You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गर्भाशयाच्या समस्या समजायला इतकी वर्षे का लागतात? जाणून घ्या PMS आणि PCOS बद्दल
- Author, कीर्ति रावत
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
मे महिन्यामध्ये पीसीओएस (PCOS) म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे नाव बदलून पीएमओएस (PMOS) म्हणजेच पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असे करण्यात आले. हे नाव बदलण्यासाठी जवळपास तब्बल 10 वर्ष लागली.
पीएमओएस हा वास्तविक पाहता एक क्रोनिक फुल-बॉडी हार्मोनल आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजेच चयापचय विकार आहे, ज्यामुळे जगभरातील सुमारे 17 कोटींहून अधिक महिला प्रभावित आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अंदाज असा आहे की, हा त्रास असणाऱ्या जवळपास 70% महिलांना याबद्दल काहीच माहिती नसतं, ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनत जाते.
पीसीओएस (PCOS) चं नाव बदलून पीएमओएस (PMOS) करण्यामागचा उद्देश हाच आहे की, हा आजार फक्त पुनरुत्पादन क्षमता किंवा ओव्हरीपुरता (अंडाशयापुरता) मर्यादित नाही, तर तो आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम करतो.
शरीरावर याचा काय परिणाम होतो:
चयापचय आरोग्य: यात इन्सुलिन रेजिस्टन्सचा खूप मोठा धोका असतो. याशिवाय वजन वाढणं आणि टाईप 2 डायबिटीस होण्याची शक्यताही जास्त असते.
हार्मोनल बदल: यात मासिक पाळी वेळेवर न येणं आणि अँड्रोजन लेव्हल वाढणं यांसारख्या समस्या होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर डाग किंवा पुरळ उठतं आणि चेहऱ्यावर तसंच शरीरावर खूप केस येतात.
मानसिक आरोग्य: यामुळे सातत्याने चिंता वाटणे आणि नैराश्याचा धोका वाढतो.
दीर्घकालीन समस्या: जर या आजाराकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर झोप न येणं (स्लीप ॲप्निया), गरोदरपणाच्या काळात शुगर वाढणं (जेस्टेशनल डायबिटीस) आणि एंडोमेट्रियल कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
एंडोमेट्रियल म्हणजे गर्भाशयाच्या आतला सगळ्यात पहिला थर असतो, ज्यात कॅन्सरचा धोका संभवतो. पीएमओएस (PMOS) च्या लक्षणांनुसार तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. हा असा आजार आहे ज्याचा परिणाम प्रत्येक महिलेवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 1993 पर्यंत महिलांना बहुतेक सगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून बाहेरच ठेवलं जायचं. त्यानंतर आजपर्यंत मेडिकल सायन्स आणि महिलांनी खूप मोठा पल्ला गाठला आहे. पण तरीही महिलांच्या आजारांमागचं खरं कारण शोधायला 10-10 वर्ष लागत असल्यामुळे वेगवेगळ्या अडचणी अजूनही समोर येत आहेत.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचित्रा दळवी यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "मॉडर्न मेडिसिन आणि मेडिकलच्या शिक्षणात खूप वर्षांपासून पुरुषांचं शरीर, त्यांची लक्षणं आणि त्यांच्या अनुभवांनाच मुख्य मानलं गेलं होतं. पण दुसरीकडे महिलांना होणारा त्रास, थकवा, हार्मोनल बदल आणि त्यांच्या इतर अडचणींकडे मात्र बऱ्याच काळासाठी दुर्लक्ष केलं गेलं." डॉ. सुचित्रा दळवी या 'एशिया सेफ अबॉर्शन पार्टनरशिप' नावाच्या एका एनजीओसाठी सुद्धा काम करतात.
नाव बदलल्यामुळे खरंच काही फरक पडणार आहे का?
बऱ्याचदा मुलींना आणि महिलांना त्यांना नक्की काय त्रास होतो, हे समजायलाच खूप वर्ष लागतात आणि याचा सगळा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो.
मुंबईत राहणाऱ्या 43 वर्षांच्या आस्था यांच्यासोबत सुद्धा अगदी असंच झालं होतं.
