किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत? वाचा एका 'लपवून ठेवण्यात आलेल्या' रहस्याबद्दल

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?
    • Author, सांगमी हान
    • Role, बीबीसी न्यूज कोरियन
    • Reporting from, सोल
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन यांच्याभोवती अनेक रहस्यं आहेत. त्यापैकी त्यांच्या आईबद्दल पाळण्यात येणारी गुप्त गोष्ट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे.

किम यांनी ते सत्तेत आल्यापासूनच्या 15 वर्षांच्या काळात सार्वजनिकरित्या एकदाही त्यांच्या आईचं नाव घेतलेलं नाही.

या वंशपरंपरागत हुकुमशाहीची वैधता 'माऊंट पाएक्टू' वंशावर अवलंबून आहे. 'माऊंट पाएक्टू' हा कोरियन द्वीपकल्पातील सर्वात उंच पर्वत आहे, त्यावरूनच हे नाव ठेवण्यात आलेलं आहे.

हा पर्वत अतिशय पवित्र मानला जातो. ते कोरियन लोकांचं पौराणिक जन्मस्थान असल्याचं मानलं जातं.

याच ठिकाणी उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांनी जपानी वसाहतवाद्यांविरुद्ध लढा दिला होता.

या राजवटीच्या वंशपरंपरेतील किंवा घराण्यातील पूर्वीच्या दोन मातांना - देशाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या आई कांग पान सोक आणि किम जाँग इल यांच्या आई किम जाँग सुक - 'कोरियाच्या माता' म्हणून आदरणीय किंवा पूजनीय मानलं जात होतं.

मात्र, त्याच्या उलट को योंग हुई (किम जाँग उन यांच्या आई) या तशा अज्ञात किंवा फारशी माहिती नसलेल्या व्यक्ती आहेत. त्यांच्या सन्मानार्थ कशालाही त्यांचं नाव देण्यात आलेलं नाही.

को योंग हुई यांच्याबद्दल किम जाँग उन किंवा सत्ताधाऱ्यांकडून बाळगण्यात आलेलं मौन, हे त्यांच्या कथित कलंकित किंवा हीन मानल्या जाणाऱ्या सामाजिक वर्गामुळे आणि त्यांच्या अंगवस्त्र (विवाह न करता सोबत राहणारी प्रेयसी) असण्याच्या दर्जामुळे असू शकतं.

विश्लेषकांना वाटतं की, हे वास्तव या राजवटीसाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळेच त्याबद्दल मौन बाळगलं जातं.

को योंग हुई यांचं कुटुंबं आणि 'झैनिची कोरियन'ची संकल्पना

चरित्रकारांनी जी माहिती एकत्र केली आहे, त्यानुसार को यांचा जन्म जपानमधील ओसाका इथं 1952 मध्ये झाला होता. त्यांचे आई-वडील मूळचे सध्याच्या दक्षिण कोरियातील, जे उत्तर कोरियाचं शत्रू राष्ट्र आहे, जेजू बेटावरचे होते.

जपानचे रहिवासी असल्यामुळे को यांच्या कुटुंबाला 'झैनिची कोरियन' मानलं जात होतं. या द्वीपकल्पावरील जपानच्या 1910-1945 या कालखंडातील वसाहतवादी राजवटीच्या काळातील स्थलांतरित कोरियन लोकांना 'झैनिची कोरियन' असं म्हटलं जातं.

उत्तर कोरियात परतलेल्या लोकांकडे सुरुवातीला मत्सरानं पाहिलं जायचं. कारण ते त्यांच्या शेजारच्या भांडवलशाही देशातून कपडे, रोख रक्कम आणि घरगुती उपकरणं घेऊन यायचे.

मात्र त्यांना 'ज्जेपो' असं म्हटलं जायचं. ही एक अपमानास्पद संज्ञा होती. जे लोक परदेशी, धोकादायक विचारसरणीनं दूषित झालेले आहेत किंवा ज्या गटांवर त्या विचारसरणीचा पगडा आहे असं मानलं जात असे, त्यांच्यासाठी ही संज्ञा वापरली जायची.

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Cheong Seong-chang

उत्तर कोरियात कठोर अशी सामाजिक वर्गीकरण किंवा उतरंड आहे. त्याला 'सोंगबुन' असं म्हणतात. या व्यवस्थेनुसार झैनिची कोरियन एका 'तरंगत्या वर्गा'त (वेवरिंग क्लास) मोडतात. म्हणजेच ते मुख्य वर्ग आणि विरोधी वर्ग यांच्यामधले थोडक्यात कुंपणावरचे मानले जातात.

