पवनराजे निंबाळकर हत्या : आरोपी गैरहजर राहिल्यानं निकाल लांबणीवर; जाणून या हत्याकांडाबद्दल

पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा खटला कुठवर आला आहे?.
    • Author, अल्पेश करकरे आणि मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर पडला आहे. वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली आहे.

येत्या 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार आहे.

आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितल्याने निकाल पुढे ढकलला गेला.

कोर्टाने विनंती मान्य करत 16 जूनला निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले.

सर्व आरोपींना 16 जूनला कोर्टात हजर राहण्याचे न्यायाधीश एस नविंदर यांनी दिले आदेश दिले.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा 20 वर्षांनी निकाल येणार असून त्यामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत.

माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. पवनराजे निंबाळकरांची हत्या राजकीय वादातून झाल्याचा CBI चा दावा केला होता.

पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्याने ही हत्या झाल्याचं CBI ने आरोपपत्रात म्हटलंय. या प्रकरणी CBI ने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली होती. पद्मसिंह पाटील सध्या जामिनावर बाहेर आहेत.

पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, "पद्मसिंह पाटील यांना या प्रकरणी खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलंय. खटला सुरू असल्याने यावर अधिक काही बोलता येणार नाही."

सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून 2013 मध्ये निंबाळकर खून खटला अलिबागहून मुंबईला वर्ग करण्यात आला. मुंबईच्या सत्र न्यायलयात या खटल्याची सुनावणी होऊन आता प्रकरण निकालापर्यंत पोहोचलं आहे.

पवनराजे निंबाळकरांची हत्या

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तारीख- 3 जून 2006

स्थळ- कळंबोली, नवी मुंबई .दुपारी 12 वाजताची वेळ होती.

कॉंग्रेसचे दिवंगत नेते पवनराजे निंबाळकर मुंबईला काही कामानिमित्त आले होते. काम संपवून ते पुण्याच्या दिशेने निघाले होते. वाटेत कळंबोली परिसरात त्यांना एका व्यक्तीला भेटायचं होतं. बार्शीतील जमिनीच्या व्यवहाराबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.

पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीतून पवनराजे निंबाळकर कळंबोलीतील चाररस्ता, शिळफाटा परिसरात पोहोचले. या ठिकाणी भेटीचं ठिकाण ठरलेलं होतं. सीबीआयने कोर्टात दाखल आरोपपत्रानुसार, पवनराजेंचे मारेकरी आधीपासूनच पाळत ठेऊन होते.

निंबाळकर यांची गाडी पुढे गेल्यानंतर कथित मारेकऱ्यांनी गाडीला ओव्हरटेक केलं. ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मारेकऱ्यांनी गाडीजवळ जाऊन निंबाळकर यांची चौकशी केली. पवनराजे झोपले होते. ड्रायव्हरने उठवताच त्यांनी खिडकीच्या काचा खाली केल्या.

आणि या अज्ञात शूटर्सनी काही क्षणातच पवनराजे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पवनराजे यांच्या डोळ्याखाली जखमा झाल्या. ते तिथेच खाली पडले. ड्रायव्हर समद काझीदेखील जबर जखमी झाला होता.

CBI च्या आरोपपत्रानुसार मारेकरी गाडीतून पळून गेले. काही अंतरावर जाऊन त्यांनी बंदूक आणि इतर गोष्टी फेकून दिल्या. त्यानंतर पनवेलच्या बेलवली गावात त्यांनी वापरलेली इंडिका गाडी सोडून दिली.

कसा लागला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा सुगावा?

पवन राजे हत्याकांडाचा तपास कळंबोली पोलिसांनी सुरू केला. पण या तपासावर निंबाळकर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला. पवन राजेंच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने ऑक्टोबर 2008 मध्ये पवनराजे निंबाळकर हत्येचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा CBI कडे सूपुर्द केला.

CBI ने तपास हाती घेतला. पण पवनराजे हत्या प्रकरणी काहीच सुगावा सापडत नव्हता. अचानक 2009 मध्ये मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती एक मोठा पुरावा हाती लागला. खबऱ्याने एक व्यक्ती खूप 'मोठं काम' केल्याचं बोलतोय अशी खबर आणली.

क्राइम ब्रांचने पारसमल जैनला ताब्यात घेतलं. डोंबिवलीत रहाणारा जैन सोने व्यापारी होता. पण प्रचंड नुकसान झाल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला. जैन आणि दिनेश तिवा रीकडून पोलिसांनी बंदूक आणि गोळ्या जप्त केल्या. 25 फेब्रुवारी 2009 ला जैनला अटक करण्यात आली.

कसा लागला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा सुगावा?

