You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आम्ही 10 वर्षे कामावर जेवणाचा डबा घेऊन गेल्यानं 35 आणि 40 व्या वर्षी निवृत्त होऊ शकलो'
- Author, एलिस कँटोर
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
दर हिवाळ्यात इंग्लंडच्या दक्षिण भागातील त्यांच्या घरात अॅलन आणि केटी डोनेगन हिटर वापरत नसत.
"त्याऐवजी एकावर एक कपड्यांचे थर घालायचो, गरम पाण्याच्या पिशव्या वापरायचो. हा आमच्यासाठी एखादा खेळच बनला होता," अॅलन सांगतात.
"असं वागणं म्हणजे आमच्यासाठी दिवस काढणं नव्हतं तर तो आमच्या रणनीतीचा भाग होता."
पैशांची बचत करायच्या आमच्या या ध्यासामुळे अनेकांना आम्ही 'अति करतोय' किंवा 'वेडे' आहोत, असं वाटायचं. पण आम्ही आमच्या लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळावे या ध्येयाशी कटिबद्ध राहिलो, असं अॅलन सांगतात.
डोनेगन दाम्पत्य 7 वर्षांपूर्वी निवृत्त झालं. तेव्हा ॲलन फक्त 40 वर्षांचा आणि केटी 35 वर्षांची होती.
आम्ही कधीतरीच बाहेरून जेवण मागवायचो, ऑफिसला जाताना घरूनच डबा घेऊन जायचो. घरून डबा नेण्याच्या सवयीमुळे आम्ही 10 वर्षांत 40 हजार पाउंडांची (अंदाजे 51 लाख रुपये) बचत केल्याचं अॅलन सांगतात.
'वीज वाचवण्यासाठी घराबाहेर चार्जिंग'
वीजेची बचत व्हावी म्हणून फोन चार्जिंग देखील आम्ही बाहेरच करायचो. अनेक जण आपले सुपर मार्केटचे डिस्काउंट कुपन्स टाकून देतात. आम्ही ते शोधून काढायचो. आता हा वेडेपणा आहे की हुशारी हे तुम्ही ठरवा पण आम्हाला याचा फायदा झाला, असं अॅलन सांगतात.
अॅलन हे लाइफ कोचिंगचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी लँडस्केप गार्डनर म्हणून काम करत होते. तर केटी फायनान्स कंपनीत रिस्क अॅनालिस्ट होत्या.
2014 मध्ये अॅलन यांचं वार्षिक उत्पन्न 63 हजार पाउंड (अंदाजे 80 लाख 48 हजार रुपये) होतं तर केटी यांचं उत्पन्न 58 हजार पाउंड (अंदाजे 74 लाख रुपये) होतं.
चांगलं उत्पन्न असण्याबरोबरच, काटकसरीच्या सवयीमुळे त्यांना शक्य तितकी रक्कम गुंतवता आली. त्यामुळेच त्यांना लवकर निवृत्ती घेणं शक्य झालं.
केटी सांगतात, "आम्ही गुंतवलेल्या प्रत्येक पाउंडामुळे आम्ही आमच्या मनासारख्या आयुष्याच्या आणखी जवळ पोहोचत होतो."
त्यांच्या बचतीची रक्कम 10 लाख पाउंडांवर (अंदाजे 12 कोटी रुपये) पोहोचल्यानंतर त्यांनी काम करणं थांबवलं.
अॅलन आणि केटी हे FIRE या छोट्या पण वेगाने वाढणाऱ्या जागतिक चळवळीचा भाग आहेत.
FIRE म्हणजे "फायनान्शिअली इंडिपेन्डंट, रिटायर अर्ली" म्हणजेच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन लवकर निवृत्ती घेणं.
लवकर निवृत्तीची संकल्पना काय आहे?
सुमारे 15 वर्षांपूर्वी फार कमी लोकांना ही संकल्पना माहिती होती. पण आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरील FIRE च्या प्रमुख चर्चागटात जवळपास 10 लाख सदस्य आहेत. प्रमुख वित्तीय संस्थाही या विषयावर अनेक मार्गदर्शिका प्रकाशित करत आहेत.
या चळवळीचं मूलभूत तत्त्व म्हणजे काम करत असताना अत्यंत काटकसरीने जीवन जगायचं, जेणेकरून शक्य तितक्या लवकर निवृत्ती घेता येईल.
बहुतेक लोकांसाठी लवकर निवृत्त होण्याची कल्पना केवळ एक स्वप्न आहे. सध्याची महागाई, घरांच्या वाढलेल्या किमती आणि विद्यार्थी कर्जाचा वाढता बोजा यामुळे लोकांना कमी नव्हे, तर अधिक काळ काम करावं लागत आहे. आकडेवारीही हेच दाखवते.
अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी युनायटेड किंगडममध्ये निवृत्तीचं सरासरी वय विक्रमी पातळीवर पोहोचलं. पुरुषांसाठी ते 65.8 वर्षे, तर महिलांसाठी 64.7 वर्षे होतं.
एका अभ्यासानुसार, अमेरिकेतही 1990 च्या दशकापासून पुरुष आणि महिलांच्या सरासरी निवृत्तीच्या वयात सातत्याने वाढ झाली आहे.
2025 मध्ये पुरुषांसाठी ते 64.8 वर्षे, तर महिलांसाठी 63.3 वर्षे इतकं नोंदवण्यात आलं.
44 व्या वर्षी घेतली निवृत्ती
मात्र, 49 वर्षीय एमी मिंकलीसारखे FIRE चळवळीचे समर्थक आपल्या उद्दिष्टासाठी पूर्णपणे कटिबद्ध असतात. या अमेरिकन माध्यमिक शाळेतील शिक्षिकेने अवघ्या 44 व्या वर्षी निवृत्ती घेतली.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी जपान, सिंगापूर, भारत आणि थायलंडमधील खासगी आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये काम केलं.
