सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री, त्यांच्यासोबत 'या' 5 जणांनी घेतली मंत्री म्हणून शपथ

फोटो स्रोत, ANI
भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज (9 मे) कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
त्यांनी बंगाली भाषेतून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह आणखी 5 नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सुवेंदु अधिकारी यांच्यासह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशीथ प्रामाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
राज्यपाल आर. एन. रवी यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनेक वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
महत्वाचं म्हणजे हे भाजपचं पश्चिम बंगालमधील पहिलं सरकार आहे.

फोटो स्रोत, X/@narendramodi
दरम्यान, आज शपथविधी सोहळा पार पडण्यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले होते, "पश्चिम बंगालसाठी ही खरोखरच ऐतिहासिक सकाळ आहे. दूरदर्शी नेते, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सीटी ऑफ जॉय' कोलकात्यात आपले स्वागत आहे."
"हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. आज स्वातंत्र्यानंतर प्रथमच पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. आमच्या संस्थापकांची स्वप्ने साकार होताना आम्ही पाहत आहोत."
सुवेंदू अधिकारी 'असे' ठरले चेंजमेकर
सुवेंदू अधिकारी यांना 2020 पर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानलं जायचं. मात्र पक्षात अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावामुळे ते हळूहळू बाजूला पडले होते. त्यानंतर 2021च्या निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 4 महिन्यांच्या आत झालेल्या त्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपाच्या आमदारांची संख्या 3 वरून 77 पर्यंत नेली होती.
अर्थात भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यावेळेस 'अबकी बार दो सौ पार'ची घोषणा दिली होती. ते स्वप्न त्यावेळेस पूर्ण झालं नव्हतं. मात्र 3 जागांवरून 77 जागांपर्यंत मजल मारणं, हेदेखील पक्षासाठी मोठं यश होतं.
आता 5 वर्षांनी भाजपनं बंगालमध्ये 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेतून हटवून बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्ता मिळवली.

फोटो स्रोत, ANI
या विजयामुळे 'अंग-बंग आणि कलिंग' (बिहार, बंगाल आणि ओडिशा) ची सत्ता मिळवण्याचं भाजपाचं जुनं स्वप्नदेखील पूर्ण झालं आहे. यातील अंग (बिहार) आणि कलिंग (ओडिशा)ची सत्ता तर त्यांनी आधीच मिळवली होती. मात्र आता बंग म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजपा पहिल्यांदाच सत्तेत आली आहे.
पक्षाचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसारखे दिग्गज नेते प्रयत्न करतच होते. मात्र बंगालमध्ये प्रत्यक्षात पक्षाचा पाया मजबूत करत या विजयासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यात सुवेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती.
सुवेंदू यांना 2021 मध्ये जिंकल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेते करण्यात आलं होतं. त्यानंतर गेली 5 वर्षे ते सातत्यानं सरकारवर हल्ला चढवत होते. तसंच तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या भागातदेखील आंदोलनं करून भाजपाचा सातत्यानं बळकट करत होते.
सुवेंदू अधिकारी आमदार, दोन वेळा खासदार झाले आणि नंतर नंदीग्राम मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते ममता बॅनर्जी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात परिवहन मंत्री झाले होते. अशा सुवेंदू अधिकारी यांचं नाव डिसेंबर 2020 च्या आधी पश्चिम बंगालबाहेर क्वचितच माहित होतं.
मात्र त्याच महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर पक्षातील सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.
अग्निमित्रा पॉल कोण आहेत?
अग्निमित्रा पॉल या भाजपाच्या प्रमुख महिला नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना सरकारमध्ये महत्त्वाचे पद दिले जाण्याची शक्यता आहे.
अग्निमित्रा पॉल यांनी राष्ट्रीय माध्यमांमधील त्यांच्या उपस्थितीने आपली ओळख मिळवली आहे. राज्यात महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांचा अनेकदा उल्लेख केला जातो.
अग्निमित्रा पॉल यांना सरकारमध्ये महत्त्वाचे पद दिले जाऊ शकते, असं मत कोलकाता येथील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुकांतो सरकार यांनी व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Samir Jana/Hindustan Times via Getty Images
अग्निमित्रा पॉल यांनी आसनसोल दक्षिण मतदारसंघातून टीएमसीच्या तापस बॅनर्जी यांचा 40 हजारहून अधिक मतांनी पराभव केला. या विजयामुळे त्या भाजपामधील एक प्रमुख महिला नेत्या म्हणून उदयास आल्या.
त्या राजकारणात येण्यापूर्वी एक यशस्वी फॅशन डिझायनर होत्या. त्यांनी बर्दवान विद्यापीठाचा भाग असलेल्या बनवारीलाल भालोटिया कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स अँड मॅनेजमेंट सायन्सेसमधून फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केला. त्यांच्याकडे मॅनेजमेंटचीही पदवी आहे.
अग्निमित्रा पॉल यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक मेदिनीपूर मतदारसंघातून लढवली होती. त्यात त्यांचा तृणमूल काँग्रेसचे नेते जून मालिया यांच्याकडून पराभव झाला होता.
त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण मालमत्ता अंदाजे 2 कोटी 64 लाख रुपये असल्याचे जाहीर केले होते.
दिलीप घोष कोण आहेत?
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठीही घोष यांच्या नावाची चर्चा होती आणि त्यांची दावेदारीही महत्त्वपूर्ण मानली जात होती.
ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा पाया विस्तारण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात भाजपाने आपली संघटनात्मक रचना लक्षणीयरीत्या मजबूत केली. विशेषतः 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून उदयास आली.
आपल्या आक्रमक राजकीय शैलीसाठी ओळखले जाणारे दिलीप घोष आता प्रदेशाध्यक्ष नसले तरी, पक्षात एक प्रभावशाली ज्येष्ठ नेते मानले जातात.

फोटो स्रोत, Samir Jana/Hindustan Times via Getty Images
बीबीसीचे सहयोगी पत्रकार प्रभाकर मणी तिवारी यांच्या मते, "दिलीप घोष यांची पार्श्वभूमी आरएसएसची आहे. ओडिशाच्या सीमेवरील खरगपूरसारख्या भागांमध्ये त्यांनी ओबीसी आणि अनुसूचित जातींसोबत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. यामुळेच ते विजयी होत आले आहेत."
पश्चिम बंगालमध्ये आरएसएस आणि भाजपाशी संबंधित चर्चेतील व्यक्ती असेल, तर ते दिलीप घोष आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी केली होती घोषणा
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 8 मे रोजी आयोजित भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
त्यानंतर 8 मे रोजी सायंकाळी त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर भाजपाने पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन केलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपा पहिल्यांदाच सत्तेत
4 मे रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाने 293 पैकी 207 जागांवर विजय मिळवला. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले. ममता बॅनर्जी गेली 15 वर्षे राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.
मात्र, 4 मेनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या.

फोटो स्रोत, X/@narendramodi
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. यावर भाजपाने, "संविधानिक प्रक्रियेवर विश्वास ठेवणारी कोणतीही व्यक्ती अशी भूमिका घेऊ शकत नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती.
यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी 7 मे रोजी विधानसभा बरखास्त करण्याचे आदेश जारी केले. राज्यपालांच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























