तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणारे 9 नेते कोण आहेत?

फोटो स्रोत, ANI/DIPR
- Author, झेवियर सेल्वकुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 11 मिनिटे
तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे नेते विजय आज (10 मे) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. यानंतर आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी झाला. त्यांच्यासह 9 जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित राहिले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि एडप्पाडी पलानीस्वामी यांनी सरकार स्थापन करणाऱ्या नवीन पक्षाचं अभिनंदन केलं आहे.
दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने शनिवारी (9 मे) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, विजय यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

फोटो स्रोत, ANI
विजय यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणारे 9 जण कोण?
विजय यांच्यासह एकूण 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
- एन. आनंद
- अधव अर्जुन
- के.जी. अरुणराज
- के.ए. सेंगोट्टैया
- पी. वेंकटरमन
- आर. निर्मलकुमार
- राजमोहन
- टी.के. प्रभू
- सेल्वी एस. कीर्तना
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यासह या 9 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

1. आनंद
आनंद (61) हे पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील कराईकलचे मूळ रहिवासी आहेत. ते पुदुच्चेरी मतदारसंघातील 'पुदुच्चेरी मुन्नेत्र काँग्रेस'चे उमेदवार म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2006 च्या पुदुच्चेरी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यांच्या उमेदवारी अर्जातील तपशिलानुसार, त्यांचे शिक्षण इयत्ता 8वीपर्यंत झाले आहे.
'पुदुच्चेरी विजय फॅन क्लब'चे मानद सचिव असलेले आनंद पुदुच्चेरीच्या 'पुस्सी' विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतरही 'विजय फॅन क्लब'च्या नावाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत राहिले. या माध्यमातून त्यांची ओळख विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखरन यांच्याशी झाली. पुढे ते विजय यांचेही निकटवर्ती झाले. त्यानंतर तामिळनाडूला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांनी 'अखिल भारतीय विजय फॅन क्लब'चे प्रभारी आणि 'विजय मक्कल अय्यकम'चे सरचिटणीस यांसारखी अनेक पदे भूषवली.
विजय यांच्या टीव्हीके पक्षाची स्थापना झाल्यानंतर आनंद यांनी चेंगलपट्टू जिल्ह्यातील 'शोलिंगर' विधानसभा मतदारसंघात रहायला आले. तसेच स्वतःचे नाव तामिळनाडूच्या मतदार यादीत नोंदवून घेतले. फॅन क्लबचे प्रभारी असताना आणि टीव्हीकेच्या स्थापनेनंतर विजय यांच्यावतीने क्लबचे पदाधिकारी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, तसेच विजय यांनी सांगितलेली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, अशा महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत त्यांनी मजल मारली.

सध्या विजय यांच्यानंतर टीव्हीके पक्षातील दुसरे सर्वात मोठे नेते म्हणून आनंद यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे पक्षाच्या सरचिटणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
आनंद 2006 च्या निवडणुकांमध्ये पुदुच्चेरीच्या 'पुस्सी' विधानसभा मतदारसंघातून 'डीएमके'चे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर 2011 च्या निवडणुकांमध्ये पुदुच्चेरीच्या 'उप्पलम' मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आणि 2016 च्या निवडणुकीत 'ऑल इंडिया आवर किंग्डम काँग्रेस'चे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; मात्र या दोन्ही वेळी त्यांना 'एआयएडीएमके'च्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.
या निवडणुकीत आनंद यांनी चेन्नईच्या 'त्यागरायन नगर' मतदारसंघातून टीव्हीकेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि 51 हजार 632 मते मिळवली. त्यांनी प्रतिस्पर्धी आणि 'एआयएडीएमके'चे उमेदवार सत्यनारायण यांचा 13 हजार 27 मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे पुदुच्चेरी आणि तामिळनाडू अशा 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेचे सदस्य होण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
2. अधव अर्जुन
सध्या चेन्नईतील अलवरपेट भागात वास्तव्यास असलेले अधव अर्जुन (वय 43) हे मूळचे त्रिचीचे आहेत. त्यांनी चेन्नईतील ख्रिश्चन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयातून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. कोयंबतूरमधील लॉटरी व्यवसायिक मार्टिन यांचे ते जावई आहेत.
मुळात खेळाडू आणि फिटनेस प्रशिक्षक अशी ओळख असलेल्या अधव अर्जुन यांनी राजकीय रणनीतीकार म्हणूनही काम पाहिलं आहे.
2015 पासून 2021 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करत द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) साठी निवडणूक रणनीती आखण्यात भूमिका बजावली. एम.के स्टॅलिन हे विरोधी पक्षनेते असताना राबवलेल्या 'नमक्कू नामे' यात्रेच्या अंमलबजावणीतही त्यांचा सहभाग असल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी 'व्हॉईस ऑफ कॉमन्स' नावाची निवडणूक रणनीती आणि धोरण निर्मिती कंपनी सुरू केली. त्यानंतर त्यांनी विदुथलाई चिरुथिगल काची (व्हीसीके) साठी काम सुरू केलं आणि नंतर पक्षात प्रवेशही केला.
2024 साली त्रिची येथे 'वेल्लम जनकयम' या नावाने झालेल्या व्हीसीकेच्या परिषदेचं आयोजन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांना पक्षाच्या उपमहासचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