त्यांच्यावर सरकारकडून कडक पाळत ठेवली जाते. त्यांना अनेकदा चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जात नाही, तसंच चांगल्या नोकऱ्या दिल्या जात नाहीत.

उत्तर कोरियामधील समाज हा अत्यंत वर्गावर आधारित असा आहे. काही विश्लेषक म्हणतात की हे एकप्रकारे जातीव्यवस्थेसारखंच आहे.

या 'व्यवस्थेत सहवासासाठीदेखील दोषी ठरवलं' जातं आणि नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या कृतीसाठी शिक्षा दिली जाते, असं डोंगयांग विद्यापीठातील डॉ. ज्युंग यंग-ते म्हणतात.

'सिंड्रेला'ची गोष्ट

को यांचं कुटुंब जेव्हा उत्तर कोरियात स्थलांतरित झालं तेव्हा त्या साधारण 10 वर्षांच्या होत्या.

जपानमधून 1959 ते 1984 दरम्यान या कम्युनिस्ट देशात स्थलांतरित झालेल्या अंदाजे 93,000 कोरियन लोकांपैकी त्यांचं कुटुंब एक होतं. 'पॅराडाईज ऑन अर्थ' म्हणजे 'पृथ्वीवरील स्वर्ग' नावाच्या मोहिमेअंतर्गत हे स्थलांतर झालं होतं. या योजनेअंतर्गत परतणाऱ्यांना मोफत आरोग्यसेवा, शिक्षण आणि नोकऱ्यांसह एक सुखद जीवन देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं.

को यांनी तत्कालीन नेते किम जाँग इल यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे को यांना त्यांच्या झैनिची कोरियन लोकांच्या वाट्याला भविष्यात येणाऱ्या कष्टमय आणि गरिबीच्या आयुष्यातून सुटका करून घेण्यात यश आलं.

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Yoji Gomi

किम यांनी त्यांची पत्नी किंवा जोडीदार जगासमोर म्हणजे सार्वजनिकरित्या कधीही समोर आणली नाही. मात्र तरीदेखील गुप्तचर माहितीतून दिसतं की किम यांचं त्यावेळेस किम यंग सूक यांच्याशी आधीच लग्न झालेलं होतं. किम यंग सूक एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याची मुलगी होती. हे स्थळ किम यांच्या वडिलांनीच निवडलं होतं.

को या 'मानसुडे आर्ट ट्रूप' म्हणजे मानसुडे कला पथकाच्या सदस्या होत्या. को यांनी त्यांच्या 'नैसर्गिक सौंदर्य आणि नृत्यकौशल्या'मुळे किम यांचं लक्ष वेधून घेतलं होतं, असं योजी गोमी म्हणतात. ते एक जपानी रिपोर्टर असून त्यांनी 2025 मध्ये को यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित केलं होतं.

या सर्वोच्च नेत्याशी त्यांनी कधीही लग्न केलं नाही. तसंच देशातील राजवटीनं त्यांच्या नात्याला कधीही मान्यता दिली नाही. मात्र तरीदेखील को एकप्रकारे 'सिंड्रेलासारखं आयुष्य' जगल्या, असं गोमी म्हणतात.

किम जाँग इल यांचं किम यंग सूक यांच्याशी आधीच लग्न झालेलं होतं. त्या एका उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्याच्या कन्या होत्या. किम इल सुंग यांनी स्वत: त्यांची निवड केली होती.

पत्नी प्योंगयांगमध्ये तर प्रेयसी वोनसानमध्ये

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वृत्तांमधून असं दिसतं की किम को यांच्या प्रचंड प्रेमात पडले होते. पुढे को यांनी देशाच्या राजकारणादेखील रस घेण्यास सुरुवात केली.

किम यांच्या अधिकृत पत्नी प्योंगयांग या राजधानीच्या शहरात राहत होत्या. त्यामुळे को आणि त्यांची तीन मुलं यांना वोनसान या किनारपट्टीच्या शहरात एकांतात, एकप्रकारे दूर ठेवण्यात आले होते. हे शहर प्योंगयांगपासून 210 किलोमीटर (130 मैल) अंतरावर आहे.

"किम जाँग उन हे किम जाँग इल यांच्या अधिकृत पत्नीपासून झालेलं अपत्य नाहीत. ते खरंतर 'को होंग हुई यांचे अनौरस पुत्र' आहेत," असं नॉर्दर्न रिसर्च असोसिएशनचे किम ह्युंग-सू म्हणाले.

