'हंडाभर पाणी वाटून वाटून प्यायचं, मुलं रडली की थोडं पाजतो', मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणाशेजारचं 'तहानलेलं' गाव

  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

महाराष्ट्रात अनेक भागांत उष्णतेच्या तीव्र लाटांनी अंगाची लाही लाही होत आहे, त्याचवेळी अनेक भागांत भीषण पाणी टंचाई पहायला मिळत आहे.

मुंबई जवळच्या शहापूर तालुक्यातील दापूरमाळ या आदिवासी पाड्यात तर थेंब थेंब पाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

विशेष म्हणजे शहापूर तालुक्यातील धरणांमधूनच पूर्ण मुंबईला पाणीपुरवठा होतो. पण या धरणांपासून हाकेच्या अंतरावर असलली गावं मात्र तहानलेली आहेत.

बीबीसी मराठीनं या गावात जाऊन गावकऱ्यांशी बोलून याबाबत जाणून घेतलं.

आम्ही मुंबईहून जवळपास 120 किलोमीटरचा प्रवास करून शहापूर तालुक्यात पोहचलो. दापूरमाळ या डोंगरवरच्या आदिवासी पाड्यांपर्यंत आम्हाला पोहचायचं होतं. जाताना विहीगावपर्यंत पोहचलो आणि तिथून पुढे कोणतंही वाहनच जात नसल्याचं आम्हाला समजलं. म्हणजे इथून पुढं जवळपास चार किलोमीटरपर्यंत रस्ताच बनलेला नाही.

देश स्वतंत्र होऊन 78 वर्षं पूर्ण झाली पण या गावात पोहोचायला अजूनही रस्ता बनलेला नाही हे विशेष. सायकल किंवा दुचाकी वाहनंही गावापर्यंत जाऊ शकत नाही. गावकऱ्यांना प्रत्येक छोट्या सामानासाठी, औषधांसाठी अगदी रुग्णलायत भरती करायचं म्हटलं तरी घरापासून दीड तास चालत मुख्य रस्त्यापर्यंत पायपीट करावी लागते.

आम्हीही अशीच पायपीट करत दामूरमाळला पोहचलो. दगड आणि खडकांनी भरलेली ही पायवाट. वाटेत आम्हाला काही गावकारी भेटले. त्यांच्या हातात भाज्यांच्या पिशव्या होत्या.

"आम्ही रोज असेच जातो. काहीही सामान घेऊन जायचं झालं तर येऊन-जाऊन तीन तास चालवं लागतं. गरोदर महिलांना झोळीतून बाहेर आणावं लागतं," असं त्यांनी सांगितलं.

आम्हाला दापूरमाळ या गावी पोहचण्यासाठी तब्बल दीड तासांचा वेळ लागला. जवळपास सव्वा तीनशे लोकसंख्या असलेले दोन पाडे इथे वसलेले आहेत. रस्ता नसल्यानं गावात कोणतंही काम करायचं झालं तरी अनेक अडचणी आहेत.

त्यात गावात पाण्याची काहीही सोय नाही. रस्ता नसल्यानं पाण्याचा टँकरही इथे पोहचू शकत नाही. सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे वैतरणा धरण या गावापासून दिसतं.

अगदी काही पावलं पुढे गेलो तर वैतरणा धरण, त्याचं बॅक वॉटर आणि आसपासचा नीसर्गरम्य परिसर पहायला मिळतो.

पण इथल्या लोकांच्या वाट्याला आलेला दैनंदिन संघर्ष पाहिल्यावर मात्र निसर्ग सौंदर्याचा आनंद फार काळ टिकत नाही.

गावात पाईपलाईन पोहचलेली नाही की नळ नाही. धरण डोळ्यांसमोर दिसत असलं तरी इथलं पाणी गावकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचलेलं नाही. पण याच धरणातून मुंबईच्या कोट्यवधी जनतेपर्यंत पाणी पुरवठा केला जातो.

'धरण उशाशी आणि कोरड घशाशी', ही म्हण कदाचित या गावासाठीच तयार झालेली असावी.

पाण्यासाठीचा 'जीवघेणा' संघर्ष

दापूरमाळ गावात पोहचताच सुरुवातीला एक विहिर आहे. ही बांधलेली विहिर नाही, पण पावसाळ्यात त्यात पाणी साठवता येतं.