याच काळात त्यांच्या कंपनीने आणि एका प्रकाशन संस्थेने मिळून 'एल्लोरुकुमना थलैवर आंबेडकर' हे पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकाचे प्रकाशन विजय यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात थॉल. थिरुमावलवन हे देखील सहभागी होणार होते मात्र त्यांनी अनुपस्थिती दर्शवली.
त्या कार्यक्रमात बोलताना आधव अर्जुन यांनी, "वंशपरंपरागत सत्ता तामिळनाडूत पुन्हा स्थापन होऊ दिली जाणार नाही" म्हणत डीएमकेवर अप्रत्यक्षपणे टीका केली.
तर, 2026 च्या निवडणुकीत राजेशाही वृत्ती संपुष्टात आणली पाहिजे. जन्माच्या आधारावर कुणी मुख्यमंत्री होता कामा नये," असे म्हणत त्यांनी पुन्हा डीएमकेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यानंतर त्यांना व्हीसीकेतून निलंबित करण्यात आलं.
एका मुलाखतीत त्यांनी, "चार वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेली व्यक्ती उपमुख्यमंत्री होऊ शकते, तर 40 वर्षांचा राजकीय अनुभव असलेले तिरुमवलवन उपमुख्यमंत्री का होऊ नयेत?" असा सवाल केला होता. या वक्तव्यामुळे डीएमके आघाडीत खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी व्हीसीके पक्ष सोडला आणि ज्या दिवशी निर्मलकुमार टीव्हीकेत दाखल झाले, त्याच दिवशी अधव अर्जुन टीव्हीकेत सहभागी झाले.
अधव अर्जुना हे भारतीय बास्केटबॉल महासंघ आणि तमिळनाडू बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष, तसेच तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर करूर प्रकरणाशी संबंधित सीबीआय चौकशी आणि काही फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जानुसार, त्यांची एकूण मालमत्ता 440 कोटी रुपयांहून अधिक आहे.
तसेच, त्यांच्या पत्नी डेझी यांच्या नावावर विविध राज्य सरकारांसोबत लॉटरी व्यवसायाचे करार असल्याचंही उमेदवारी अर्जात नमूद करण्यात आलं आहे. या निवडणुकीत त्यांनी चेन्नईतील विल्लिवाक्कम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 66,445 मते मिळवत डीएमकेचे उमेदवार कार्तिक मोहन यांचा 17,302 मतांनी पराभव केला.
3. अरुणराज
अरुणराज (वय 46) नामक्कल जिल्ह्यातील कुमारमंगलम येथील रहिवासी आहेत. ते भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) माजी अधिकारी आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अरुणराज यांनी 2002 मध्ये एमजीआर वैद्यकीय विद्यापीठातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही वर्षे कृष्णगिरी येथे डॉक्टर म्हणून काम केले; त्यानंतर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन 2009 पासून ते केंद्र सरकारच्या आयकर विभागात कार्यरत होते.
या काळात त्यांनी तामिळनाडू, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सेवा दिली. ते पटना येथे 'आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त' म्हणून कार्यरत होते. मे 2025 मध्ये त्यांनी 'स्वेच्छा निवृत्ती' घेतली. आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला. त्यांना पक्षाच्या 'प्रचार विभागाचे सरचिटणीस' करण्यात आले.
जेव्हा त्यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला, तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या, "2020 मध्ये अभिनेता विजय यांच्यावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी विजयला त्या प्रकरणी सल्लाही दिला होता." याविषयी विचारणा केली असता अरुणराज यांनी या गोष्टी फेटाळल्या होत्या.

