You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंगल असणाऱ्यांच्या शरीराचा गंध वेगळा का येतो? गंधाद्वारे आपल्याबाबत 'ही' महत्त्वाची माहिती समजू शकते
- Author, विल्यम पार्क
- Role, फीचर्स प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
आपल्या शरीरातून येणाऱ्या गंधामध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक आणि जैविक माहिती साठवलेली असते. मात्र काही कारणास्तव आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं.
फ्रान्सचा राजा लुई चौदावा याला सुगंधांचं वेड होतं. वर्सेलेसमधील प्रत्येक खोलीत देठासह असलेली फुलं सजवलेली असत.
फर्निचर आणि कारंज्यांवर अत्तरं फवारलेली असत. अगदी राजवाड्यात जेव्हा पाहुणे येत असत, तेव्हा त्यांच्यावर देखील ते शिंपडलं जात असे.
त्याची वैयक्तिक स्वच्छता आजच्या मानकांनुसार नव्हती की त्याला फक्त सुगंधांशी खेळायला, त्याच्यासोबत राहायला आवडायचं, हे माहित नाही. मात्र लुई चौदावा याला गंधाचं महत्त्व समजलं होतं.
शरीरातून येणाऱ्या गंधातून काय माहिती मिळते?
आपल्या शरीरातून जो गंध किंवा वास येतो, त्यावरून आपल्या आरोग्याविषयी माहिती मिळू शकते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाला आहे की नाही. (कॉलराला गोड वास येतो आणि तीव्र स्वरुपाच्या मधुमेहाला सडलेल्या सफरचंदांसारखा वास येतो).
"शरीरातून येणाऱ्या वासातून आपल्या आहाराविषयीची माहितीदेखील मिळू शकते," असं मेहमेट महमूट म्हणाले. ते ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी विद्यापीठात गंधज्ञान आणि वासाचे मानसशास्त्रज्ञ आहेत.
"यासंदर्भात काही अभ्यास परस्परविरोधी आहेत. मात्र माझ्या गटाला आढळलं आहे की तुम्ही जितकं जास्त प्रमाणात मांस खाता, तितकंच तुमच्या शरीराचा गंध अधिक सुखद किंवा चांगला असतो," असं मेहमेट म्हणाले.
महिलांच्या मासिक पाळीच्या फॉलिक्युलर टप्प्यात त्यांच्या शरीराचा गंध किंवा वास पुरुषांना अधिक छान किंवा आकर्षक वाटतो. या टप्प्यात महिला सर्वाधिक प्रजननक्षम असतात. तर मासिक पाळीच्या वेळेस हा वास सर्वात कमी चांगला आणि कमी आकर्षक वाटतो.
प्राचीन काळातील पूर्वजांना प्रजननासाठीचा योग्य उमेदवार ओळखण्याकरिता ही बाब कदाचित उपयुक्त ठरली असावी, असं हे संशोधन करणाऱ्यांना वाटतं.
जनुकिय रचनेवर अवलबून असतो गंध
पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉनच्या पातळीमुळे त्यांच्या शरीरातून येणारा गंधदेखील सुधारू शकतो किंवा तो चांगला होऊ शकतो.
आपल्या शरीरातून येणारा गंध किंवा वास आपण घेत असलेला आहार आणि आपलं आरोग्य यानुसार बदलू शकतो. पण त्याचबरोबर आपला गंध वैशिष्ट्यपूर्ण होतो, त्यामागे बराचसा भाग आपल्या जनुकांचा किंवा अनुवांशिकतेचा असतो.
आपल्या शरीराचा गंध अगदी विशिष्ट असतो आणि तो ओळखण्याची आपली क्षमता अतिशय अचूक असते. इतकं की अनोळखी लोकांच्या गटातील टी-शर्ट्समधून लोक एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्यांचे घामानं भिजलेले टी-शर्ट्स ओळखू शकतात.
