You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई-पुणे मुसळधार पाऊस : कुठे घर कोसळलं, तर कुठे घरावर दरड; राज्याची स्थिती पाहा 'या' फोटोतून
महाराष्ट्रात सलग सहाव्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. मुंबई-पुण्यासह कोकणपट्ट्यात पावसाना अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक सेक्शनवर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतूक प्रभावित झाली आहे, तर रत्नागिरीत कशेडी घाटात दरड कोसळून रस्त्यावर आल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झालाय.
नागरिकांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावं आणि काळजी घ्यावी, असं आवाहन राज्य सरकारकडून आणि स्थानिक प्रशासनांकडून केलं जात आहे.
राज्यात पावसामुळे घडलेल्या घटनांचा फोटोंच्या माध्यमातून आढावा घेऊया.
मुंबईतील मानखुर्द येथे जनता नगरच्या 3 मजली चाळीचा काही भाग कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 जण जखमी आहे.
ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदतकार्यही सुरू आहे. याबाबत एएनआय आणि आयएएनएस या वृत्तसंस्थांनी वृत्त दिलं आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयानेही याबाबत मध्यरात्री माहिती देताना म्हटलं की, मानखुर्दमध्ये घर कोसळून 5 बालकांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रत्नागिरी कशेडी येथील महामार्गावरील दरड काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गावरील खवटी परिसरातील कृष्णा बाबू जाधव यांच्या घराजवळ ही दरड आल्याने त्यांच्या घराला मोठा धोका निर्माण झाला आहे.
संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलत जाधव यांच्या घरातील तीन व्यक्तींना त्वरित सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. सद्यस्थितीत महामार्गावरील दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील टनेल क्र. 40 (BB EMD) येथे दरड कोसळली आहे. दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या रद्द तसेच वळविण्यात आल्या आहेत.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्टेटस तपासूनच प्रवास करावा, असं आवाहन करण्यात आलंय.
पुणे परिसरातील घोरावाडी रेल्वे स्टेशनजवळ 37 प्रवासी असलेली बस अडकली होती.
NDRF च्या टीमने त्यांची सुरक्षित सुटका केली.
रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे शहराजवळील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागलीय. नदीचं पाणी शहरात शिरल्यानं सर्वत्र अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
रोहा बस स्थानक, बाजारपेठेसह अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं लोकांची तारांबळ उडालीय.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यानं रोहा शहरालगच्या कुंडलिका नदीच्या पात्राने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
तसंच, रायगड जिल्ह्यात हवामान विभागाने 6 आणि 7 जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलीय. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, धबधबे व पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
लोणावळा येथील हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पीएमआरडीएच्या पीडीआरएफ (PDRF) पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणी व आवश्यक मदतकार्य सुरू केले आहे.
परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यातील वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे,काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, चिकुर्डे, मांगले येथील वारणा नदीवरील छोटा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तर ऐतवडे खुर्द येथील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा वारणा नदीवरील मुख्य पुलाला पाणी अगदी घासून वाहत आहे,त्याच बरोबर
वारणा नदी काठच्या शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात या शेती पिकाला मोठा फटका बसला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)