टीव्हीके पक्षात प्रवेश करण्यापूर्वी अरुणराज यांनी सोशल मीडियावर 'मोफत वस्तूंचे वाटप' (फ्रीबीज) आणि '100 दिवसांचा रोजगार कार्यक्रम' याविरोधात टीका केली होती. त्यांनी टीव्हीके पक्षात प्रवेश केला तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये या विषयाची बरीच चर्चा झाली.
"निवडणूक आयोगाने कलर टीव्हीसारख्या मोफत वस्तूंच्या वाटपावर बंदी घालावी" आणि "100 दिवसांच्या रोजगार कार्यक्रमामुळे लोक आळशी बनत आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होत आहे," अशा स्वरूपाची त्यांची जुनी वक्तव्ये आजही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जातात.
टीव्हीकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणराज यांनी आपल्या प्रशासकीय पदाचा राजीनामा देण्यापूर्वीपासूनच अभिनेता विजय यांना राजकीय सल्ला देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ही निवडणूक आपल्या मूळ मतदारसंघातून म्हणजेच 'तिरुचेंगोड' विधानसभा मतदारसंघातून लढवली. या निवडणुकीत त्यांना 79 हजार 500 मते मिळाली. त्यांनी एआयएडीएमकेचे प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रशेखर यांचा 28 हजार 172 मतांच्या फरकाने पराभव केला.
4. के.ए. सेंगोट्टैया
सेंगोट्टैया (77) हे टीव्हीके पक्षातील सर्वाधिक राजकीय अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. ते इरोड जिल्ह्यातील गोपीचेट्टीपालयम जवळील कुल्लमपालयम येथील मूळ रहिवासी आहेत.
1972 मध्ये जेव्हा एम.जी.आर. यांनी द्रमुक पक्षातून फारकत घेतली, तेव्हा सेंगोट्टैया यांनी एआयएडीएमके पक्षात प्रवेश केला.
सेंगोट्टैया यांनी अनेकदा नमूद केलं की, कोईम्बतूर येथे एम.जी.आर. यांच्या नेतृत्वाखाली आयोजित एआयएडीएमकेच्या परिषदेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी एक असल्याबद्दल एम.जी.आर. यांनी त्यांचे कौतुक केले होते. याच कारणामुळे 1977 मध्ये त्यांनी सेंगोट्टैया यांना सत्यमंगलम मतदारसंघातून उमेदवारी देत निवडून आणलं होतं. त्यानंतर 1980, 1984, 1989 (एआयएडीएमके – जे. विंग), 1991, 2006, 2011, 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी गोपीचेट्टीपालयम मतदारसंघातून एआयएडीएमकेचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.
आता याच मतदारसंघातून त्यांनी टीव्हीके पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदाच विजय मिळवला. 1991 ते 1996 या काळात एआयएडीएमके सरकारच्या काळात सेंगोट्टैया यांनी परिवहन मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता.
त्यावेळी परिवहन महामंडळासाठी 'स्पेअर पार्ट' खरेदी करण्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चेन्नई येथील एका विशेष न्यायालयाने त्यांना 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच 1 लाख 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
याच कारणामुळे ते 2001 ची विधानसभा निवडणूक लढवू शकले नाहीत. या खटल्यावरील अपिलाची सुनावणी सुरू असतानाच 2001 मध्ये एआयएडीएमके पक्ष पुन्हा सत्तेत आला. यानंतर पुढील वर्षीच त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

2011 ते 2016 या काळातील एआयएडीएमके सरकारच्या काळात त्यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु काही कालावधीनंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपदाची संधी देण्यात आली नाही.
2016 मध्ये एआयएडीएमकेच्या नेतृत्वाने त्यांना गोपीचेट्टीपालयम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी पुन्हा एकदा दिली. जयललिता यांच्या निधनानंतर जेव्हा पलानीस्वामी मुख्यमंत्री झाले, तेव्हा सेंगोट्टैया यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 2021 च्या विधानसभा निवडणुकांमध्येही सेंगोट्टैया विजयी झाले. यानंतर 2025 मध्ये त्यांनी पलानीस्वामी यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली.
ऑक्टोबर 2025 मध्ये सेंगोट्टैया एआयएडीएमकेतून बाहेर पडले. त्यावेळी ते डीएमकेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र, त्यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी विजय यांची भेट घेतली आणि टीव्हीकेत प्रवेश केला. त्यांच्याकडे पक्षाच्या उच्चस्तरीय राज्य कार्यकारिणी समितीचे 'मुख्य समन्वयक' पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी पुन्हा एकदा 'गोपी' मतदारसंघातून टीव्हीके उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पलानीस्वामी यांनी त्यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अत्यंत कठोर टीका केली. सेंगोट्टैया यांनी मात्र त्यावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही.
या निवडणुकीत त्यांनी 82 हजार 612 मते मिळवून विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील डीएमके उमेदवारापेक्षा त्यांना 16 हजार 620 मते अधिक मिळाली होती. त्या मतदारसंघात एआयएडीएमके पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
5. वेंकटरमण