बीबीसी न्यूज हिंदीसोबत आपला अनुभव शेअर करताना त्या म्हणाल्या, "मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की मला पीसीओएस (PCOS) आहे तेव्हा मी खूप लहान होते. डॉक्टरांनी मला या आजाराबद्दल काहीच न सांगता थेट गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या. पीसीओएस म्हणजे काय, तो कशामुळे होतो आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो, यातलं काहीही मला समजावून सांगण्यात आलं नव्हतं."
या सिंड्रोमचं नाव बदलल्याबद्दल आस्था यांनी आनंद व्यक्त केला आणि म्हणाल्या, "आज या आजाराबद्दल खूप जास्त माहिती उपलब्ध आहे. नाव बदलण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता. कारण आपल्याला माहीत आहे की ही समस्या फक्त ओव्हरीपुरती (अंडाशयापुरती) मर्यादित नसून हा एक संपूर्ण मेटाबॉलिक सिंड्रोम आहे." महिलांना आता हा आजार समजून घेणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं होईल, असंही आस्था यांचं म्हणणं आहे.
या म्हणाल्या, "आता हे सगळ्यांनाच समजलं आहे की पीएमओएस (PMOS) हा एक मेटाबॉलिक आजार आहे. त्यामुळे महिलांना हे समजून घेणं खूप सोपं जात आहे. आता त्या याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि त्यानुसारच त्यावर उपचारही करून घेतात. जर योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने या आजाराचं निदान झालं असतं तर परिस्थिती वेगळी असती. मला कधीही गर्भनिरोधक गोळ्या खाव्या लागल्या नसत्या." पीएमओएस संदर्भात बीबीसी न्यूज हिंदीने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दुरु शाह यांच्याशीही चर्चा केली ज्या गेल्या 11 वर्षांपासून या आजाराविषयी जनजागृती मोहीम राबवत आहेत.
डॉ. शाह यांनी सांगितलं, "आम्ही जवळपास 11 वर्षांपूर्वी 'पीसीओएस सोसायटी ऑफ इंडिया' बनवली होती. यामागचं मोठं कारण हेच होतं की, आम्हा सगळ्यांना माहित होतं की खूप साऱ्या महिलांना याचा त्रास होतोय. त्यामुळे आम्हाला वाटलं की यावर एकत्र काम करायला हवं. याच विचारातून आम्ही ही सोसायटी तयार केली आणि यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना जोडलं जेणेकरून या आजाराला प्रत्येक बाजूने समजून घेता येईल आणि महिलांना चांगली मदत करता येईल. कारण जेव्हा जेव्हा महिलांच्या आरोग्याचा विषय येतो तेव्हा अनेकदा त्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही."
त्यांचं म्हणणं आहे की, नाव बदलल्यामुळे हे समजवणं आता सोपं जाईल की पीएमओएस (PMOS) चा त्रास फक्त ओव्हरीपुरता मर्यादित नसून, त्याचा विस्तार त्याहून खूप मोठा आहे. हा आजार महिलांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो.
मेडिकल क्षेत्रातली पुरुषप्रधान मानसिकता
बऱ्याचदा महिलांना होणाऱ्या त्रासाकडे किंवा त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केलं जातं. अगदी महिला स्वतः सुद्धा स्वतःच्या तब्येतीपेक्षा घरच्यांच्या गरजांना जास्त महत्त्व देतात. वैद्यकीय क्षेत्रातही महिलांच्या आजाराची लक्षणं समजून घेण्यात चुका होतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या आजाराचे निदान उशिरा होते. याचं कारण म्हणजे आपली संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा ही महिलांच्या गरजांचा विचार करून तयार केली गेलेली नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, पुरुषांपेक्षा महिला जास्त जगतात. महिलांचं सरासरी आयुष्य 73.8 वर्ष आणि पुरुषांचं 68.4 वर्ष असतं. पण तरीसुद्धा, महिला आपल्या आयुष्यातला 25% पेक्षा जास्त काळ आजारपणात घालवतात. इंग्रजीमध्ये 'मेडिकल पेट्रियार्की' नावाचा एक शब्द आहे. याचा सोपा अर्थ असा की, मेडिकल क्षेत्रात पुरुषांची मानसिकता आणि त्यांचाच दृष्टिकोन इतका पक्का झालाय की, त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवर तर होतोच पण सोबतच वैद्यकीय संशोधनाच्या धोरणांवरही होतो.