एकसारख्या दिसणाऱ्या जुळ्या व्यक्तींच्या शरीरातून येणारा गंध इतका सारखा असतो की या प्रयोगातून टी-शर्ट्स जुळवणारे लोक, एकाच व्यक्तीच्या सारख्याच दिसणाऱ्या दोन टी-शर्ट्सनादेखील चुकून दोन जुळ्या व्यक्तींचे टी-शर्ट्स समजले.
"हे महत्त्वाचं आहे. कारण, आपल्या शरीरातून येणाऱ्या गंधावर जनुकांचा प्रभाव असतो, हे त्यातून दिसून येतं. त्यामुळे आपण कदाचित इतर लोकांच्या शरीरातून येणारा गंध घेऊन त्यांच्याबद्दलची जनुकीय माहिती ओळखू शकू," असं अग्निएस्का सोरोकोव्स्का म्हणाल्या. त्या पोलंडमधील व्रोक्लॉ विद्यापीठात मानसशास्त्रज्ञ आणि मानवी गंधज्ञानाच्या तज्ज्ञ आहेत.
सोरोकोवस्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे दाखवून दिलं आहे की एखाद्या व्यक्तीची सुंगध किंवा अत्तराविषयीची जी निवड असते, त्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं आकलन करणं शक्य आहे.
यातून असं दिसतं की लुई चौदावा याच्याकडे राजवाड्यात पाहुणे दाखल होताच त्यांना फक्त तिथल्या हवेचा वास घेऊन राजाबद्दल काही गोष्टी लक्षात आल्या असाव्यात.
इतकी सर्व माहिती आपल्या शरीरातून येणाऱ्या गंधामध्ये साठवलेली असते, मात्र ती माहिती आपल्यासाठी खरोखरंच उपयुक्त असते का?
आपल्या शरीराच्या गंधामधून काय समजतं?
एका अभ्यासात, महिलांना टी-शर्ट्स देण्यात आले. ते टी-शर्ट्स अनोळखी पुरुषांनी घातलेले होते. मग त्या महिलांना ते टी-शर्ट्स किती सुखद किंवा प्रसन्न आहेत यानुसार त्यांचा क्रम लावण्यास सांगण्यात आला. त्यांच्या पसंतीचा जो क्रम होता, तो 'ह्युमन ल्युकोसाईट अँटीजेन (एचएलए) विसंगती' या संकल्पनेनुसारच होता.
एचएलए हा प्रोटीनचा एक गट असतो. तो आपल्या रोगप्रतिकार शक्तीला, कोणत्या पेशी आपल्या आहेत आणि कोणत्या पेशी इतर कोणाच्या तरी आहेत आणि त्यामुळे त्या संभाव्य रोगजंतू किंवा सूक्ष्मजीवांच्या आहेत हे ओळखण्यास मदत करतो. एचएलएसाठी हे कोडिंग किंवा सांकेतिकीकरण करणाऱ्या या जनुकीय संकुलाला एमएचसी म्हणतात.
ते आपल्या रोगप्रतिकार प्रतिसादात वापरल्या जाणाऱ्या इतर प्रोटीनसाठीदेखील याप्रकारचं कोडिंग करतात. आपली रोगप्रतिकारक यंत्रणा कोणत्या प्रकारचं संरक्षण करू शकते किंवा कोणत्या प्रकारचा बचाव करू शकते, हे पाहण्यासाठी वैज्ञानिकांसाठी एक सोपा मार्ग म्हणून ते उपयुक्त ठरतं.
जर तुम्ही भेटत असलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा तुमचं एचएलए प्रोफाईल वेगळं असण्याची खूप शक्यता असेल, तरीदेखील तुमचे जवळचे नातेवाईक यांच्यासारखे काही लोक याबाबतीत इतरांच्या तुलनेत तुमच्याशी अधिक मिळतेजुळते असतील.
जनुकीय रचना किंवा अनुवांशिकतेच्या दृष्टीकोनातून, ज्या व्यक्तीचं एचएलए प्रोफाईन वेगळं असेल त्या व्यक्तीपासून मूल होऊ देणं फायदेशीर ठरतं.