"या राजवटीची 'पाएक्टू' वंशपरंपरा किंवा हा वंश अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे एखाद्या 'ज्जेपो'(परदेशी विचारसरणीनं दूषित झालेली व्यक्ती)चा मुलगा देशाचा सर्वोच्च नेता असू शकतो, ही कल्पनाच तिथे केली जाऊ शकत नाही."

जी मुलं विवाहबाह्य संबंधांमधून जन्माला येतात किंवा ज्या मुलांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या आई-वडिलांचं लग्न झालेलं नव्हतं, अशा मुलांना उत्तर कोरियात तीव्र स्वरुपाच्या सामाजिक कलंकाला, तुच्छतेला तोंड द्यावं लागतं. हा एक कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी देश असल्यामुळे तो आजही 'कन्फ्यूशियस'च्या तत्त्वज्ञानात (वैयक्तिक नीतीमूल्य, सामाजिक कर्तव्य) गुरफटलेला किंवा त्याचा प्रभाव असलेला देश आहे.

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Cheong Seong-chang

'आई-वडिलांविषयीची कर्तव्यनिष्ठा' आणि 'निष्ठा' (राजवटीबद्दलची) यासारख्या संकल्पनांचा वापर करून तिथल्या लोकांना विशिष्ट विचारसरणीचे संस्कार केले जातात. त्याचा वापर करून लोकांच्या विचारांना आकार दिला जातो आणि त्यांना आज्ञाधारक बनवलं जातं, असं विश्लेषक म्हणतात.

को यांचं जपानबद्दलचं प्रेम

किम जाँग उन राजधानीपासून दूरवरच्या ठिकाणी का वाढले, याबद्दल गोमी आणखी एक कारण देतात. त्या काळी, वॉनसान आणि जपान यांच्या दरम्यान एक फेरीबोट चालत असे. त्यामुळे को यांना त्या बोट किंवा जहाजातून येणाऱ्या लोकांना भेटणं आणि जपानी वस्तू मिळवणं अधिक सोपं होत असे.

"को यांना त्यांच्या जपानमधील घराची खूपच आठवण यायची. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलांना जपानी भाषा शिकवली होती," असं ते म्हणाले.

केंजी फुजीमोटो हे एक सुशी (सुशी हा एक पारंपारिक जपानी खाद्यपदार्थ आहे) बनवणारे आचारी होते. ते 1988 ते 2001 या काळात किम जाँग इल यांच्या सेवेत होते. केंजी यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की किम जाँग उन 'जपानी गाणी उत्तम गात असे' आणि त्याला 'जपानच्या प्रगत अर्थव्यवस्थेबद्दल मत्सर वाटत' असे.

किम जाँग उन त्यांच्या मोठ्या भावाबरोबर जपानमधील 'टोकियो डिस्नेलँड'लादेखील गेले होते, अशी माहिती त्यावेळच्या अधिकाऱ्यांचा संदर्भ देत जपानी प्रसारमाध्यमांनी दिलेली आहे.

को देखील जपानला गेल्या होत्या. त्या त्यांच्या सेक्रेटरीबरोबर स्वतंत्रपणे जपानला गेल्या होत्या, असं गोमी म्हणतात.

उत्तराधिकाऱ्याची नेमणूक

"किम इल सुंग यांनी को योंग हुई सून म्हणून कधीही मान्यता दिली नाही," असं रियू ह्यून-वू यांनी त्यांच्या 'किम जाँग उन्स सीक्रेट व्हॉल्ट' या पुस्तकात लिहिलं आहे. ते उत्तर कोरियाचे निर्वासित किंवा हद्दपार झालेले मुत्सद्दी आहेत.

जर ज्येष्ठ किम म्हणजे किम इल सुंग यांनी को यांना सून म्हणून मान्यता दिली असती, तर किम इल सुंग आणि त्यांचा नातू जाँग उन यांचे फोटो सर्वत्र प्रसारित झाले असते, असं सेजाँग इन्स्टिट्यूटचे डॉ. चेओंग सेओंग-चांग म्हणतात.

मात्र तसं घडलं नाही. तरीदेखील को यांनी किम जाँग इल यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्या देशाच्या डी-फॅक्टो फर्स्ट लेडी म्हणून वावरत होत्या. (डी फॅक्टो म्हणजे अधिकृत पद नसलं तरी त्या पदाची सर्व ताकद बाळगणं) त्या त्यांच्या पतीबरोबर लष्करी पाहणी दौऱ्यांवर जायच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी मैत्री करत होत्या.