फोटो स्रोत, Facebook/Rana Jagjitsnigh Patil

फोटो कॅप्शन, पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील

क्राइम ब्रांचचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, जैन चोरी केल्याची माहिती देत होता. पण, खबरी पोलिसांना सातत्याने 'मोठं काम' काय केलं हे विचारा असं सांगत होता. जैनला दरोड्याच्या दोन विविध गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत क्राइम ब्रांचचे तत्कालीन पोलीस सहआयुक्त राकेश मारिया म्हणाले होते, "चौकशी दरम्यान पारसमल जैनने पवनराजे हत्या प्रकरणाची माहिती दिली."

तीन वर्षांनंतर अखेर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा तपास यंत्रणांच्या हाती लागला होता. पारसमल जैनला अटक करणारे तपास अधिकारी सांगतात, कळंबोली परिसरात भेटण्यासाठी फोन करणारा पारसमल जैन हाच होता.

राजकीय वैमनस्यातून झाली हत्या?

पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी आरोपी सीबीआयकडे सुपूर्द केले.

CBI ने दोषारोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, 2005 मध्ये पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे आणि मोहन शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचं षड्यंत्र रचलं. पवनराजे निंबाळकर हे पद्मसिंह पाटील यांची राजकीय कारकिर्दि आणि अस्तित्वासाठी धोका बनू लागले होते.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने जून 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक केली. पाटील त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उस्मानाबाद मतदार संघाचे खासदार होते.

राजकीय जाणकार सांगतात, तेरणा साखर कारखान्याच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं.

पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप

सीबीआयने कोर्टात दाखल चार्जशीटमध्ये पवनराजे यांच्या हत्येबाबत सविस्तर उल्लेख केलाय.

आरोपपत्रानुसार, जानेवारी 2005 मध्ये पारसमल जैन या प्रकरणातील सह आरोपी मोहन शुक्लाला आर्थिक मदतीसाठी भेटला. शुक्लाने जैनला पवनराजे निंबाळकर, पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला कसा धोका आहेत याची माहिती दिली.

शुक्लाने जैनला लातूरच्या सतीष मंदादे यांना भेटण्यासाठी सांगितलं. मंदादे जैनला घेऊन पद्मसिंह पाटील यांच्या घरी गेले. आणि सुपारी दिल्याचं त्यांनी सांगितलं. हे काम झाल्यानंतर समाजसेवक अण्णा हजारे यांनाही मारायचं आहे असं जैनला सांगण्यात आलं.

ओमराजे निंबाळकर

फोटो स्रोत, FACEBOOK/OM RAJE NIMBALKAR

फोटो कॅप्शन, ओम राजेनिंबाळकर

मंदादे यांनी जैनला पवनराजे निंबाळकर यांचं घर आणि कामाचं ठिकाण दाखवलं. त्यानंतर जैनने निंबाळकरांवर पाळत ठेवली. पण हे काम एकट्याचं नाही असं त्याला कळलं. निंबाळकरांच्या हत्येची 30 लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती.

पारसमल जैनच्या सोबत आता छोटे पांडे, दिनेश तिवारी आणि पिंटू सिंह नावाचे शूटर्स होते. मे 2006 मध्ये हे चौघे लातूर आणि उस्मानाबादमध्ये निंबाळकर यांचा शोध घेत होते. पण, ते सापडले नाहीत.

त्यानंतर 3 जून 2006 रोजी, जैनने पब्लिक फोनवरून पवनराजेंना फोन केला. बार्शीतील जागेवर मंदिर बांधण्याची इच्छा आहे असं दाखवून त्याने निंबाळकरांना बोलावून घेतलं.

हत्या प्रकरणाचा खटला

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी मुंबईच्या सेशन्स कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी 160 च्या आसपास साक्षीदार होते. या सुनावणीला 2011 मध्ये सुरूवात झाली.

सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर षडयंत्र (120-B), हत्या (302) आणि आर्म्स कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल केलं होतं. पवनराजे हत्या प्रकरणातील एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार बनला होता.

पवनराजे निंबाळकर यांचा मुलगा जयराजे निंबाळकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते, "या खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांकडून वेळकाढूपणा केला जातोय. खटल्याच्या तारखेला वकील विविध कारणं देऊ उपस्थित राहत नाहीत."

ते पुढं म्हणाले होते. "पद्मसिंह पाटील यांच्या वकीलांकडून मुद्दाम टाळाटाळ केली जात असल्याचा संशय आम्हाला आहे."

याबाबत आम्ही पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा वकील भूषण महाडिक म्हणाले होते, "पद्मसिंह पाटील यांनी पवनराजे यांना राजकारणात आणलं. आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त त्यांनी चुलत भाऊ पवनराजेंना प्रेम दिलं. त्यामुळे ते त्यांच्या खूनाचा विचार करू शकत नाहीत."

हा खटला अत्यंत नाजूक स्थितीत असल्यामुळे त्यांनी याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला होता.

या प्रकरणी पद्मसिंह पाटील, सतीष मंदादे, मोहन शुक्ला, पारसमल जैन, छोटे पांडे, दिनेश तिवारी, पिंटू सिंह, कैलाश यादव आणि शशिकांत कुलकर्णी यांच्यावर खटला सुरू होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)