विजय : बहिणीच्या निधनाचा धक्का, सिनेमा सोडून थेट राजकारणात आणि आता तामिळनाडूच्या सत्तेपर्यंत

विजय

फोटो स्रोत, TVK Vijay/Facebook

    • Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
    • Role, बीबीसी तमिळ
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. अभिनेता विजय यांच्या पक्षाने सर्वांना धक्का देत आघाडी घेतली आहे.

सुरुवातीचे कल पाहिले तर विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

विजय यांनी साधारण 33 वर्षांपूर्वी तमिळ चित्रपटसृष्टीत हिरो म्हणून करियरची सुरुवात केली होती. आता ते पहिल्यांदाच राजकारणातील निवडणुकीला सामोरे गेले.

इतका काळ गेला, त्याचं वैयक्तिक आयुष्य आणि फिल्मी जीवन जवळपास एकसारखंच राहिलं. पण आता त्यांनी राजकारण पूर्णपणे वेगळ्या स्टाइलने हाताळलं आहे.

विजय यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर एक गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करते. पडद्यावर ते खूप उत्साही दिसतात, परंतु प्रत्यक्षात मात्र ते पूर्णपणे वेगळे असतात.

स्क्रीनवर जसं ते उत्साहात दिसतात, तसं ते प्रत्यक्षात अजिबात नाहीत. उलट, ते थोडे संकोची आहेत- स्वतःहून बोलायला कचरतात आणि विचारलेल्या प्रश्नांनाही थोडक्यातच उत्तर देतात.

"वयाच्या दहाव्या वर्षी मी माझी बहीण गमावली. त्यानंतर माझ्या वयाचे कोणी भाऊ-बहीण नव्हते, त्यामुळे मी एकट्यानेच मोठा झालो. कदाचित त्यामुळेच माझा स्वभाव असा झाला असेल," असं विजय यांनी एकदा सांगितलं होतं.

असा हा माणूस आता आपल्या नव्या पक्षाच्या राजकीय व्यासपीठावर खूप आत्मविश्वासाने बोलताना दिसतो. नवीन लोकांशी बोलायला कचरणाऱ्या तरुणापासून ते पक्षाचा नेता बनण्यापर्यंतचा विजय यांचा हा प्रवास खरोखरच असामान्य आहे.

आठवीत असतानाच अभिनयाला सुरुवात

लहान असताना बहीण विद्याचं निधन झालं, त्याचा विजय यांच्यावर खूप मोठा परिणाम झाला. त्यांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे, ते नंतर खूप शांत आणि मितभाषी झाले.

एस. ए. चंद्रशेखर यांनी चित्रपट दिग्दर्शन सुरू केलं तेव्हा विजय एवढे मोठे झाले होते की त्यांना आता चित्रपटांत रस वाटू लागला होता. त्या काळात चंद्रशेखर प्रामुख्याने विजयकांतसोबत चित्रपट करत होते.

त्या चित्रपटांमध्ये विजय यांनी छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. आठवीत शिकत असतानाच त्यांनी आपला पहिला चित्रपट केला.

"दहावीपर्यंत मी सरासरीपेक्षा थोडासा चांगला विद्यार्थी होतो. त्यानंतर अभ्यासातील रस कमी झाला आणि चित्रपट आवडू लागले होते. मी वडिलांना न सांगता खूप सिनेमे पाहायचो."

"नंतर जेव्हा मी मला चित्रपटसृष्टीत यायचं आहे, अभिनय करायचा आहे, असं सांगितलं, तेव्हा घरी जोरदार विरोध झाला. वडिलांनी आमच्यासाठी आधी पदवी पूर्ण कर, मग मी स्वतः तुझ्यासाठी चित्रपट तयार करेन," असं त्यांना म्हटलं.

आठवीत असतानाच अभिनयाला सुरुवात

फोटो स्रोत, @Dir_SAC/X

"त्यानंतर मी लोयोला कॉलेजमध्ये व्हिज्युअल कम्युनिकेशनला प्रवेश घेतला. पण मी तिथे फक्त एक वर्षच शिकलो. त्या काळात माझ्या वडिलांनी 'नलाईया थीरपू' हा चित्रपट तयार केला आणि त्याचा मला हिरो बनवलं."

"पण तो चित्रपट काही चालला नाही. मग साधारण 6 ते 7 महिन्यांचा ब्रेक घेतला आणि पुन्हा कॉलेजला परतलो," असं विजयने 2009 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल सांगितलं.

नलाईया थीरपू हा सिनेमा चालला नाही, तेव्हा विजय यांनी 'सेंथूरपांडी' या चित्रपटात दुसऱ्या हिरोची भूमिका केली, ज्यात विजयकांत मुख्य हिरो होते.

