50 हून अधिक देश, 9000 फोटो; 'वर्ल्ड फूड फोटोग्राफी अवॉर्ड्स 2026'मधील 10 विजेते फोटो पाहा

    • Author, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मानवी जीवनाला आणि संस्कृतीला अन्न हे कशा प्रकारे आकार देते याचा एक अद्भूत प्रवास या वर्षाच्या 'वर्ल्ड फूड फोटोग्राफी अवॉर्ड्स'मध्ये पाहायला मिळतो.

सोव्हिएत काळातील ऐतिहासिक आरोग्य केंद्रांपासून ते बांगलादेशातील गजबजलेल्या बाजारपेठांपर्यंतचे कॅमेऱ्यात टिपलेले हे अनोखे छायाचित्र हेच सिद्ध करतात की, अन्न हे जागतिक जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे.

'टेंडरस्टेम® बिमी® ब्रोकोलिनी'द्वारे प्रायोजित 2026 च्या या स्पर्धेमध्ये 50 हून अधिक देशांमधून तब्बल 9,000 छायाचित्रे आली.

यामध्ये शेतातील पिकांची कापणी, बाजारपेठा, कौटुंबिक स्वयंपाकघर, स्ट्रीट फूड, सण-उत्सव आणि जगण्याचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता.

जगभरातील फूड फोटोग्राफर्सनी केवळ एका क्लिकवर अन्नसंस्कृतीचे एक जागतिक चित्र तयार केले ज्यातून लोक काय खातात एवढंच नाही तर अन्न त्यांच्या दैनंदिन जीवनात कसं-कुठून येतं हे दिसून येतं.

या वर्षातील काही अत्यंत प्रभावी आणि विजेत्या ठरलेल्या छायाचित्रांवर टाकलेली एक नजर:

स्पर्धेतील सर्वसाधारण विजेता

'वर्ल्ड फूड फोटोग्राफी अवॉर्ड्स'मध्ये ब्रिटीश फोटोग्राफर जो कर्नी यांच्या फोटोने बाजी मारली. त्या फोटोत ताजिकिस्तानमधील सोव्हिएत काळातील एका सॅनिटोरियमच्या (आरोग्य केंद्र) कॅन्टीनमधील एक एकाकी, संथ क्षण अचूक टिपला आहे.

फूड फोटोग्राफी म्हणजे फक्त जिभेला पाणी सुटणारे फोटो काढणे नव्हे, तर त्यातून एखाद्या जागेची ओळख आणि जुन्या आठवणीही जाग्या करता येतात हेच या फोटोतून दिसते.

ताजिकिस्तानच्या डोंगराळ भागात असलेल्या 'खोजा ओबी गार्म' या ठिकाणी लोक आजही उपचारांच्या मधल्या वेळात साधे आणि पोटभर जेवण करण्यासाठी एकत्र येतात.

रेडॉन वायूने समृद्ध असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यावर बांधलेले हे अवाढव्य काँक्रीटचे 'हेल्थ हॉटेल' एकेकाळी कामगारांना वर्षातून 2 आठवड्यांची विश्रांती देण्यासाठी वापरले जायचे.

आजही इथला कमी खर्च पाहता स्थानिक लोक, शेजारच्या देशांमधील पर्यटक आणि पाठीवर पिशवी टाकून फिरणारे हौशी 'बॅकपॅकर्स' इथे आवर्जून येतात.

फूड फॉर सेलिब्रेशन श्रेणी विजेता : पिंगयाओ सॉन्ग, चीन

चीनमधील एका 'हॉटपॉट' महोत्सवात शेकडो खवय्ये एका अवाढव्य सामूहिक मेजवानीसाठी एकत्र जमले आहेत.

मिरची, सिचुआन मिरी, आंबवलेली सोयाबीन पेस्ट, बीफ टॅलो आणि विविध मसाल्यांनी समृद्ध असलेला तो लाल रंगाचा रस्सा केवळ एक जेवण न राहता एक नयनरम्य सोहळा बनला आहे.

जिथे आलेले पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत त्याचे व्हीडिओ बनवण्यात आणि या मेजवानीचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात मग्न आहेत.

क्रीम ऑफ द क्रॉप श्रेणी विजेता : अल्बर्ट गोन्झालेझ, स्पेन

जपानमधल्या क्योटो भागातल्या 'इने' नावाच्या कोळीवाड्यात 'हिमोनो' (Himono) या पारंपारिक पद्धतीचा वापर करून स्क्विड मासे उन्हात सुकवले जात आहेत.

मासे आणि इतर सागरी अन्न टिकवून ठेवण्याच्या या पद्धतीमध्ये मीठ, हवा आणि ठराविक वेळ यांच्या प्रक्रियेतून एक वेगळीच चव तयार होते.

ही पद्धत या गावातील खाद्यपरंपरेला त्या समुद्राशी जोडून ठेवते ज्यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून आहे.

'ब्रिंग होम द हार्वेस्ट' श्रेणीतील विजेता : मार्को रुटेन, नेदरलँड्स

कोलकाता येथील हावडा ब्रिजखाली सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात मासेमाऱ्यांचा एक लहानसा गट हुगळी नदीतून आपली जाळी ओढताना दिसत आहे.

त्यांनी पकडलेले मासे जवळच्या बाजारपेठेत विकले जातील आणि त्याच सकाळी बंगाली घरांमध्ये शिजवले जातील.