आम्ही पोहचलो तेव्हा काही महिला अगदी एका छोट्या टोपाने पाण्याचा हंडा भरत होत्या. एखादा हंडा भरेल इतकंच पाणी इथून मिळतं तेही एखाद्यालाच.

गावात आतमध्ये पोहचलो आणि काही गावकऱ्यांशी बोललो. गावाच्या एका बाजूने डोंगर खाली उतरला की, वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरच्या एका बाजूच्या किनाऱ्यापर्यंत पोहचता येतं असं गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं.

काही महिला पाणी भरण्यासाठी खाली उतरत होत्या, आम्हीही त्यांच्यासोबत गेलो. तळपत्या उन्हात हातात हंडा आणि काठी घेऊन, डोक्यावर कापड बांधून महिलांनी डोंगर उतरायला सुरुवात केली.

जवळपास चार किलोमीटरचा उभा डोंगर, पायवाटही मोठ-मोठ्या दगडांनी भरलेली. तोल जाईल अशी अनेक वळणं आम्हाला खाली उतरताना दिसली. लहान मुलं आणि वयोवृद्धांनाही पाणी भरण्यासाठी हा अवाढव्य डोंगर उतरावा लागतो.

पायात झिजलेली चप्पल घालून दगड आणि मोठ्या खडकांची पायवाट, तोल जाणारी वळणे पार करत, अक्षरशः जीव मुठीत घेऊन ते हा प्रवास करतात.

साधारण तासाभराच्या वेळेत आम्ही त्यांच्याबरोबर डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो.

त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. पाणी भरताना तोल जाऊन धरणात पडू नये याची खबरदारी घेत गावकऱ्यांनी आपआपले हंडे भरले. पण हे दृश्य पाहून समाधान वाटत नाही तर आणखी धडकी भरते कारण त्यांचा खरा संघर्ष इथून पुढे सुरू होणार असल्याचं दिसतं.

कारण मोकळा हंडा घेऊन डोंगर खाली उतरणं तुलनेने सोपंच म्हणायचं.

तळपत्या उन्हात डोक्यावर पाण्याने भरलेल्या एक हंड्याचं वजन पेलून पुन्हा जवळपास चार किलोमीटरचा डोंगर चढणं कठीण तर आहेच पण अधिक जिकरीचं आहे.

चढ इतका की कधीही तोल जाऊ शकतो. त्यासाठी काठीचा बीनभरवशाचा सहारा. हे सगळं पाहत असताना त्यांची हतबलता स्पष्ट दिसत होती.

या प्रवासादरम्यान कोरड्या पडलेल्या घशासाठी वाटेत काही मिनिटांची विश्रांती घेण्यासाठी गावकरी सावली पाहून थांबतात. हंड्यात भरलेलं काही पाणी वर चढेपर्यंतच संपतं.

झाडांच्या हिरव्या पानाची वाटी करायची आणि त्यातूनच पाणी प्यायलं की हंडा घेऊन पुन्हा प्रवास सुरू. ही कसरत जवळपास दीड तासांची. डोंगर पार करून घरी हंडा टेकवला की गावकरी सुटकेचा श्वास सोडतात.

म्हणजे जवळपास तीन तासांचा डोंगर उतरून आणि पुन्हा चढून एका खेपेला केवळ एक हंडाच पाणी. म्हणजे साधाराण दहा लीटर पाणी.

या प्रवासात आमची भेट येशी पारधी यांच्याशी झाली. लग्नापासून ते आता त्यांना नातवंड होईपर्यंत त्यांची पाण्यासाठीची ही पायपीट सुरूच आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना येशी पारधी म्हणाल्या, "आम्हाला करून आणल्यापासून अशीच परिस्थिती आहे. रस्ता नाही. पाणी नाही. एक हंडा पाणी मिळतं. ते आंघोळीलं, की स्वयपाकालं की पोरांच्या आंघोळ्या करायच्या की आपण आंघोळ्या करायच्या.

एका हंड्यात काय होतंय? भांडी कुंडी घासायला लागतायत. स्वयंपाक जातो. डोंगोर उतरून जातो. कसातरी एक हंडा आणतो."

एका खेपेला एकच हंडा एका कुटुंबातल्या किती जणांना पुरणार? आणि हा खडतर प्रवास दिवसातून किती वेळा करायचा?