विजयकांत हे त्या वेळी लोकप्रिय कलाकार असल्यामुळे, या चित्रपटाने विजय यांना चांगली ओळख मिळवून दिली. लोकांनी त्यांना अभिनेता म्हणून स्वीकारायला सुरुवात केली.

"माझ्या वडिलांनी मला अशी संधी दिली नसती, तरीही मी 2 ते 3 वर्षे उशिरा का होईना, पण सिनेमात आलोच असतो," असं विजय यांनी अनेकदा सांगितलं आहे.

इलय्या थलपथी

1994 मध्ये आलेल्या 'रसीगन' या चित्रपटात एस. ए. चंद्रशेखर यांनी आपल्या मुलाला 'इलय्या थलपती' हे नाव दिलं. त्यानंतर 2017 मध्ये आलेल्या 'बैरवा'पर्यंत विजय यांच्या चित्रपटांच्या टायटल कार्डमध्ये हेच नाव वापरलं जात होतं.

लोयोला कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीनाथ, संजीव, रामकुमार, मनोज, सुजय आणि विजय या मित्रांचा एक ग्रुप तयार झाला होता. विजय यांनी ही मैत्री दीर्घकाळ टिकवून ठेवली. परंतु, वडिलांच्या निर्मितीतीखालील चित्रपट एकामागून एक येऊ लागल्यामुळे त्यांना कॉलेजच्या अभ्यासासाठी वेळच मिळत नव्हता.

एका वर्षात विजय यांचे अनेक चित्रपट रिलीज होऊ लागले. 1995 ते 1997 या काळात दरवर्षी त्यांचे 4 ते 5 चित्रपट प्रदर्शित होत असत. त्यानंतर 2005 पर्यंत दरवर्षी किमान 3 चित्रपट रिलीज होऊ लागले.

परंतु, त्यानंतर विजय यांनी चित्रपटांची संख्या कमी करून वर्षाला एक किंवा दोनच सिनेमे करायला सुरुवात केली.

विजय यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट 'पूवे उनक्कागा'

पूवे उनक्कागा हा चित्रपट विजय यांच्या करिअरमधला महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. सेंथूरपांडी, रसीगन, देवा आणि कोईम्बतूर मॅपिल्लई अशा चित्रपटांमुळे तयार झालेल्या इमेजमधून बाहेर पडायला या चित्रपटाने त्यांना मोठी मदत केली.

या चित्रपटाने विजय यांना मोठं यश मिळवून दिलं. त्यानंतर विजय यांनी काळजीपूर्वक चित्रपटांची निवड करायला सुरुवात केली आणि लव्ह टुडे, वन्स मोअर आणि काधलुक्कू मरियाधाईसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. काधलुक्कू मरियाधाई हा सिनेमा त्यांच्या करिअरमधला आणखी एक मैलाचा दगड ठरला.

Actor Vijay/Facebook

फोटो स्रोत, Actor Vijay/Facebook

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1990च्या दशकाच्या शेवटी विजय यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमुळे ते तमिळ कुटुंबांच्या जवळ झाला. त्याच काळात रजनीकांत आणि कमल हसन यांच्या चित्रपटांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यावेळी विजय आणि अजित हे दोघे नव्या पिढीचे स्टार म्हणून उदयास येऊ लागले.

तमिळ चित्रपटसृष्टीच्या सीमा जसजशा विस्तारत गेल्या तसतशी विजय यांची लोकप्रियताही वेगाने वाढली. त्यांनी आंतरराष्ट्रीय ब्रँड कोका-कोलाच्या जाहिरातींमध्ये काम केलं. ते तमिळनाडूमध्ये त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडरही झाला. यामुळे मुलं आणि तरुणांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता दिसून आली.

विजय यांचे सुरुवातीचे सिनेमे हे कथा, पटकथा किंवा अभिनयासाठी नव्हे, तर इतर कारणांमुळे चर्चेत येत होते. हे असंच चालू राहिलं तर ते फार काळ टिकणार नाही, हे एस. ए. चंद्रशेखर यांना लक्षात आलं.

त्यामुळे त्यांनी त्यांना इतर दिग्दर्शकांकडे काम करायला पाठवलं. वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करताना विजय 'दिग्दर्शकाचा अभिनेता' म्हणून ओळखले जाऊ लागले.

दिग्दर्शक सांगेल तेच करणारे ते अभिनेते होते. त्यामुळे त्यांना सतत यश मिळू लागलं. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी दिग्दर्शकांसोबत काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी अभिनेते विजयकांत यांना आदर्श मानलं.

