पश्चिम बंगालमध्ये भाजप विजयी होण्याची 'ही' आहेत 4 कारणं

पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, ANI

    • Author, रजनीश कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं वार्तांकन करत असताना मी लोकांच्या विविध तक्रारी ऐकल्या होत्या. तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) स्थानिक नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मनमानी खूपच वाढली असल्याचं लोक सांगत होतं.

पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहमतीशिवाय कोणतंही नवीन काम करणं कठीण गोष्ट आहे, असं लोक उघडपणे सांगत होते.

असं असूनही टीएमसीच्या बाजून युक्तिवाद करणारे म्हणत होते की पश्चिम बंगालमधील ग्रामीण, मुस्लीम आणि महिला ममता बॅनर्जी यांच्यासोबत आहेत.

अशा परिस्थितीत सरकारच्या विरोधातील लाट असूनही ममता ही निवडणूक जिंकतील. मात्र आतापर्यंत निवडणूक निकालाचे जे कल समोर आले आहेत, त्यातून दिसतं की लोकांनी सत्ताबदल करण्याचं ठरवलं होतं.

तसं पाहता, भाजपानं 2021 च्या विधानसभा निवडणुकीतच या बदलाची पायाभरणी केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा बंगालमधील मुख्य विरोधी पक्ष ठरला होता. भाजपाच्या आमदारांची संख्या 3 वरून 77 वर पोहोचली होती. अशा परिस्थितीत भाजपा बंगालसाठी एखादा बाहेरचा पक्ष राहिला नव्हता.

उदाहरणार्थ, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत माटीगारा-नक्षलबाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे आनंदमय बर्मन यांनी तृणमूल काँग्रेसच्या राजन सुंदास यांचा 70 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. यावेळच्या निवडणुकीतदेखील आनंदमय बर्मन याच मताधिक्यानं टीएमसीचा पराभव करतील असं दिसतं आहे.

याच नक्षलबाडी भागातून 1967 मध्ये कट्टर डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी सशस्त्र आंदोलनाची सुरुवात केली होती. अनेक राज्यांमधील मजूर, भूमिहीन, दलित, आदिवासी आणि शोषित त्याकडे आकर्षित झाले होते. नक्षलबाडीमध्ये भाजपाला मिळालेला विजय, पश्चिम बंगालमधील बदलाचा संकेत म्हणून पाहिला गेला होता. त्यानुसार 5 वर्षांनी हा बदल झालादेखील.

भाजपाच्या या विजयामागची मुख्य कारणं काय आहेत? जाणून घेऊया.

1. सरकारविरोधी लाट किंवा हिंदू मतांचं ध्रुवीकरण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दमदम उत्तर विधानसभा मतदारसंघातील एका महिला मतदार तृणमूल काँग्रेसबद्दल मला म्हणाली होती, "पोलीस ममतांच्या निष्ठावानांचं ऐकतात. आम्हाला ममतांच्या निष्ठावानांचीच तक्रार करायची असते. गुंडगिरी इतकी वाढली आहे की त्यांच्या सहमतीशिवाय कोणतंही काम करणं शक्य नाही. आम्हाला बदल हवा आहे आणि हा बदल आता भाजपाच करू शकते. काँग्रेस आणि सीपीएम तसं करण्याच्या स्थितीत असते, तर मी त्यांचा विचार नक्कीच केला असता."

टीएमसीचे लोकसभेतील खासदार सौगत रॉय बीबीसीला म्हणाले, "राज्यातील 15 वर्षांच्या सत्तेमुळे सरकारविरोधी लाट असणं खूपच स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, हिंदू मतदार भाजपाकडे वळले आहेत, हेदेखील एक मोठं कारण आहे. याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले."

हिमाद्री चॅटर्जी, युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्तामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. हिमाद्री चॅटर्जी म्हणाले की बंगालमधील भाजपाच्या विजयाचं श्रेय जे लोक हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाला देत आहेत, त्यांना बंगालचं राजकारण नीट समजत नाही.

प्राध्यापक चॅटर्जी म्हणाले, "भाजपाच्या विजयाकडे हिंदू मतांचं ध्रुवीकरण म्हणून नाही तर, टीएमसीच्या विरोधातील मतं म्हणून पाहिलं पाहिजे. टीएमसीच्या विरोधातील लाटेचा फायदा काँग्रेस घेऊ शकली असती. मात्र राजकीयदृष्ट्या काँग्रेस निष्क्रिय होती. भाजपाला अचानक विजय मिळालेला नाही."

