You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगालमधील बारुईपूर अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण; आतापर्यंत काय समोर आलं?
( या बातमीत एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचं वर्णन आहे. त्यामुळे यातील काही मजकूर वाचकांना अस्वस्थ करू शकतो.)
कोलकात्याच्या दक्षिण उपनगरातील बारुईपूर परिसरात एका अल्पवयीन मुलीच्या हत्येमुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
साधारण 11 वर्षे वय असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता, असा आरोप केला आहे.
सोमवारी (6 जुलै) पोलिसांना शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मिळाला. त्यानंतर त्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला दाखल झालेल्या गुन्ह्यात बलात्काराचा उल्लेख नव्हता.
या प्रकरणाच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी 6 सदस्यांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी शनिवारपासून (4 जुलै) बेपत्ता होती. रविवारी (5 जुलै) तिचा मृतदेह एका तलावात आढळून आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
या प्रकरणामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून परिसरातील एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
रविवारी बारुईपूर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली, तर इतर तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
परिसरात अजूनही तणावाची परिस्थिती आहे. बारुईपूरमध्ये सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून ते सतत गस्त घालत आहेत.
भारतीय न्याय संहिता कलम 163 नुसार (पूर्वीचे IPC कलम 144) या भागात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणताही नवीन तणाव किंवा गोंधळ होऊ नये, यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून ही पावलं उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबीयांची मंगळवारी भेट घेतली आहे.
या प्रकरणावर स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे?
परिसरातील एका रहिवाशाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "मगरीबच्या नमाजनंतर ही अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गेली होती. परंतु, रात्री 8 वाजल्यानंतरही तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही."
तो रहिवाशी पुढे म्हणाला की, "रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही याबाबत पोलिसांशी संपर्क साधला होता. पण त्यांनी आमच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. रविवारी सकाळी स्थानिकांकडून माहिती मिळाली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून आम्हीच संशयिताला पकडलं."
"संशयिताने पोलीस ठाण्यात गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी गेलो आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तोपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. शंतनू मंडल नावाचा स्थानिक भाजप नेता मात्र संशयिताला घेऊन तेथून निघून गेला," असा आरोपही त्या रहिवाशाने केला.
स्थानिकांनी त्याला 'आरोपी' म्हटलं असलं, तरी त्याच्यावरील हत्या आणि इतर आरोपांची न्यायालयात अद्याप पुष्टी झालेली नाही.
शंतनू मंडल म्हणून ज्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे, ते बारुईपूर पश्चिम क्रमांक 3 विभागातील भाजपची सरचिटणीस आहेत.
दुसऱ्या एका स्थानिक रहिवाशाने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "शंतनू मंडल यांनी सुरुवातीला स्थानिकांना त्या तलावाजवळ जाण्यापासून रोखलं आणि आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला."
या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला. स्थानिकांनी रस्त्यावर झाडांचे ओंडके टाकून आंदोलन केलं.
परंतु, भाजप नेते शंतनू मंडल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण कोणत्याही आरोपीला पळून जाण्यास मदत केली नसल्याचा दावा केला आहे.
ते म्हणाले, "घटनेची माहिती मिळताच आम्ही संबंधित केंद्रावर जाऊन तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीला घेऊन जाताना दिसलेल्या एका व्यक्तीची ओळख पटली. त्यानंतर आम्ही त्याला लगेचच पकडलं आणि त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली."
शंतनू मंडल यांनी दावा केला की, आरोपीने या प्रकरणात 4 जण सहभागी असल्याचं सांगितलं. तसेच, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबल्याचा दावा त्यांनी केला.
जमावाच्या मारहाणीत संशयिताचा मृत्यू
बारुईपूरमधील या घटनेनंतर एका संशयिताचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. लोकांचा रोष हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
या प्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. एक अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी, दुसरा पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी आणि तिसरा एका संशयिताच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आला होता.
ताज्या माहितीनुसार, शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात नेमकं काय लिहिलं आहे, याबाबत पोलिसांनी कोणतेही अधिकृत भाष्य केलेलं नाही.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. प्रेसिडेन्सी रेंजचे आयजी कांकरप्रसाद बारुई यांनी दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी योग्य तपास केला जाईल असं प्रसारमाध्यमांना सांगितलं.
बारुई यांनी रविवारी परिसरात ध्वनिक्षेपकावरून घोषणा करून स्थानिकांना आश्वास्त केलं. ते म्हणाले, "या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, याची खात्री करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहेत."
रविवारी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या 3 झाली आहे. याशिवाय, आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाजपा नेत्या केया घोष यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की, या प्रकरणात तृणमूल काँग्रेस धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही.
त्यांनी नागरिकांना पोलिसांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
कोलकात्याच्या आर. जी. कर रुग्णालयातील पीडित डॉक्टरच्या आई आणि पाणीहाटीच्या भाजप आमदार रत्ना देबनाथ यांनी फेसबुकवर पोस्ट केली. त्या म्हणाल्या, "सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे. ज्यांनी आई-वडिलांपासून मुलगी हिरावून घेतली, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे."
तसेच, या प्रकरणातील दोषींशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
ममता बॅनर्जींचा अडवण्यात आलं
बारुईपूरमध्ये या घटनेनंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तेथे जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, रविवारी रात्री त्यांच्या समर्थक नेत्यांनी आरोप केला की, त्यांना बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते.
खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घराबाहेर पोलीस तैनात असल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर ममता समर्थक अनेक नेते कालीघाट येथे पोहोचले.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी कालीघाट येथून आरोप केला की, "पोलीस प्रशासनाने ममता बॅनर्जी यांना नजरकैदेत ठेवण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. जवळपास आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. इतक्या अनुभवी नेत्याला अशा प्रकारे का रोखण्यात आलं, याचं उत्तर आम्हाला पोलीस प्रशासनाकडून हवं आहे."
या आरोपांवर पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री दिलीप घोष यांनी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप खोटा आहे. पण, त्यांच्यावर अंडी फेकण्यासारखी घटना घडू नये, यासाठी त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांना नजरकैदेत ठेवल्याच्या आरोपावर भाजप नेत्या केया घोष म्हणाल्या की, "तृणमूलच्या काळात जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर यायच्या, तेव्हा विरोधकांना पीडितांच्या कुटुंबीयांना भेटूही दिलं जात नव्हतं. आता तर अभिषेक बॅनर्जी कुटुंबीयांशी फोनवर तरी बोलू शकत आहेत."
तृणमूल नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी बोलतानाचा व्हीडिओ स्वतः फेसबुकवर पोस्ट केला आहे.
त्यांनी पीडित कुटुंबाच्या पाठीशी राहण्याचा संदेश दिला. फेसबुकवर त्यांनी लिहिलं की, "या कुटुंबाचं दुःख शब्दांत सांगता येणार नाही. या प्रकरणातील दोषींना त्वरीत शिक्षा मिळावी, अशी मागणी करतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.