"यानंतर विजय यांनी प्रभुदेवा, सिद्दिकी, धरणी, शंकर आणि पेरारसु यांसारख्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. ही रजनीकांतसारखीच स्टाइल होती. घिल्ली या चित्रपटाने त्यांना सर्व स्तरातील लोकांपर्यंत नेलं."

"या काळात विजय यांनी कुटुंबाबद्दल (आई, बहीण) प्रेम दाखवणाऱ्या भूमिका करायला सुरुवात केली," असं मनोनमनियम सुंदरनार विद्यापीठाचे माजी प्राध्यापक ए. रामासामी सांगतात.

राजकारणाकडे वाढता कल

फोटो स्रोत, @ACTORVIJAY

2004 मध्ये आलेल्या घिल्ली आणि 2005 मध्ये आलेल्या थिरुपाची व शिवकाशीसारख्या सिनेमांमुळे ते सर्वसामान्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याचे काही सिनेमे अपयशी ठरले, परंतु 2012 मध्ये आलेल्या 'थुप्पाक्की'ने त्यांना पुन्हा एक नवीन मार्ग दाखवला.

"पूर्वीसारखं एकट्याने काम करण्याऐवजी, आता विजय यांच्या भूमिकांमध्ये बदल दिसू लागला. ते टीमसोबत काम करणारा आणि त्या टीमचं नेतृत्व करणारा नायक म्हणून दिसू लागले."

"'थलैवा'मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली माफिया गँग दाखवली, तर 'कथ्थी'मध्ये ते ज्येष्ठ लोकांच्या गटाचं नेतृत्व करताना दिसले. अशा भूमिकांमुळे विजय यांची एक चांगला नेता अशी नवीन प्रतिमा तयार झाली."

"2017 नंतर मर्सल, सरकार, बिगिल, मास्टर, बीस्ट, वारिसू आणि द गॉट या चित्रपटांनी विजय यांची नेता म्हणून प्रतिमा अधिक मजबूत झाली. लिओ हा सिनेमा मात्र याला अपवाद ठरला," असं संशोधक मोहम्मद इलियास त्यांच्या 'जननायगन' या पुस्तकात सांगतात.

राजकारणाकडे वाढता कल

या काळात विजय यांनी आपल्या नावाच्या आधीची 'इलय्या थलपती' ही उपमा बदलून 'थलपती' असं केलं.

"2017 नंतरच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांना नवीन एमजीआरसारखं दाखवण्यात आलं. त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येणं कमी केलं.

आजच्या डिजिटल युगात लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात, पण विजय यांनी मात्र या डिजिटल जगापासून स्वतःला दूर ठेवलं. त्यामुळे त्यांना पाहायचं असेल तर त्यांचे चित्रपटच पाहावे लागतात," असं मोहम्मद इलियास सांगतात.

विजय यांना राजकारणात रस नेमका कधी निर्माण झाला, याबाबत स्पष्ट माहिती नाही. पण त्यांच्या मनात हा विचार काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी अचानक आलेला नाही.

राजकारणाकडे वाढता कल

फोटो स्रोत, Ponni Gnanam

साधारण 16 वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, "लोकांना मदत करायची असेल तर एका टप्प्यानंतर हातात सत्ता असणं खूप महत्त्वाचं असतं. फक्त फॅन क्लब किंवा चळवळ म्हणून ते एका मर्यादेपर्यंतच चालू शकतं. त्यापुढे सत्तेची आवश्यकता असते." त्या काळात ते काँग्रेसमध्ये जाणार अशा बातम्याही येत असत.

दरम्यान, श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या काळात विजय यांनी अचानक उपोषणाची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. युद्ध तीव्र असताना त्यांनी श्रीलंकन तमिळ लोकांना समर्थन देण्यासाठी आणि नरसंहार थांबवण्याची मागणी करत उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार 16 नोव्हेंबर 2008 रोजी चेन्नई येथील चेपॉक येथे त्यांनी उपोषण आंदोलन केलं. या आंदोलनात त्यांचे हजारो चाहते सहभागी झाले होते.

'विजय मक्कल इयक्कम' ते 'तमिळगा वेत्री कळगम'

लोकांमध्ये काम करण्यासाठी जुलै 2009मध्ये विजय मक्कल इयक्कम ही संस्था सुरू केली. 2012 मध्ये विजय यांनी दहावी आणि बारावीमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले.

या गोष्टींमुळे त्यांना लोकांमध्ये काम करण्याची त्याची इच्छा असल्याचं दिसत होतं. 2017 मध्ये 'नीट'विरोधी आंदोलनाला विरोध करणाऱ्या अनिता या विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर विजय यांनी तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि शोक व्यक्त केला.