त्यांच्या मते, त्यामुळे त्यांना त्यांचे मूळ राज्य टेक्सासच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळालं आणि कमी खर्चात राहणंही शक्य झालं. त्यांचा वार्षिक पगार 76 हजार अमेरिकन डॉलर (अंदाजे 72 लाख) इतका होता.
याशिवाय त्यांनी आपला खर्च शक्य तितका कमी ठेवला.
मिंकली सांगतात, "परदेशात राहणाऱ्यांची नेहमीची चैनीची जीवनशैली मला स्वीकारायची नव्हती."
त्या सांगतात, "मी क्वचितच महागडे कपडे विकत घेतले. इलेक्ट्रॉनिक उपकरणं पूर्णपणे निकामी होईपर्यंत वापरली. बहुतांश वेळा घरचंच जेवण बनवलं आणि कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी नीट विचार केला."
"सिंगापूर आणि भारतात राहताना इतरांसोबत घर शेअर केल्यामुळे मला आणखी बचत करता आली. तसेच, अनेक देशांमध्ये मला कारची गरज नव्हती. त्यामुळे माझा खर्च नियंत्रणात राहिला."
सध्या मिंकली बालीमध्ये राहतात. त्यांच्या मते, निवृत्तीच्या उत्पन्नात अमेरिकेपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे जीवन इंडोनेशियात जगता येते.
'अर्थपूर्ण ध्येय असणे महत्त्वाचे'
कॅनडातील टोरँटो येथे मुख्यालय असलेल्या वित्तीय सल्लागार कंपनीतील मुख्य बाजारपेठ धोरणतज्ज्ञ कॅरोल श्लाइफ सांगतात की, FIRE चळवळ अजूनही अनेकांसाठी व्यवहार्य पर्याय आहे.
मात्र, त्यांच्या बहुतांश ग्राहकांचं लक्ष काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात अधिक चांगला समतोल साधण्यावर असतं, असंही त्या नमूद करतात.
त्यामुळे शक्य तितक्या लवकर निवृत्ती घेण्याची घाई करण्याऐवजी अर्थपूर्ण व्यावसायिक कारकीर्द आणि आपल्या आर्थिक क्षमतेनुसार जीवनशैली यांचा समतोल साधण्यावर ते भर देतात.
श्लाइफ म्हणतात, "तुम्ही लवकर निवृत्त झालात, पण तुमचं सामाजिक वर्तुळ, चांगलं आरोग्य किंवा अर्थपूर्ण ध्येय नसेल, तर केवळ लवकर निवृत्तीचं ध्येय खरंच योग्य ठरतं का, त्यासाठी तुम्ही इतर अनेक गोष्टींचा त्याग केलेला असेल तेव्हा या पार्श्वभूमीवर स्वतःला प्रश्न विचारणे गरजेचे आहे."
"आजकाल लोक अधिक लवचिक दृष्टिकोन स्वीकारत आहेत. निवृत्तीचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतानाच आयुष्याचाही आनंद कसा घेता येईल, याचे मार्ग ते शोधत आहेत," असं त्या नमूद करतात.
'रोजचं काम संपल्यावर पार्ट टाइम जॉब करणे'
ब्रिटनमधील इनवेस्टमेंट प्लॅटफॉर्म AJ बेलच्या पर्सनल फायनान्स विभागाच्या प्रमुख सारा कोल्स यांचं म्हणणं आहे की, FIRE चळवळीचं तत्त्व प्रत्यक्षात आणणं दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. कारण बहुतांश लोकांकडे त्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता नाही.
मात्र, त्या सांगतात की, FIRE चळवळीतील काही तत्त्वं अत्यंत उपयुक्त आहेत आणि त्यांचा अवलंब केल्यास लोकांना अपेक्षेपेक्षा थोडी लवकर निवृत्ती घेणं शक्य होऊ शकतं.
उदाहरणार्थ, लहान वयापासून बचत सुरू करणं आणि प्रत्येक वेतनवाढीनंतर निवृत्तीसाठीची बचत वाढवणं.
कोल्स म्हणतात, "समतोल दृष्टिकोन स्वीकारल्यास मनावर अनावश्यक ताण न घेता, तुम्हाला हवी तशी आणि हवी त्या वेळी निवृत्ती घेणं शक्य होऊ शकतं. त्यासाठी अधिक संतुलित आणि वास्तववादी दृष्टिकोनाची गरज असते."
FIRE समुदायातील काही जण आता तुलनेने कमी कठोर मार्ग स्वीकारत आहेत. त्यामुळे "बारिस्टा FIRE" यांसारख्या उपप्रकारांची संकल्पना पुढे आली आहे. म्हणजे काम संपल्यानंतर पार्टटाइम काम करणे.
या पद्धतीत इतकी बचत आणि गुंतवणूक केली जाते की, त्यातून मिळणारं उत्पन्न दैनंदिन खर्चाचा बहुतांश भाग भागवू शकतं. उर्वरित खर्च भागवण्यासाठी अर्धवेळ काम केलं जातं.
मात्र, FIRE चळवळीचे काही समर्थक आजही अत्यंत काटकसरीलाच लवकर निवृत्तीचा मुख्य मार्ग मानतात. त्यांच्या मते, दीर्घकालीन फायद्यासाठी हा त्याग योग्य आहे.
मिंकली म्हणतात, "FIRE ची तत्त्वं अतिशय सोपी आहेत आणि ती बदललेली नाहीत. तुम्ही जितकं कमावता त्यापेक्षा कमी खर्च करा, उरलेली रक्कम गुंतवा आणि त्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ द्या."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)