राज्यात उष्ण हवामान असतानाच पावसाची हजेरी, पुढील दोन-तीन दिवस असं असेल हवामान

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जाह्नवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्रात उष्ण हवामान कायम असतानाच, गेल्या 24 तासांत काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावून गेला आहे.

सांगलीतल्या जत तालुक्यात तर खलाटी गावात वादळानं एका घराची भिंत कोसळून एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर मिरज तालुक्यातही अनेक घरांचे आणि पशूधनाचे नुकसान झालं आहे, अशी माहिती जत तालुक्यातील कुणीकोणुर गावचे माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात वादळी वारा आला.

फोटो स्रोत, Sarfaraj Sanadi

फोटो कॅप्शन, सांगली जिल्ह्यात वादळी वारा आला.

पुढच्या दोन तीन दिवसांतही राज्यातल्या दक्षिणेकडेच्या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो.

तर विदर्भ आणि मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे या आठवडा अखेर अंदमानात मान्सूनचं आगमन होऊ शकतं.

भारतीय हवामान विभागानं त्याविषयी काय म्हटलं आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे, जाणून घेऊयात.

'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट

14 मे रोजी दुपारच्या सॅटेलाईट दृश्यांमध्ये महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी दाट ढग जमा झालेले दिसत आहेत.

या परिसरात पुढच्या एक दोन दिवसांत सोसाट्याचा वारा, विजा आणि गडगडाटासह पावसाचीही शक्यता आहे.

राज्याच्या अंतर्गत भागात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र उष्णतेचा कहर कायम आहे.

इथे अनेक ठिकाणी तापमान 42 ते 45 अंश सेल्सियसच्या आसपास आहे आणि पुढचे काही दिवस ते असं वरंच राहण्याची शक्यता आहे.

14 मे रोजीचं उपग्रहानं टिपलेलं दृश्यं

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, 14 मे रोजीचं उपग्रहानं टिपलेलं दृश्यं

14 मे च्या रात्रीसाठीही अकोला, अमरावती, वर्धा, नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसाठी तर सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

15 मे रोजी पालघर, ठाणे, रायगड, अकोला, अमरावती, वर्धा, संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोलीमध्ये उष्णतेसाठी आणि नांदेड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे.

आठवडाअखेर मान्सूनचं आगमन

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात आता नैऋत्येकडून वारे वाहू लागले आहेत. निकोबार बेटांच्या आसपास मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सोळा मे पर्यंत इथे मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनचं आगमन होऊ शकतं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

फोटो स्रोत, IMD

एखाद्या ठिकाणी वाऱ्यांची दिशा, दोन तीन दिवसांतल पावसाचं प्रमाण आणि तापमान याचा विचार करून तिथे मान्सूनचं आगमन झाल्याचं हवामान विभाग जाहीर करत असतो.

अंदमानमध्ये हे निकष 16 मेपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे.

पुढचे चार आठवडे हवामान कसं असेल?

दर गुरुवारी भारतीय हवामान विभाग पुढच्या चार आठवड्यांसाठीचा अंदाज जाहीर करतं.

यावेळेसच्या अंदाजानुसार 15 ते 21 मे आणि 22 ते 28 मे या दोन आठवड्यांत विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमान 42 अंश सेल्सियसच्या आसपास राहिल. तर त्यानंतरच्या दोन आठवड्यांत तापमानात घट अपेक्षित आहे.

कसा असेल चार आठवड्यांसाठी मान्सूनचा अंदाज

फोटो स्रोत, IMD

पुढच्या चार आठवड्यांत दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाच्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे.

22 ते 28 मे दरम्यान राज्याच्या सर्वच भागांत पावसाला सुरुवात होईल. त्यानंतरच्या दोन्ही आठवड्यांतही विशेषतः कोकणात पावसाची शक्यता आहे,

हवामानाविषयीचे ताजे अपडेट्स आणि मान्सूनविषयीची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीला फॉलो करत राहा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)