहते. ती इतरांनाही मदत करते. सध्या आम्ही काजलची पूर्ण काळजी घेत आहोत. पुढील कारवाई सरकार आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार केली जाईल."
कायदेशीर लढाई सुरू
कोणत्याही परिस्थितीत काजलला बांगलादेशात परत पाठवलं जाण्यापासून रोखणं, हेच सध्या तरुण यांच्यासमोरील सर्वात मोठं उद्दिष्ट आहे.
यासाठी ते सर्वच स्तरांवर प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.
बीबीसी गुजरातीशी बोलताना त्यांच्या वकील झैनब सैयद म्हणाल्या की, "काजलला भारतीय नागरिकत्व मिळावं, यासाठी आम्ही न्यायालयात संविधानातील तरतुदींचा आधार घेणार आहोत. संविधानातील कलम 21 प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो."
"हा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच नाही, तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. त्यामुळे हे सर्व मुद्दे आम्ही न्यायालयासमोर मांडणार आहोत."
झैनब पुढे म्हणाल्या, "एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकाशी लग्न केलं आणि अनेक वर्षे त्याच्यासोबत भारतात वास्तव्य केलं, तर परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन ती व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरू शकते."
"काजलला बांगलादेशात परत पाठवलं जाऊ नये आणि तिला भारताचं नागरिकत्व मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न असतील."
तरुण यांनी आनंदचे खासदार मितेश पटेल यांच्याकडेही मदतीची मदत मागितली आहे.
"जेव्हा मी दिल्लीला जाईन, तेव्हा हे प्रकरण मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर ठेवेन," असं खासदार पटेल यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं.
ऑपरेशन डेल्टा हंट
गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार, "गुजरातची अंतर्गत सुरक्षा, शांतता आणि सुरक्षित वातावरण कायम ठेवण्यासाठी" पोलिसांनी 'ऑपरेशन डेल्टा हंट' नावाची विशेष मोहीम सुरू केली आहे.
जून 2026च्या पहिल्या आठवड्यात 362 'बेकायदेशीर बांगलादेशी' नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 103 पुरुष, 188 महिला आणि 71 मुलांचा समावेश होता.
त्याशिवाय 782 हून अधिक 'संशयित बांगलादेशी' नागरिकांची चौकशी करण्यात आली.
गुजरात सरकारच्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, तंत्रज्ञान आणि गुप्त माहितीच्या मदतीने पोलिसांच्या पथकांनी या लोकांना बनावट कागदपत्रं दिल्याचा आरोप असलेल्या स्थानिक एजंट आणि त्यांच्या साथीदारांचाही तपास सुरू केला आहे.
यापूर्वीही गुजरातमध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
अहमदाबादमधील चंडोला तलाव परिसरात पोलिसांनी 'मेगा डिमॉलिशन' म्हणजे मोठ्या प्रमाणात बांधकामाचं पाडकाम करण्याची कारवाईही केली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.