अगदी किम धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वीदेखील को यांचं मत विचारात घेत असत, असं शेफ फुजीमोटो यांनी लिहिलं आहे.

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, KCNA via EPA

किम जाँग इल यांचा 2011 मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर एक अधिकृत माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटात तत्कालीन सर्वोच्च नेते असलेल्या किम यांच्याबरोबर को स्थानिक दौऱ्यांवर जात असल्याचे फुटेज दाखवण्यात आले होते. मात्र त्यात को यांचं नाव किंवा त्यांचा 'सोंगबुन' म्हणजे तिथल्या समाज व्यवस्थेतील त्यांचं स्थान कधीही उघड करण्यात आलं नाही.

हा माहितीपट कधीही सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आला नाही. जून 2012 मध्ये तो फक्त पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात आला होता. मात्र तरीदेखील तो नंतर लीक झाला आणि तस्करी केलेल्या यूएसबी ड्राईव्हमधून सर्वसामान्य लोकांमध्ये पसरला, असं डॉ. चेओंग म्हणाले.

"हा माहितीपट जसजसा पसरला...तसतशी को योंग हुई यांच्याबद्दल जाणून घेण्याची लोकांची उत्सुकता प्रचंड वाढली. त्यामुळे उत्तर कोरियतील राजवटीनं तो माहितीपट लगेच मागे घेतला," असं ते म्हणतात. को यांच्या पार्श्वभूमीमुळे उत्तर कोरियातील राजवटीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, असंही ते पुढे सांगतात.

मग प्रेयसीचा दुसरा मुलगा कसा बनला उत्तराधिकारी?

अनेक चरित्रकारांना असं वाटतं की को यांनी जाणीवपूर्वक किम जाँग उन यांना पुढील सर्वोच्च नेता होण्यासाठी तयार केलं होतं.

तिच्या (को) यांच्या धाकट्या बहिणीनं त्यांना सांगितलं होतं की, किम जाँग उन देशाचा पुढील सर्वोच्च नेता झाला पाहिजे नाहीतर त्यांच्या कुटुंबाला धोका असेल, असं ज्येष्ठ पत्रकार ॲना फिफिल्ड यांनी त्यांच्या 'द ग्रेट सक्सेसर: द सीक्रेट राईज अँड रूल ऑफ किम जाँग उन' या पुस्तकात लिहिलं आहे.

किम जाँग नाम हा किम जाँग इल यांचा मोठा मुलगा होता. मात्र तो सुरुवातीलाच मर्जीतून उतरला होता. कारण त्यांनी उत्तर कोरियाच्या वंशपरंपरागत पद्धतीनं उत्तराधिकारी नेमण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसंच सुधारणांचं समर्थन केलं होतं, असं गोजी म्हणतात. त्यांनी अनेक वर्षे किम जाँग नाम याच्याबरोबर ईमेलद्वारे संवाद साधला होता.

किम जाँग उन त्यांच्या आईबद्दल कधीच का बोलत नाहीत?

फोटो स्रोत, Yoji Gomi

जाँग नाम यांनी दशकभर परदेशात शिक्षण घेतलं होतं. त्यांची मतं कदाचित त्याचं फलित असू शकतं. त्यांचं फ्रेंच आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. तसंच ते कॅसिनोमध्ये वारंवार जात आणि त्यांची जीवनशैली आलिशान होती. त्यामुळे ते पार्टी करणारे किंवा मौजमजा करणारे व्यक्ती म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

जाँग नाम उत्तर कोरियात परत आल्यानंतर को योंग हुई त्यांच्या मुलांना सर्वोच्च नेतेपदासाठी म्हणजे उत्तराधिकारासाठी तयार करत असल्याचा अफवा सुरूच राहिल्या.

मात्र को यांचा मोठा मुलगा जाँग चुल याला या वारस म्हणून नाकारण्यात किंवा वगळण्यात आलं. कारण त्याला अफूचं जबरदस्त व्यसन होतं, असं रियू यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. ते माजी मुत्सद्दी आहेत. जाँग चुल यानं एकदा पहाटेच्या वेळेस त्यांच्या दारावर थाप मारून अफूची मागणी केली होती, असं ते म्हणाले.