"तुमचा जोडीदार शरीराच्या गंधाच्या बाबतीत जनुकीयदृष्ट्या आणि रोगप्रतिकार शक्तीच्या बाबतीत वेगळा असेल, तर तुमच्या मुलांमध्ये रोगजंतूंना प्रतिकार करण्याची अधिक चांगली क्षमता असेल," असं सोरोकोवस्का म्हणाल्या.
अभ्यासातील या महिलांनी ज्या पुरुषांचे एचएलए प्रोफाईल सर्वात वेगळं होतं, त्यांनी घातलेले टी-शर्ट्स पहिले ठेवले आणि ज्या पुरुषांचे एचएलए प्रोफाईल सर्वात समान होते, त्यांचे सर्वात शेवटी ठेवले.
म्हणजे त्यांना रोगप्रतिकारक शक्तीच्या अनुवांशिकतेच्या बाबतीत सर्वोत्तम जुळणारे पुरुष ओळखता आले आणि त्यांनी त्या पुरुषांनाच प्राधान्य दिलं. अर्थातच, ते नेमकं काय करत आहेत, हे त्यांना माहित नव्हतं. ते नकळत घडत होतं.
एचएलए प्रोफाईलमधील भिन्नतेमुळे शरीराचा गंध अधिक चांगला नेमक्या कोणत्या विशिष्ट यंत्रणेमुळे होते, हे अद्याप ज्ञात नाही, असं सोरोकोवस्का म्हणतात.
"मात्र असं मानलं जात आहे की, एचएलएमुळे काही विशिष्ट पदार्थांची निर्मिती होते. आपल्या त्वचेवर असणारे जिवाणू त्या पदार्थांचं विघटन करतात आणि त्यातून विशिष्ट प्रकारचा गंध निर्माण होतो," असं सोरोकोवस्का म्हणाल्या.
जोडीदाराच्या निवडीसाठी वापर नाही
शरीराच्या गंधात दडलेल्या अनुवांशिक माहितीचा वापर माणूस त्याचा जोडीदार निवडण्यासाठी करतो का? तर तसं दिसत नाही. जवळपास 3,700 विवाहित जोडप्यांवर एक अभ्यास करण्यात आला.
त्यात असं आढळलं की, लोकांचं वेगळ्या एचएलए प्रोफाईल असलेल्या जोडीदाराबरोबर लग्न होण्याची शक्यता नव्हती, ते निव्वळ योगायोगानं झालं होतं. त्यांनी ती निवड जाणीवपूर्वक केलेली नव्हती.
आपल्या विशिष्ट प्रकारचा गंध आवडू शकतो आणि त्यामागे अनुवांशिक कारणदेखील असू शकतं. मात्र लग्नासाठी जोडीदार निवडताना आपण शरीराच्या गंधाच्या आधारे निर्णय घेत नाही.
"एचएलए प्रोफाईल जोडीदाराच्या निवडीवर प्रभाव टाकत नसलं तरीदेखील, ते लैंगिक आरोग्यावर प्रभाव टाकतं," असं सोरोकोव्स्का म्हणाल्या.
ज्या लोकांना जन्मजात ॲनोस्मिया (गंधाची जाणीव न होणं) असतो, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये खूप अडचणी येतात, ते अतिशय वाईट असतात, असं मत किंवा कल्पना जर्मनीतील ड्रेसडेन विद्यापीठातील इलोना क्रॉय यांच्याबरोबर केलेल्या अभ्यासात महमूट यांनी मांडली आहे.
ज्या जोडप्यांचं एलएलए प्रोफाईल अधिक भिन्न होतं, जे कदाचित योगायोगानं घडलं असावं, त्यांच्यामध्ये लैंगिक समाधान सर्वात जास्त होतं. तसंच त्यांच्यामध्ये अपत्यप्राप्तीची इच्छादेखील सर्वाधिक होती.