वेंकटरमण हे मायलापूर मतदारसंघातून विजयी झाले. ते टीव्हीके पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे कोणतं खातं सोपवलं जाईल, यावर सोशल मीडियावर आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
6. सीटीआर निर्मलकुमार
44 वर्षीय सीटीआर निर्मलकुमार यांनी थिरुपरांकुंद्रम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते मदुराई जिल्ह्यातील उसिलामपत्ती नाडूमुथालाईकुलम या ठिकाणी मूळ गाव असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात सांगितले. या ठिकाणी त्यांची आणि कुटुंबाची मालमत्ता आहे.

निर्मल कुमार यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. ते कायद्याचे पदवीधर देखील आहेत आणि क्रिमिनॉलॉजी-पोलीस प्रशासनात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आधी ते भाजपच्या आयटी सोशल मीडिया सेलचे विभाग प्रमुख होते.
2023 मध्ये भाजप नेते अण्णामलाई यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ते AIDMK मध्ये गेले. आणि त्यांनी अण्णामलाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर निर्मल कुमार हे 2025 मध्ये विजय यांच्या टीव्हीके पार्टीत गेले.
या निवडणुकीत मदुराईतील तिरुपारनकुंद्रम या मतदारसंघातून निवडणूक लढले. 1,14,316 इतकी मतं घेऊन ते निवडून आले. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांना हरवून ते विधानसभेवर निवडून गेले आणि आता त्यांनी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.
7. राजमोहन अरुमुगम
39 वर्षीय राजमोहन अरुमुगम हे अभिनेते, दिग्दर्शक आणि युट्युबर आहेत. पत्रकारितेत पदवी घेऊन त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली. सूत्रसंचालक, निवेदक, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत.
'पुट चटनी' या प्रसिद्ध युट्युब चॅनेलवर त्यांनी 'हू किल्ड अनिता' ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. NEET ची तयारी करणाऱ्या अनिता या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. त्यावर राजमोहन यांनी डॉक्युमेंटरी बनवली होती. सामाजिक विषयावर केलेल्या भाष्यामुळे या डॉक्युमेंटरीची चर्चा झाली होती.

बाबा ब्लॅक शीप या 2023 साली आलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी जेव्हा आपला पक्ष स्थापन केला होता तेव्हा राजमोहन यांना प्रसिद्धी आणि प्रसाराची जबाबदारी दिली होती. त्यावर राजमोहन यांनी म्हटले होते की या गोष्टीकडे मी एक पद म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून पाहतो. ज्या लोकांना आपला आवाज नाहीये त्यांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी 'थलपती' यांनी माझ्यावर सोपवली आहे.
ज्या ठिकाणी विजय सभा घेत असत त्या ठिकाणी त्यांच्या आगमनाची घोषणा असो वा कार्यक्रमाचे निवेदन असो, ही जबाबदारी राजमोहन यांनी पार पाडल्याचे दिसले.
एगमोर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी द्रमुकचे उमेदवार तामिळन प्रसन्ना यांना 10804 मतांनी पराभूत केले. राजमोहन यांना या निवडणुकीत 53,901 मतं पडली.
8. डॉ. टी. के. प्रभू
टीव्हीके पक्षाचे जिल्हा सचिव डॉ. टी. के. प्रभू यांनी आज विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी या मतदारसंघातून ते विजयी झाले. प्रभू हे व्यवसायाने डॉक्टर आहेत.
बीबीसी तामिळशी एप्रिल महिन्यात बोलताना त्यांनी सांगितले होते, ठकराईकुडी या मतदारसंघातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. 80-90 टक्के गावांमध्ये ही समस्या आहे. आमदार झाल्यावर ही समस्या त्वरीत सोडवण्यावर भर राहील."