याबद्दल डॉ. सुचित्रा दलवी यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "महिलांचे पीएमएस (PMS), पीसीओएस (PCOS) आणि इतर प्रेग्नन्सी किंवा शरीराशी संबंधित आजार उशिरा समोर येण्यामागे आपला समाज कारणीभूत आहे. यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पुरुषप्रधान मानसिकता. या पद्धतीमुळे महिलांच्या गरजांना नेहमी पुरुष आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोयीनुसारच पाहिलं गेलं." आणि या समस्या आजच्या नाही तर खूप जुन्या आहेत. अगदी सुरुवातीला तर मेडिकल कॉलेजमध्ये मुलींना शिकण्यासाठी प्रवेश सुद्धा दिला जात नव्हता.
एक उदाहरण घ्यायचं झालं तर, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये 1945 पर्यंत महिलांना प्रवेशच दिला जात नव्हता. त्यानंतर जेव्हा महिला या क्षेत्रात येऊ लागल्या तेव्हा त्यांना डॉक्टरपेक्षा नर्स किंवा केअरटेकरच्या कामासाठीच जास्त योग्य समजलं गेलं. या सगळ्या पुरुषप्रधान पद्धतीमुळे महिलांच्या आरोग्याला जे महत्त्व मिळायला हवं होतं ते मिळायला खूप उशीर झाला.
2023 मध्ये आलेल्या 'दसरा'च्या (Dasra) रिपोर्टनुसार, आरोग्य क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने काम करतात. पण मोठ्या (सीनियर) पोस्टपर्यंत पोहचणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. संपूर्ण जगात आरोग्य आणि सेवेशी संबंधित 67% कामं महिलाच करतात. पण तरीही मोठ्या पदांवर फक्त 25% महिला आहेत आणि लीडरशिपच्या बाबतीत तर ही भागीदारी केवळ 5% इतकीच आहे.
"अँन अनबॅलेंस्ड स्केल: एक्सप्लोरिंग द फीमेल लीडरशिप गॅप इन इंडियाज हेल्थकेअर सेक्टर" या रिपोर्टनुसार, आपल्या भारतातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. इथे 29% महिला डॉक्टर आहेत आणि नर्सच्या कामात तर महिलांचं प्रमाण तब्बल 80% आहे. पण जेव्हा नेतृत्व करणाऱ्या मोठ्या पदांची गोष्ट येते खासकरून एक्झिक्युटिव्ह आणि बोर्ड लेव्हलवर तेव्हा पुरुषांच्या तुलनेत महिला खूपच कमी दिसतात. या मोठ्या पोस्टवर महिला फक्त 18% आहेत. इतकंच नाही तर पुरुषांच्या बरोबरीने काम करूनही महिलांना त्यांच्यापेक्षा 34% कमी पगार दिला जातो.
डॉ. सुचित्रा यांनी सांगितलं, "आजची कामाची पद्धत पुरुषांचं शरीर आणि त्यांच्या रोजच्या दिनक्रमाचा विचार करून बनवली गेली आहे. पण महिलांच्या शरीरात दर महिन्याला हार्मोनल बदल होत असतात आणि त्यांना मासिक पाळीचा त्रास सहन करावा लागतो. या सगळ्याला जुनी ब्रिटिशकालीन व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे. त्या काळात असे नियम आणि संस्था बनवल्या गेल्या जिथे महिलांचे अनुभव, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या शरीराचा अजिबात विचार केला गेला नाही."
'दसरा' रिपोर्ट सांगतो की, "आजच्या काळातही महिलांच्या क्षमतेवर संशय घेतला जातो. महिलांचं काम फारसं गंभीर नाही, हा विचार या संपूर्ण सिस्टीममध्ये खोलवर रुजला आहे. म्हणूनच बऱ्याच ठिकाणी महिलांच्या गरजांचा विचार करून कामाचे नियम बनवले जात नाहीत."