महिलांमध्ये हा संबंध अधिक प्रकर्षानं दिसून आला. ज्या महिलांचा जोडीदार समान एचएलए प्रोफाईल असलेला होता, त्यांच्यामध्ये लैंगिक सुख किंवा समाधान खूपच कमी होतं आणि मूल होण्याची इच्छादेखील कमी होती.
जेव्हा अनेक अभ्यासांमधून समोर आलेल्या निष्कर्ष, पुरावे लक्षात घेण्यात येतात, तेव्हा हा परिणाम कदाचित निर्णायक ठरणार नाही.
मादाच विचारपूर्वक करतात जोडीदाराची निवड
इव्होलुशनरी बायोलॉजिस्ट म्हणजे उत्क्रांतीच्या संदर्भात सजीवांचा अभ्यास करणारे जीवशास्त्रज्ञांसाठी महिलेच्या किंवा मादेकडून निवडीवर दिलेला भर तर्कसंगत आहे. निसर्गात मादाच नरांची निवड करतात. कारण माताच मुलांच्या संगोपनात सर्वाधिक योगदान असतं.
त्यामुळे जर मादांनी अनुवांशिकदृष्ट्या निष्कृष्ट नराशी संबंध ठेवला तर तिचंच सर्वात जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे मादेला तिची निवड काळजीपूर्वक करावी लागते. म्हणूनच ती नराच्या दर्जा किंवा गुणवत्तेबद्दलची चिन्ह, संकेत शोधते.
या कारणामुळेच निसर्गात नर अनेकदा रंगीबेरंगी असतात, ते नृत्य करतात, गाणी गातात किंवा भेटवस्तू देतात. कारण त्यांना त्यांची अनुवांशिक गुणवत्ता सिद्ध करावी लागते.
शरीरातून येणाऱ्या नैसर्गिक गंधाला असणारी पसंती आणि जनुकं यांच्यातील संबंधामुळे 'टी-शर्ट स्पीड डेटिंग' आणि अगदी 'मेल ओडर' सेवांना प्रोत्साहन मिळालं. मात्र वास किंवा गंधाच्या आधारे आपण डेटिंगबाबत योग्य निर्णय घेऊ शकतो, या कल्पनेला आधार देणारे पुरावे मात्र अस्पष्ट आहेत.
आपण कदाचित असं म्हणू शकतो की, एखादी गोष्ट आपल्याला पसंत आहे. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात आपण त्या पंसतीच्या आधारे निवड करत नाही, असं दिसून येतं. असं का होतं?
वास्तविक जीवनात गंधाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा वापर नाही
वास्तविक आयुष्यातील परिस्थिती इतकी गुंतागुंतीची असते की आपण गंधाच्या माहितीची अचूकपणे वापर करू शकत नाही. आपली इतर इंद्रियं, गंधातून आपल्याला जी माहिती मिळते, त्या माहितीचा विपर्यास करू शकतात किंवा आपली दिशाभूल करू शकतात.
फक्त शरीराच्या गंधाच्या आधारे, आपण इतर लोकांच्या न्युरोटिसिझम म्हणजे स्वभाव किंवा वेगवेगळ्या भावनांचं अचूक मूल्यांकन करू शकतो. मात्र जेव्हा त्या व्यक्तीच्या फोटोसोबत त्याच्या शरीराच्या गंधाचं सॅम्पल दिलं जातं, तेव्हा 'ते गोंधळतात', त्यांची अचूकता कमी होते, असं सोरोकोवस्का म्हणतात.
"आपण फक्त चेहऱ्यांवरून न्युरोटिसिझम म्हणजे स्वभाव किंवा भावनांचं मूल्यांकन करू शकत नाही," असं त्या म्हणाल्या.
न्युरोटिझिसमचा अंदाज घेण्यासाठी शरीराचा गंध ही अचूक गोष्ट असते. मात्र चेहरे ओळखणं सोपं असतं. त्यामुळे अनेकदा आपण जे सर्वात सोपं असतं, तेच करतो, असं त्या म्हणाल्या.