शहरातल्या सर्वात जास्त रहदारी आणि गर्दी असलेल्या पुलाखाली किती शांतपणे ही मासेमारी चालते हेच या सुंदर फोटोत दाखवलं आहे.

स्ट्रीट फूड श्रेणी विजेता : कारा बेयर्ड, ऑस्ट्रेलिया

क्योटो येथील 'निशिकी मार्केट'मधील खरेदीदारांची गर्दी, गरम वाफा, उष्णता आणि गजबजाट यांमधील एक क्षण या छायाचित्रात हुबेहूब जिवंत झाला आहे .

'क्योटोचे स्वयंपाकघर' म्हणून ओळखले जाणारे हे मार्केट बऱ्याच काळापासून शहरातील खाद्यपदार्थांचे मुख्य केंद्र राहिले आहे.

अरुंद गल्ल्यांमध्ये थाटलेली स्ट्रीट स्नॅक्स, लोणची, सी-फूड आणि मिठाईची दुकाने. बाजारपेठेतील सर्वात जास्त गर्दीच्या वेळेची लगबग आणि उत्साह या फोटोने एकाच क्षणात अचूक टिपला आहे.

'वाईन फोटोग्राफर ऑफ द इयर' श्रेणीतील विजेता - हुआन मिगुएल ओर्तुन्यो मार्टिनेझ, स्पेन

जमिनीखालील एका वाईन टँकच्या आत एक कामगार 'प्रेशर वॉटर'चा वापर करून आधीच्या साठवलेल्या वाईनचे उरलेले डाग स्वच्छ करत आहे.

टँकच्या भिंती आणि फरशी स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा जोडीदार सर्वात खालच्या कोपऱ्यात शिल्लक राहिलेले पाणी गोळा करण्यासाठी आत स्पंज असलेली एक लहान बादली दोरीने खाली सोडतो.

हातामध्ये वाईनचा ग्लास घेऊन जग रोमँटिक वाटतं. त्या वाईन निर्मितीच्या पडद्यामागे किती छुपे कष्ट आणि मेहनत असते हेच हा फोटो दाखवून देतो.

फूड फॉर द फॅमिली श्रेणी विजेता : मिकाएला बाल्बोनी आणि फेडेरिको बोरेला, इटली

उझबेकिस्तानमधील समरकंद येथे एक लहान मूल आपल्या घरच्या तंदूरमधून नुकत्याच काढलेल्या गरमागरम 'नान' ब्रेडकडे हात पुढे करत आहे.

हा ब्रेड मध्यभागी जाड, गोल आणि कडांनी छान कुरकुरीत असतो. त्याच्या अगदी मधोमध काळे तीळ सजवलेले असतात.

हा 'समरकंद नान' केवळ तिथला सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ नाही, तर तो तिथल्या संस्कृतीचा आणि आस्थेचा एक गरमागरम तुकडा आहे जे हा फोटो अतिशय सुंदरपणे मांडतो.

जेमी ऑलिव्हर युथ प्राईझ श्रेणी विजेता : इंडिगो लारमूर

पश्चिम बंगालमधील छठ पूजेचा हा एक विलोभनीय आणि भक्तिमय देखावा आहे जिथे भाविक पवित्र पाण्यात उभे राहून अथांग श्रद्धेने सूर्यदेवाला नैवेद्य अर्पण करत आहेत.

प्रामुख्याने महिलांच्या असीम निष्ठेने सजणाऱ्या या महाउत्सवाच्या मुळाशी निसर्गाविषयीची कृतज्ञता, आत्मिक पवित्रता आणि दृढ भक्तीचा एक अलौकिक संगम पाहायला मिळतो.

फूड फॉर सेल श्रेणी विजेता : काझी मोहम्मद गोलाम कुद्दुस, बांगलादेश

बांगलादेशातील बोगराच्या भाजीबाजारातील पहाटेची ही एक लगबग.

शेतकरी आपल्या शेतातून नुकताच काढलेला ताजा, टवटवीत कोबी रिक्षा गाड्यांमध्ये भरून मोठ्या आशेने बाजारात आणत आहेत.

तिथून पुढे व्यापारी हा माल घाऊक दराने विकत घेतात आणि मग हाच ताजा शेतमाल ढाकासह देशातील इतर मोठ्या शहरांमधील बाजारपेठांकडे रवाना केला जातो.

द फिलिप हार्बेन अवॉर्ड फॉर फूड इन ॲक्शन विजेता : लेहोझकी बालाझ

हंगेरीचे फोटोग्राफर लेहोझकी बालाझ यांना आपल्या आजी-आजोबांचा एक असा फोटो काढायची खूप वर्षांपासून इच्छा होती.

पण आपण त्यांचा इतका सुंदर फोटो काढू शकू का अशी शंका त्यांना वाटत होती.

शेवटी आजी खास हेअरस्टाईल करून आली आणि आजोबांनीही छान दाढी केली, तेव्हा कुठे लेहोझकी यांनी स्वयंपाकघरातच आपला कॅमेरा आणि स्टुडिओचे लाईट्स सेट केले.

जेव्हा आजीने तो सुंदर फोटो पाहिला तेव्हा तिने आपल्या नातवाला कौतुकाने 'एक खरा कलाकार' म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)