भाजपा जल्लोश

फोटो स्रोत, Getty Images

"भाजपाच्या मतांची टक्केवारी 2014 पासूनच वाढते आहे. जर 2016 ते 2026 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिलं, तर भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली आणि त्यांच्या जागाही वाढल्या. इतकंच काय, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला जरी कमी जागा मिळाल्या, तरीदेखील त्यांची मतांची टक्केवारी कमी झाली नाही."

"पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारबद्दल लोकांमध्ये नाराजी होती. ममता यांच्या पक्षाला भाजपा टक्कर देते आहे, असं लोकांना वाटलं. लोकांना ममतांचा पराभव करायचा होता. त्यामुळे त्यांनी भाजपाला मतं दिली. जे लोक धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल बोलत आहेत, त्यांना मी काही तथ्यं सांगू इच्छितो. बंगालमध्ये 1950 नंतर कोणतीही दंगल झालेली नाही," असं प्राध्यापक चॅटर्जी म्हणाले.

"त्यामुळे यात इथल्या पक्षांची देखील भूमिका राहिली आहे, हे उघड आहे. बंगाल पार्टिशन स्टेट आहे. असं असूनही इथे हिंदू विरुद्ध मुस्लीम असं राजकारण होत आलेलं नाही. बंगालच्या लोकांना भाजपाबद्दल माहित नाही, असंही नाही. बंगालमध्ये भाजपाला मतं देणारे लोक सांप्रदायिक झाले, असं जर आपण म्हणालो तर ते हास्यास्पद ठरेल," असं प्राध्यापक चॅटर्जी पुढे म्हणाले.

तर वरिष्ठ पत्रकार प्रसून आचार्य म्हणाले, "जो निकाल लागला आहे, त्याचा आम्हाला अंदाज नव्हता. ममता यांच्या सरकारविरोधात लाट नक्कीच होती. मात्र हा विजय फक्त सत्तेच्या विरोधातील लाटेचा नाही. ममता यांचे स्थानिक नेते आणि समर्थक यांना लोक खूप त्रासलेले होते. मात्र यावेळच्या निवडणुकीत भाजपाला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा देखील फायदा झाला आहे."

"मला वाटतं की आगामी काळात बंगालमध्ये विरोधी पक्षांची स्थिती खूप कमकुवत होईल आणि टीएमसीमध्ये फूट पडू शकते. टीएमसीचे काउन्सलर आणि स्थानिक नेते, फायद्यासाठी भाजपामध्ये जातील. अनेक आमदार आणि नेते तपास यंत्रणांच्या भीतीनं भाजपामध्ये जातील."

2. एसआयआरचा परिणाम

सबर इन्स्टिट्यूट या थिंक टँकनं पश्चिम बंगालमध्ये एसआयआर (स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन) च्या डेटाचं सखोल विश्लेषण केलं आहे.

सबर इन्स्टिट्यूटचे संचालक साबिर अहमद म्हणाले की या निवडणूक निकालामध्ये एसआयआरचा परिणामदेखील स्पष्टपणे दिसून येतो.

"या निवडणुकीत जवळपास 31 लाख लोकांनी मतदान केलं नाही. अनेक जागांवर हार-जीतचा फरक जास्त असणार नाही. अशा परिस्थितीत भाजपाच्या विजयामध्ये एसआयआरची भूमिकादेखील महत्त्वाची आहे," असं अहमद म्हणाले.

"यावेळेस बंगालमधील निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणदेखील झालं आहे. शहरी भागांमध्ये तर ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसतं आहे. अल्पसंख्यांक बहुसंख्याक होतील ही भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती," असं अहमद पुढे म्हणाले.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

3. कमकुवत डावी आघाडी आणि काँग्रेस

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत टीएमसी आणि भाजपा या दोनच पक्षांची उपस्थिती आहे, हे स्पष्टपणे दिसत होतं.

या निवडणुकीत जनमत आणि प्रत्यक्ष प्रचाराच्या दृष्टीनं काँग्रेस आणि सीपीआय (एम) चं अस्तित्व दिसत नव्हतं. काँग्रेस आणि सीपीआय (एम) टीएमसीचा पराभव करू शकत नाहीत, असं सर्वसाधारण एकमत होतं. त्यामुळे, टीएमसीच्या विरोधातील मतं भाजपाला मिळाली.

काँग्रेसची अशी परिस्थिती आहे की पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुभांकर सरकार, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात चौथ्या क्रमांकावर होते. इतकंच काय, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकही सभा घेतली नाही.

नक्षलबाडी आंदोलनाचे जनक चारू मजूमदार यांचे पुत्र आणि सीपीआय (एमएल)च्या पॉलिट ब्युरोचे सदस्य अभिजीत मजूमदार म्हणतात की, त्यांना या निकालांचं आश्चर्य वाटलं नाही. मात्र भाजपाला इतका विजय मिळेल, याचा अंदाज नव्हता.

पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, Getty Images

"ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या विरोधात सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी होती. या नाराजीतून मतं आपल्याकडे वळवण्यात डाव्या विचारसरणीचे पक्ष अपयशी ठरले, यात कोणतीही शंका नाही," असं अभिजीत मजूमदार म्हणाले.

यावेळेस काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यामुळे टीएमसीच्या विरोधातील मतांची विभागणी होण्याऐवजी ती भाजपाच्या मागे एकवटली.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात राहुल गांधी यांच्या सभेच्या वेळेस मी स्वत:देखील हे अनुभवलं होतं की राहुल गांधी जेव्हा ममता बॅनर्जींवर टीका करत होते, तेव्हा लोक टाळ्या वाजवत होते. मात्र ते जेव्हा पंतप्रधान मोदींवर टीका करत होते, तेव्हा लोकांकडून खूपच थंड प्रतिक्रिया येत होती. म्हणजे सत्तेच्या विरोधातील लाट स्पष्टपणे दिसत होती.

4. मुस्लीम मतांची विभागणी?

निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषक पार्था दास यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "भाजपाच्या पाठीशी हिंदू मतं एकवटली म्हणून टीएमसीनं सत्ता गमावलेली नाही. तर मुस्लीम मतांमध्ये मोठी विभागणी झाली आहे, हे त्यामागचं कारण आहे."

"उदाहरणार्थ, तेहट्टा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या फेरीचे निकाल पाहा. भाजपाला फक्त 3 टक्के मतं मिळाली आहेत. तर डाव्या पक्षांना 34 टक्के मतं मिळाली आहेत. हा जवळपास 90 टक्के मुस्लीम बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे अखेरीस भाजपा ही जागा जिंकेल."

अभिजीत मजूमदारदेखील म्हणतात, "हिंदूंचं ध्रुवीकरण झालं आहे. मात्र मुस्लीम मतांचीदेखील विभागणी झाली आहे. तृणमूल काँग्रेसनं मुस्लीम मतांचा वापर केला, हे मुस्लीम मतांची विभागणी होण्यामागचं मुख्य कारण आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून ममता बॅनर्जी भाजपाची भीती दाखवून मुस्लीम मतं मिळवत होत्या."

"मात्र यावेळेस मुस्लिमांनी स्वतंत्रपणे मतदान केलं आहे. आयएसएफ आणि हुमायूं कबीर यांच्या पक्षाला जागा मिळण्यावरून दिसून येतं मुस्लीम मतांची विभागणी झाली आहे."

मात्र जादवपूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक अब्दुल मतीन यांना मुस्लीम मतांची विभागणी झाली आहे, असं वाटत नाही.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक मतीन म्हणाले, "हे तर मुस्लिमांनाच खलनायक करणारी गोष्ट आहे. मुस्लिमांनी आयएसएफच्या मजबूत उमेदवारांना आणि काही जागांवर हुमायूं कबीर यांच्या पक्षाला मतदान केलं. ओवेसी यांच्या पक्षाला हजार मतंदेखील मिळाली नाहीत. त्यामुळे मुस्लीम मतांची विभागणी झाली आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही."

प्राध्यापक मतीन म्हणाले, "ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाचा पराभव करण्यासाठी हिंदुत्वाचाच मुद्दा घेतला होता. ममता बॅनर्जींनी वक्फ बिलच्या विरोधात आंदोलन होऊ दिलं नाही. भाजपाच्या भीतीनं मुस्लीम ममता बॅनर्जींना आयुष्यभर मतदान करू शकत नाहीत."

"जर 70 टक्के हिंदू मतं एका पक्षाकडे गेली तर मग काय उरतं? असं असूनही मी असं म्हणू शकत नाही की भाजपाला मिळालेली हिंदू मतं सांप्रदायिक होती. त्याचा एक मोठा भाग असेल असं असू शकतं. मात्र ममता बॅनर्जी यांच्या कुशासनाच्या विरोधातदेखील मतं होती."

भाजपाला 2016 मध्ये भाजपाला फक्त 3 जागा जिंकता आल्या होत्या. तर 2021 मध्ये भाजपाला 77 जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला जवळपास 10 टक्के मतं मिळाली होती.

तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 40 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. तसंच 2021च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 38.1 टक्के मतं मिळाली होती. यावेळेस भाजपाच्या मतांची टक्केवारी 45 टक्क्यांच्या पुढे जात असल्याचं दिसतं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)