2018 मध्ये थुथुकुडीतील स्टरलाइट कॉपर प्लांटविरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना विजय यांनी आर्थिक मदत केली. त्याच वर्षी केरळमध्ये आलेल्या पुरग्रस्त भागांतही त्यांनी मदत साहित्य पाठवलं होतं.

या घटनांनंतर विजय राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची चर्चा हळूहळू जोर धरू लागली होती. पण हा निर्णय जाहीर करायला त्याला काही वर्षे लागली. दरम्यान, ऑक्टोबर 2021 मधील तमिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'विजय मक्कल इयक्कम'चे काही उमेदवार विजय झाले. अखेर फेब्रुवारी 2024 मध्ये विजय यांनी 'तमिळगा वेत्री कळगम' नावाचा राजकीय पक्ष सुरू केला.

विजय

फोटो स्रोत, ANI

करूरमधील दुर्दैवी घटना

पण तरीही, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष लढणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी विक्रवंडी येथे पक्षाचं पहिलं अधिवेशन घेतलं. या अधिवेशनाला झालेली मोठी गर्दी पाहून तमिळनाडूतील अनेक राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या.

यानंतर 27 सप्टेंबर 2025 रोजी करूर येथे आयोजित सभेत दुर्दैवाने 41 जणांचा मृत्यू झाला.

"ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा ते तिथे उपस्थित असायला हवा होते. ते तिरुचीला पोहोचले तेव्हाच त्यांना सर्वकाही कळलं होतं. किमान तेव्हा तरी त्यांनी परत यायला हवं होतं. मग परिस्थिती वेगळी दिसली असती."

"आतापर्यंत त्यांनी करूर घटनेची जबाबदारी घेतलेली नाही. त्यांनी खेदही व्यक्त केलेला नाही. उलट ते इतरांवरच दोष टाकत आहेत आणि लोक त्यावर विश्वास ठेवतील असं त्यांना वाटतं," असं ए. रामासामी म्हणतात.

करूरमधील दुर्दैवी घटना

फोटो स्रोत, Getty Images

विजय यांच्याबद्दल बोलताना सर्वजण एक गोष्ट आवर्जून सांगतात, त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल म्हणजे त्यांच्या वेळ पाळण्याच्या सवयीबद्दल.

"शूटिंगसाठी 8 वाजता येण्यास सांगितलं, तर ते 7.50 ला तयार असतात. ते इतक्या काटेकोरपणे वेळ पाळतात की, आपण थोडा उशिराचा वेळ सांगायला हवा होता असं वाटतं," असं दिग्दर्शक सिम्बुदेवन यांनी सांगितलं.

अभिनेत्री त्रिशानेही एका मुलाखतीत त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल हेच सांगितलं आहे.

पण करूरमधील सभेसाठी विजय ठरलेल्या वेळेपेक्षा अनेक तास उशिरा पोहोचले, जे त्यांच्या नेहमीच्या वक्तशीरपणाच्या सवयीच्या अगदी उलट होतं. तसेच, आधी ते मीडियाला सहज मुलाखती देत असत आणि त्यात ते अगदी नैसर्गिकपणे दिसायचे. पण राजकारणात आल्यानंतर ते मीडियाला भेटत नाहीत, हा सुद्धा एक विरोधाभास आहे.

"टीव्हीकेचे नेते विजय यांची मुख्य रणनीती म्हणजे मौन. एखाद्या नेत्याने शांत राहण्याचे फायदेही असतात आणि तोटेही. विजय यांच्या या मौनामुळे लोकांमध्ये काहीशी संभ्रमाची स्थिती निर्माण होते. त्यामुळे वेगवेगळे लोक त्याचा वेगवेगळा अर्थ काढतात.

"करूर दुर्घटनेच्या वेळी, त्याचा थेट संबंध असताना, विजय यांनी बाळगलेलं मौन आणि नंतर जारी केलेला व्हीडिओ यावरून त्यांच्या समर्थकांनी हा त्यांचा सौम्य स्वभाव असल्याचं म्हटलं. परंतु, विरोधकांनी यावर तीव्र टीका करत याला बेजबाबदारपणा म्हटलं. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांवरही प्रश्न उपस्थित झाले," असं मोहम्मद इलियास म्हणतात.

"यशस्वी चित्रपट कलाकार जेव्हा राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करतात, तेव्हा ते एमजीआर यांना आदर्श मानतात. पण एमजीआर ज्या परिस्थितीत होते, ती परिस्थिती ते विसरतात."

"एमजीआर यांच्यासोबत डीएमकेमधून आलेले लोकच नव्हे, तर डाव्या विचारसरणीचे लोकही त्यांना पाठिंबा देत असत. परंतु, विजय यांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही," असं ए. रामासामी सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)