आपण जर मेडिकल क्षेत्राचा इतिहास पाहिला तर 'हिस्टेरिया' (Hysteria) हा शब्द हे स्पष्ट करतो की वैद्यकीय क्षेत्र कसे स्त्री-विरोधी राहिले आहे. यात महिलांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास हा कोणताही ठोस विचार न करता केवळ एक मानसिक आजार असल्यासारखं ठरवून मोकळं केलं जायचं.
वैद्यकीय क्षेत्रात महिलांना खरंच योग्य स्थान मिळालं?
डॉ. सुचित्रा यांनी सांगितलं की, मॉडर्न मेडिसिन आणि वैद्यकीय शिक्षणात खूप वर्षांपासून पुरुषांचं शरीर, त्यांची लक्षणं आणि त्यांच्या अनुभवांनाच मुख्य मानलं गेलं होतं. पण दुसरीकडे महिलांना होणारा त्रास, थकवा, हार्मोनल बदल आणि त्यांच्या अडचणींकडे मात्र बऱ्याच काळासाठी दुर्लक्ष केलं गेलं. नवी दिल्लीच्या 'सेंटर फॉर यूरोगायनॉकॉलॉजी अँड पेल्विक हेल्थ'मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या महिलांच्या डॉ. करिश्मा थारियानी यांनाही असंच वाटतं. त्या सांगतात की, औषधांवर होणारे सगळे रिसर्च फक्त पुरुषांवरच केले गेले होते. कारण रिसर्च करण्यासाठी पुरुष खूप सहज मिळून जायचे.
डॉ. करिश्मा यांनी सांगितलं, "त्या काळात संशोधनामध्ये महिलांची संख्या खूप कमी असायची. पण गेल्या 20-30 वर्षांत झालेल्या अनेक रिसर्चमध्ये पुरुष आणि महिलांना बरोबरीने (सारख्याच संख्येने) सामील केलं गेलं आहे. महिलांच्या आरोग्याला गांभीर्याने घेण्याच्या दृष्टीने हा एक चांगला बदल म्हणता येईल." WHO नुसार, आजही पेल्विक तपासणीसाठी जे 'स्पेकुलम' (Speculum) नावाचं साधन वापरलं जातं ते अगदी तसंच आहे जसं ते 19 व्या शतकात पहिल्यांदा बनवलं गेलं होतं. याचा अर्थ असा की, आजच्या प्रगत युगातही आपण त्या काळातील साधनं वापरतो जेव्हा जगातील बऱ्याच देशांमध्ये महिलांना साधी मत देण्याची सुद्धा परवानगी नव्हती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, जगभरातील दर 10 पैकी 1 महिला एंडोमेट्रिओसिसने (Endometriosis) प्रभावित आहे. म्हणजेच जवळपास 19 कोटी महिला या त्रासातून जात आहेत. एक दीर्घकाळ चालणारा (क्रोनिक) आजार आहे. यात होतं काय की, गर्भाशयाच्या आतील भागासारखाच एक टिश्यू गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतो. हा चुकीच्या जागी वाढलेला टिश्यू अगदी गर्भाशयाच्या नेहमीच्या लायनिंगसारखंच काम करू लागतो.
प्रत्येक मासिक पाळीच्या वेळेस हा भाग जाड होतो आणि त्यातून रक्तस्त्राव देखील होतो. मात्र या रक्ताला शरीराबाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नाही, ज्यामुळे महिलांच्या शरीरात अंतर्गत सूज येते आणि खूप वेदना होतात. आजही या आजाराचे अचूक निदान होण्यासाठी आणि त्यावर उपचार सुरू करण्यासाठी सरासरी 4 ते 12 वर्षे लागतात. पण सुदैवाने आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे.
डॉ. सुचित्रा दलवी यांनी सांगितलं की, आता महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. स्वतः कमावत आहेत आणि आपल्या आरोग्याकडे लक्षही देत आहेत. अशा परिस्थितीत येत्या काळात वैद्यकीय क्षेत्रात महिलांच्या आरोग्याशी संबंधित होणाऱ्या संशोधनांमध्ये मोठी सुधारणा होईल अशी आशा आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)