यावर त्या सांगतात, "पाय दुखतात माणसाचं. गायी पण खाली जातात. पाणीच नाही तर गायीला कुठून देणार. कसंतरी करतात काय करायचं. कोणी येतात तेव्हा सांगतात देतू पाणी, ते कवा देतात आम्ही म्हातारी होत आलो. आमची पोरं सोरं म्हातारी होत आली. पाणी नाही. रस्ता पण नाही,"

"मतदानवाले सांगतात मतदान द्या आम्हाला. मतदान दिलं की झालं फिरून येत नाही. तसंच प्यायचं वाटून वाटून. लहान मुलं रडतात. त्याले थोडं पाजायचं."

'पाणी भरण्यातच वेळ जातो, शाळेत कधी जाणार?'

डोक्यावर हंडा घेऊन डोंगर चढत असलेली याच पाड्यातली तरुण मुलगी श्रावणी पारधी कधीही शाळेत गेली नाही. तिचं वय साधारण 26 वर्षं. सगळा वेळ पाणी भरण्यातच जातो असं ती सांगते.

"मी नाही शिकली. शाळा नाही आमच्या गावात. शाळेत कधी जायचं? पाणी भरायचं, घरचं काम करायचं. शाळेत जावं वाटलं पण शाळाच नाही. बाहेरच्या गावात जायला रस्ताच नाही. इथल्या मुली शिकल्याच नाही."

इतकंच काय तर गावात नातेवाईकांनाही येणं गैरसोयीचं, पाहुण्यांनाही पाणी भरायला घेऊन जावं लागतं असं ती सांगते.

"नातेवाईक आले की सांगतात आम्ही चालून दमतो. कोणी येत नाय इकडे. नातेवाईक येतात पण सगळ्यांना डॅमवर घेऊन जावं लागतं पाणी आणायला. इकडे कोणी जास्त दिवस राहत नाही पाणी नाही म्हणून," असं ती नाराज होऊन सांगते.

ती पुढे म्हणाली, "दिवसाचं काम काय सगळं पाण्यावारीच जातं ना. पाण्याला गेल्यावर तिकडेच टाईम होतो दुसरा काही वेळ नाही भेटत. भीती वाटते चढायला, काठी वापरावी लागते.

काठी लावल्यावर पडत नाही मग. काही जण पाण्याला गेल्यात तिकडेच पडल्याती. पाणी पण गढूळ प्यायला लागतं. दुसरं पाणी नाही आमच्याकडे,"

'डोळ्यासमोर दिसणारं पाणी मुंबईपर्यंत पोहचतं, मग आम्हाला का नाही?'

श्रावणीसारख्याच संगीता आणि चंद्रीका पारधी या तरूणपणी लग्न होऊन गावात आलेल्या महिला. त्यांच्या वाट्याला अगदी गरोदरपणातही हा संघर्ष चुकलेला नाही.

रस्ता नसल्याने डिलिव्हरीसाठी झोळीतून त्यांना रुग्णालयात जावं लागलं. संगीता यांचं तर सहा जणांचं कुटुंब. एक हंडा पाणी त्यांना कसं पुरणार?

यावर त्या सांगतात, "कसंतरी वापरायचं. लागलं तर संध्याकाळचं पुन्हा एक खेपेला जायचं. आमच्या घरी सहा जण आहेत. तसंच कसतरी भागवतो. दगडांवर पाय टेकत टेकत चढायला लागतं. पाय सरकला तर परत डबल खाली जायला लागतं. पाय सरकला की डोक्यावरून हंडा पडताय ना मग पुन्हा जायला लागतं. वझं वझं घेऊन चढायला लागतंय."

मुलांच्या शिक्षणाचं काय? शाळेत जातात का? विचारल्यावर संगीता म्हणाल्या, "शाळा येणं जाणं कठीण आहे. शाळेला पाठवत नाही. गावात शिकलीत पण नाय तेवढी. आठवी, दहावी पाचवी अशी शिकायली.

लांब पावसाचं कसं पाठवणार. ना पाणी, ना पैसे कसं जायचं. पाचवी झाली की बाहेर नाय जाता येत रस्ता नाही काय नाही."

तर चंद्रीका सांगतात की पाणी भरताना धरणात पडण्याचाही धोका असतो.