आणखी एका अभ्यासात, विवाहित महिलांनी त्यांच्या पतींचे टी-शर्ट्स आणले. तर अविवाहित महिलांनी त्यांच्या निखळ मैत्री असलेल्या मित्राचे टी-शर्ट्स आणले. हे सर्व टी-शर्ट्स अनोळखी पुरुषांच्या टी-शर्ट्सबरोबर मिसळण्यात आले.
"यात विवाहित महिलांनी अशा व्यक्तीला निवडलं का, ज्याचा शरीराचा गंध त्यांना इतरांपेक्षा अधिक आवडला? तर तसं होईलच असं नाही. त्यांनी त्यांच्या जोडीदाराला पहिल्या स्थानावर ठेवलं हे दाखवणारा कोणताही निर्णायक किंवा स्पष्ट पुरावा नव्हता," असं महमूट म्हणाले.
या प्रकरणात, महिलांनी अशा पती किंवा पुरुषाची निवड केली नव्हती, ज्याच्या शरीराचा वास किंवा गंध त्यांना सर्वात चांगला वाटला होता.
टेस्टोस्टेरॉनच्या पातळीचा गंधावर होणारा परिणाम
महमूट यांनी आणखी एक स्वंतत्र अभ्यास केला. यात अनोळखी लोकांच्या शरीराचा वास विवाहित पुरुषांच्या वासापेक्षा अधिक तीव्र असल्याचं दिसून आलं.
याबद्दल ते अंदाज व्यक्त करतात की, असं होण्यामागचं कारण कदाचित असं असू शकतं की, टेस्टोस्टेरॉनची उच्च पातळी आणि शरीराचा तीव्र वास यांच्यामध्ये संबंध असल्याचे काही पुरावे आहेत.
आपल्याला हे माहिती आहे की टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणं आणि वय वाढणं यांच्यात संबंध आहे. कदाचित विवाहित पुरुषांच्या आयुष्यात चाळिशी ओलांडल्यावर ज्या गोष्टी घडतात, त्यामुळे असं होत असावं.
उदाहरणार्थ, मुलांना प्राधान्य देणं आणि त्यासारख्या गोष्टी. जे पुरुष नातेसंबंधात आहेत, आणि विशेषकरून ज्यांना मुलं आहेत, त्यांच्यामधील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते.
तर मग, आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराच्या गंध किंवा वासातून आपल्या प्रजनन क्षमतेबद्दलची माहिती मिळते. तसंच आपल्याला हेदेखील माहिती आहे की, आपण ती ओळखू शकतो. मात्र आपण त्याचा वापर करत नाही किंवा त्यानुसार कृती करत नाही. आपण तसं करायला हवं का?
"जर तुम्हाला फक्त चांगली जनुकं असणारा जोडीदार शोधण्यातच रस असेल, तर कदाचित तुम्ही फक्त त्यांच्या वासाकडेच लक्ष दिलं पाहिजे. मात्र बहुतांश लोकांसाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नसते. त्यामुळे बहुतांश लोक असं करत नाहीत," असं सोरोकोवस्का म्हणाल्या.
महमूट याच्याशी सहमत आहेत. "गंधाची उपयुक्तता किंवा महत्त्व काही प्रमाणात कमी झालं आहे. आपला खरा गंध लपवण्यात आपण हजारो वर्षे घालवली आहेत," असं ते म्हणतात.
विल्यम पार्क बीबीसी फ्युचरचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि ते @williamhpark या हँडलवरून ट्विट करतात.
हा लेख 'लॉज ऑफ अट्रॅक्शन' या मालिकेचा एक भाग आहे. बीबीसी फ्युचर आणि बीबीसी रील यांनी संयुक्तपणे या मालिकेची निर्मिती केली आहे.
या मालिकेत आपण एकमेकांना किती आवडतो, यामध्ये आपल्या इंद्रियांची काय भूमिका असते, याचा शोध घेण्यात आला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.