"जे या भागात जन्मले आणि वाढले तेच कराईकुडीच्या समस्या समजू शकतात. मी याच भागातला आहे, मी समस्या समजू देखील शकतो आणि सोडवू देखील शकतो. या मतदारसंघासाठी मिशन 2030 अंतर्गत मी 15 मोठ्या योजना आखल्या आहेत. चार वर्षांत त्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा माझा मनोदय आहे", असे त्यांनी बीबीसी तामिळला म्हटले होते.
9. कीर्तना
विजय यांच्या मंत्रिमंडळात 29 वर्षीय कीर्तनाचा समावेश आहे. त्यांनी MSc पर्यंत शिक्षण घेतले आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पर्सनल कन्सल्टंट हा व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता 22,57,710 रुपये इतकी आहे.

टीव्हीके पक्षाच्या उमेदवार कीर्तना यांनी शिवकाशी मतदारसंघातून 11,670 मतांच्या फरकाने विजय नोंदवला. काँग्रेसचे उमेदवार अशोकन यांना 57 हजार 39 मतं मिळाली. तर एआयएडीएमकेचे उमेदवार आणि माजी मंत्री राजेंद्र बालाजी यांना 51 हजार 78 मतं मिळाली आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले.
निवडणुकीत विजयानंतर राष्ट्रीय माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत कीर्तना यांनी हिंदीचा वापर केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. टीव्हीके पार्टीचे प्रतिनिधित्व सगळीकडे पोहचावे हा विचार घेऊनच आपण हिंदीतून बोलल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. माझ्या मतदारसंघातून मी दोन दिग्गजांचा पराभव करुन जिंकले आहे असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते.
विजय यांना असा मिळाला पाठिंबा
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 120 आमदारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर, टीव्हीके नेते विजय तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली.
विजय यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि सत्तास्थापनेचा दावा केला. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीत पक्षाच्या नेत्यांचाही समावेश होता.

फोटो स्रोत, Lok Bhavan
दरम्यान शनिवारी (9 मे) सायंकाळी, तामिळनाडूतील काँग्रेस, सीपीआय आणि सीपीएमनंतर, व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) यांनीही टीव्हीकेला आपला पाठिंबा दर्शवला होता. तसेच व्हीसीकेचे नेते थॉल तिरुमावलवन यांनी टीव्हीकेचे नेते अधव अर्जुन यांना पाठिंब्याचं पत्र दिलं. आययूएमएलनेही टीव्हीकेला आपला पाठिंबा दर्शवला.
व्हीसीकेकडून पाठिंब्याचे पत्र मिळाल्यानंतर अधव अर्जुन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके यांचे आभार मानले.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, तामिळनाडूत काँग्रेसने 5 जागा जिंकल्या आहेत, तर सीपीआय, सीपीएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत.
त्यामुळे आता टीव्हीकेसोबत असलेल्या सदस्यांचा एकूण 121 जागांचा आकडा झाला आहे, जो बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा जास्त आहे.
234 जागांच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या आहेत. विजय यांनी 2 जागा जिंकल्या असल्याने त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे टीव्हीकेची संख्या 107 राहील.
त्या वेळी सभागृहाची संख्या 233 इतकी होईल आणि बहुमतासाठी 117 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असेल.

फोटो स्रोत, Imran Qureshi
तामिळनाडू विधानसभेची मुदत 10 मे रोजी संपत आहे. तत्पूर्वी बहुमत मिळवणे आवश्यक असल्याचं कायदेतज्ज्ञ सांगत होते.
स्टॅलिन यांचा डीएमके, एआयएडीएमके, आणि भाजप यांसारख्या पक्षांनी पाठिंबा दिला तरीही विजय तो स्वीकारण्याची शक्यता नाही, असंही शिवप्रियन यांनी सांगितलं होतं.
तामिळनाडूतील जनतेत प्रचंड उत्सूकता
विजय केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे, तर हिंदी भाषिक प्रदेशांमध्येही लोकप्रिय आहेत.
चाहत्यांमध्ये 'थलापती' या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या विजय यांनी, 4 मे रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये सर्वांना धक्का देत आघाडी घेतली.

फोटो स्रोत, TVK Vijay/Facebook
तामिळनाडूतील सत्ताधारी डीएमके पक्षाचा पराभव करून आपला 'तामिळगा वेत्री कलागम' (टीव्हीके) पक्ष विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आणि तामिळनाडूमध्ये राजकीय घडामोडींच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
विजयच्या पक्षाने 108 जिंकल्या मात्र सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना बहुमताची आवश्यकता होती. हा पाठिंबा मिळवण्याकरिता आठवडाभर चाललेला संघर्ष अखेर यशस्वी झाला आहे.
आपल्या चित्रपटांमधून प्रचंड चाहतावर्ग कमावलेले विजय आता मुख्यमंत्री म्हणून पुढे काय करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