वडिलांचा लाडका किम जाँग उन

विश्लेषक म्हणतात, किम जाँग उन हे त्यांच्या वडिलांचे लाडके बनले. कारण त्यांच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता होती आणि त्यांचा स्वभाव स्पर्धात्मक म्हणजे प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करून पुढे जाण्याचा होता.

किम जाँग उन आणि त्यांचा मोठा भाऊ स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत असताना, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी को यांची बहीण आणि तिचा पती यांच्यावर सोपवण्यात आली होती.

मात्र को यांना स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यावर हे जोडपं 1998 मध्ये अमेरिकेला पळून गेलं. या जोडप्याची 2016 मध्ये वॉशिंग्टन पोस्टच्या एका लेखासाठी त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्या लेखानुसार, "उत्तर कोरियाच्या राजवटीला फार काळ त्यांची गरज भासणार नाही," अशी त्यांना चिंता वाटत होती.

जरी किम जाँग उन उत्तराधिकारी बनले होते तरीदेखील त्यांची भीती रास्त होती असं म्हणता येईल. किम जाँग उन सत्तेत आल्यानंतर त्यांच्या एका काकांना मृत्यूदंड देण्यात आला. तर जाँग नाम यांची मलेशियामध्ये हत्या करण्यात आली.

'शंका वणव्यासारख्या पसरू शकतात'

किम जाँग इल यांच्या निधनाआधीच को यांचा मृत्यू झाला. पॅरिसमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या निधनाची दखल उत्तर कोरियाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी घेतली नाही.

विश्लेषक म्हणतात की किम जाँग उन यांचे आजोबा आणि त्यांचे वडील यांचा वाढदिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. किम जाँग उन यांचा वाढदिवस मात्र त्याप्रमाणे राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. त्यांचा गुप्त वंश म्हणजे त्यांच्या जन्माशी निगडीत गुपित हे त्यामागचं कारण असू शकतं.

त्यांच्या जन्माकडे लक्ष वेधल्यास त्यांच्या आईबद्दल तसंच किम यांचं संगोपन प्योंगयांगच्या बाहेर का करण्यात आलं, याबद्दल अवघड प्रश्न निर्माण होऊ शकतात.

"सत्य उघड झाल्यास त्याबाबतच्या शंका वणव्यासारख्या पसरू शकता," असं संशोधक किम म्हणाले.

किम जाँग उन हे जरी उत्तर कोरियाच्या सामाजिक रचनेत सर्वोच्च स्थानी असले तरीदेखील त्यांच्या सोंगबुन म्हणजे वंशपरंपरेमुळे तांत्रिकदृष्ट्या सामाजिक रचनेतील त्यांचं स्थान तुलनात्मकरित्या खालचं असेल. कारण त्यांचे संबंध झैनिची कोरियन आणि देश सोडून आलेल्या लोकांशी आहेत, असं रियू या माजी मुत्सद्द्यानं लिहिलं आहे.

किम जाँग उन यांची मुलीला उत्तराधिकारी करण्याची तयारी

किम जाँग उन यांनी त्यांच्या राजवटीच्या सुरुवातीलाच त्यांची पत्नी री सोल जू यांना सार्वजनिकरित्या समोर आणलं, यामागचं एक संभाव्य कारण त्यांचा स्वत:चा वंश किंवा त्यांच्या आई-वडिलांविषयीची गुप्तता हे असू शकतं. तसंच त्यामुळेच ते कदाचित त्यांच्या मुलीला म्हणजे जू ए हिला उघडपणे त्यांची भावी उत्तराधिकारी किंवा वारसदार म्हणून तयार करत असल्याचं दिसतं, असं चेओंग म्हणतात.

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेनुसार, री या प्योंगयांगमधील एका उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचं मानलं जातं. त्या एका प्रतिष्ठित परफॉर्मन्स ग्रपच्या माजी गायिका आहेत.

काही वृत्तांनुसार, री यांचे वडील विद्यापीठात प्राध्यापक होते. री यांना सरकारकडून चीनमध्ये शास्त्रीय गायनाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ते एका चांगल्या सोंगबुनचं निदर्शक आहे.

किम जाँग उन कधीतरी त्यांच्या आईच्या मूळ वंशाबद्दल खुलासा करतील का?

हे एक आव्हानात्मक काम असेल. अगदी उत्तर कोरियाच्या प्रोपगंडा यंत्रणेसाठीसुद्धा.

(ग्रेस त्सोई आणि लायनी बॅरन यांचं अतिरिक्त वृत्तांकन)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.