"डोंगराने कडेकडेने जायला लागतं तर भीती वाटते. पाणी भरताना अशी फरकन डायरेक्ट डॅमवर जातंय माणूस पाण्यात. डोक्यावर हंडा बारकी पोरं कमरेवर असं आणतो."

या सगळ्या गावकऱ्यांचा सरकारला एकच प्रश्न आहे की, आमच्या डोळ्यासमोर दिसणारं पाणी मुंबईपर्यंत पोहचतं मग आम्हाला का नाही?

संगीता पारधी विचारतात, "घरापासून दिसतंय पाणी पण मग येतवार नाय आम्हाला. सांगतं देऊन देऊन जातात इथून तसे परत येतच नाही. सांगतात देऊ, येतच नाही. मुंबईला जातं पण आम्हाला पाणी नाय."

तर येशी पारधी सांगतात की, "धरण आमच्या दारात हाय पण द्यायला तर पाहीजे ना आम्हालं पाणी. सरकारला आम्ही सांगतो की, आम्हाला पाणी रस्ता सोय कर सरकार बी मनावर नाय घालीत तर काय करायचं."

प्रशासनाचं काय म्हणणं आहे?

गावात रस्त्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती बीबीसी मराठीशी बोलताना तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी दिली.

एवढ्या वर्षांत साधा रस्ता सुद्धा कसा बनला नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "गेल्या दोन तीन वर्षात आम्ही प्रयत्न करतोय. दापूरमाळ पाड्यात जल जीवन मिशनच्या पाईपलाईनचं काम आम्ही सुरू केलं आहे."

"गाव दुर्गम भागात आहे. रस्ता झाला की पाण्याचा टँकर लगेच जाईल. एनजीओच्या माध्यमातून 8 ते 10 दिवसांत कच्चा रस्ता बनवायचं काम मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. तिथे मोठ्या प्रमाणात दगडांचा अडथळा आहे."

"पाण्याचा प्रश्न रस्त्यामुळे आहे. इलेक्ट्रिक मोटार तरी तिथे न्यायची कशी असे अडथळे आहेत. शहापूरसाठी भावली पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्याचं काम सुरू आहे. त्याचं 70-80 टक्के काम झालेलं आहे. ही योजना मंजूर झाल्याने दुसरीकडून पाणी देता येणार नाही."

तर दापूरमाळ गावाचे उपसरपंच अजय कथोरे यांनी याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "यापूर्वी रस्त्याला परवानगी मिळत नव्हती कारण रस्त्याची लेंथ खूप आहे. वन विभागाची परवानगी मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी वन विभागाची परवानगी मिळाली आहे."

"रस्त्याचं काम सुरू होतं. त्याच्यानंतर शासनाने रस्ता बनवण्यासाठी मार्चमध्ये प्रशासकीय मान्यता दिली. त्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्ता नसल्याने टँकर जात नाही. तत्काळ उपाययोजना करण्यासाठी बोअरवेल होत नाही कारण त्याची गाडी जात नाही रस्ता नसल्याने."

"आम्ही जल जीवन मिशनमध्ये समावेश करून घेतला आहे. मंजुरीही मिळाली आहे. धरणातून पाणी गावात पोहचवण्यासाठी वन विभागाची परवानगी हवी आहे, त्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे."

गेल्या काही दशकांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही बरीचशी कामे झाली. शहापूरच्या लगत असलेल्या पालघरमध्ये तर हायस्पीड बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. मुंबईत अगदी भुयारी मेट्रोचं जाळं पसरलं. ठाणे जिल्ह्यातही मेट्रोचं काम सुरू आहे.

मुंबईत समुद्रात कोस्टल रोड उभा राहीला. थोडक्यात काय तर तंत्रज्ञानाच्या मदतीने काही वर्षांपूर्वी आव्हानात्मक आणि अशक्य वाटणारे प्रकल्पही गेल्या दोन दशकात उभे राहीले, त्यावरून राजकारण झालं, राजकीय श्रेय सुद्धा घेण्यात आले.

पण मुंबईपासून अवघ्या 100-120 किलोमीटरवर असलेल्या गावात पोहचायला अजून साधा रस्ता होऊ शकलेला नाही. पाण्यासारख्या मुलभूत गरजेसाठीही इथल्या लोकांना दररोज भर उन्हात डोंगर चढावे आणि उतरावे लागत आहेत.

ही परिस्थिती हे अपयश कोणाचं आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यावर गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)