अमेरिकेत चालवलं जायचं चीनचं गुप्त 'पोलीस स्टेशन', FBIने कसं आणलं उघडकीस?

लू जियानवांग

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लू जियानवांग यांनी 2022 च्या सुरुवातीला मॅनहॅटनच्या चायना टाऊन भागात चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयासाठी (एमपीएस) हे पोलीस स्टेशन सुरू केल्याचं आढळून आलं.
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

चीन सरकारसाठी अमेरिकेत गुप्त 'पोलीस स्टेशन' चालवण्यात मदत केल्याप्रकरणी अमेरिकेतल्या एका नागरिकाला दोषी ठरवण्यात आलं आहे. अमेरिकेत उघड झालेलं अशा प्रकारचं हे पहिलंच गुप्त चिनी 'पोलीस स्टेशन' मानलं जात आहे.

लू जियानवांग असं दोषी ठरलेल्या व्यक्तीचं नाव आहे. 64 वर्षीय जियानवांग यांनी 2022 च्या सुरुवातीला मॅनहॅटनच्या चायना टाऊन भागात चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयासाठी (एमपीएस) हे पोलीस स्टेशन सुरू केलं असल्याचं न्यायालयाला आढळून आलं आहे.

चीन सरकारचा बेकायदेशीर एजंट म्हणून काम केल्याप्रकरणी आणि संबंधित पुरावे नष्ट करून तपासात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आहे.

याच आठवड्यात कॅलिफोर्नियातील महापौरांनी चीनसाठी बेकायदेशीर एजंट म्हणून काम केल्याच्या आरोपांनंतर राजीनामा दिला. नेमकी त्याचवेळी 'पोलीस स्टेशन' प्रकरणात शिक्षाही झाली आहे.

न्यूयॉर्कच्या फेडरल न्यायालयात आठवडाभर चाललेल्या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

चीनच्या राजकीय उद्दिष्टांसाठी वापर

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या जियानवांग उर्फ हॅरी लू याला 30 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे असं सरकारी वकिलांनी सांगितलं.

या प्रकरणातील त्याचा सह-आरोपी चेन जिनपिंग याने डिसेंबर 2024 मध्ये परदेशातील पोलीस स्टेशनच्या संबंधात पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनासाठी (पीआरसी) एजंट म्हणून काम करण्याचा कट रचल्याची कबुली दिली होती. त्याची शिक्षा जाहीर करण्यात आली नाहीये.

"लू जियानवांगने न्यूयॉर्कमधील या पोलीस स्टेशनचा वापर चीन सरकारच्या राजकीय उद्दिष्टांसाठी, चीनविरोधी लोकांना लक्ष्य करण्यासाठी केला होता," अशी माहिती एफबीआयचे वरिष्ठ अधिकारी जेम्स सी बार्नेकल ज्युनियर यांनी दिली.

मानवाधिकार संघटनांच्या मते, जगातील 53 देशांमध्ये अशा प्रकारच्या किमान 100 गुप्त चिनी पोलीस स्टेशनची माहिती समोर आली आहे.

या पोलीस स्टेशनचा वापर परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना धमकावण्यासाठी आणि अमेरिकेत राहणाऱ्या लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांची माहिती मिळवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप आहे.

'पोलीस स्टेशन नाही सेवा केंद्र'

अशा प्रकारच्या 'आउटपोस्टस' या पोलीस स्टेशन असल्याचा आरोप चीनने फेटाळला आहे. चीनच्या मते, या आउटपोस्ट म्हणजे, परदेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांना मदत करणारी 'सेवा किंवा सुविधा केंद्रं' आहेत. कोव्हिड काळातील मदत आणि ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासारख्या सेवा तिथे दिल्या जात होत्या.

न्यूयॉर्कच्या चायनाटाउन भागात एका दुकानाच्या वरच्या पूर्ण मजल्यावर या स्टेशनचं काम चालत होतं. एफबीआयने तपास सुरू केल्यानंतर 2022 च्या अखेरीस ते बंद करण्यात आलं.

तपास सुरू झाल्याचं समजताच चेन आणि लू जियानवांग यांनी चीनच्या एमपीएस अधिकाऱ्यासोबत केलेले मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)