You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमची कारच अशी ठेवू शकते तुमच्यावर नजर, नवे 'स्मार्ट' फीचर्स असे पडतात महागात
- Author, थॉमस जरमेन
- Role, बीबीसी फ्यूचर
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
कारने प्रवास करताना आपले हावभाव काय आहेत, आपण कुठे जात आहोत, आपलं वजन किती आहे, अशा आपल्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टींची माहिती किंवा डेटा आपली कार गोळा करत असते.
तज्ज्ञ सांगतात की, आपल्याशी संबंधित अशा खासगी माहितीमुळे कार विम्याचा (इन्शूरन्स) हप्ता वाढू शकतो. पण, थोडीशी काळजी घेतली तर ही माहिती किती वापरायची, यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.
एक काळ असा होता की, कार किंवा गाडी म्हणजे स्वातंत्र्य मानलं जायचं. कार मिळणं म्हणजे घरच्यांच्या नजरेपासून दूर जाऊन स्वतःच्या मनाने स्वच्छंदपणे जगता येतं, असं वाटायचं. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे.
तज्ज्ञ म्हणतात, "आधुनिक कार म्हणजे चाकांवर धावणारे कॉम्प्युटरच आहेत. मोठ्या कंपन्या त्यांचा वापर करून आपल्या वैयक्तिक आयुष्याची माहिती गोळा करत आहेत आणि त्यातून पैसे कमावत आहेत."
"कार चालवणं म्हणजे स्वातंत्र्य आणि एकांत असं तुम्हाला वाटत असेल, तर आता पुन्हा विचार करण्याची गरज आहे. पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते."
कार बनवणाऱ्या कंपन्यांची प्रायव्हसी पॉलिसी (गोपनीयता धोरण) वाचलीत, तर त्या स्वतःच सांगतात की, त्यांनी गोळा केलेल्या माहितीमध्ये प्रत्येक ठिकाणाची अचूक माहिती असते. तसेच, कारमध्ये आपल्यासोबत कोण-कोण बसलं आहे, याची माहितीही घेतात.
फक्त इतकंच नाही, तर आपण रेडिओवर काय ऐकलं, सीट बेल्ट लावला होता की नाही, याची माहितीही कार नोंदवत असते. कार किती वेगात चालवली किंवा अचानक ब्रेक लावला का, हेही कार नोंदवून ठेवते.
काही कार अशा गोष्टींचीही माहिती गोळा करतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते.
जसं की आपलं वजन, वय, चेहऱ्यावरील हावभाव यासारखी माहिती. काही वेळा तर आपण नाकाला हात लावला होता का? यासारख्या छोट्या छोट्या हालचालीही त्या नोंदवू शकतात.
काही कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटकडे कॅमेरे बसवलेले असतात. त्याचबरोबर बहुतांश कारमध्ये इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे, आपण गाडी चालवत असतानाच त्या आपला डेटा बाहेर पाठवू शकतात.
तज्ज्ञ सांगतात की, "ही गोपनीयतेशी संबंधित अशी समस्या आहे ज्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कारमधील डेटा खरेदी करणाऱ्यांमध्ये विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात असतात."
"त्या या माहितीचा वापर करून काही लोकांकडून जास्त विमा हप्ता आकारू शकतात. पण आपली खासगी माहिती नेमकी कुठे आणि कशी वापरली जात आहे, हे सांगणं कठीण आहे."
"काही कार कंपन्यांनी वैयक्तिक डेटा विकल्याचे कबूल केले आहे. जरी आपल्याला हे चिंताजनक वाटत असले तरी, या डेटाचे किंवा माहितीचे खरेदीदार कोण आहेत हे सांगण्याचे बंधन या कंपन्यांवर नाही. बहुतांश कार ग्राहकांना त्यांच्या डेटाबाबत असं काही होत आहे, याची माहितीही नसते."
अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथील ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूटमधील टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटरचे सीनियर फेलो डॅरेल वेस्ट यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, "लोकांना हे ऐकून धक्का बसेल की त्यांची कार किती प्रकारची माहिती गोळा करून इतरांना विकते. यात कार बनवणाऱ्या कंपन्या तसेच थर्ड पार्टी (तिसऱ्या पक्षाचे) ॲप्सही सहभागी असू शकतात."
ते म्हणतात, "इतका वैविध्यपूर्ण आणि तपशीलवार डेटा वापरून एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य क्षणाक्षणाला पुन्हा तयार केलं जाऊ शकतं."
अमेरिकेतील कायदे
हे ऐकून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल. पण आणखी निराशाजनक गोष्ट म्हणजे अमेरिकेतील एक केंद्रीय कायदा (यूएस फेडरल लॉ) या कारमधील डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेला आणखी वाढवू शकतो.
या कायद्यानुसार, "लवकरच, अमेरिकन कार कंपन्यांना कारमध्ये इन्फ्रारेड बायोमेट्रिक कॅमेरे आणि इतर यंत्रणा बसवाव्या लागतील. यामुळे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या हालचाली आणि हावभाव स्कॅन करता येतील.
ड्रायव्हरच्या डोळ्यांवर आणि वर्तणुकीवर लक्ष ठेवून तो दारूच्या अंमलाखाली आहे का किंवा खूप थकलेला आहे का, हेही तपासता येईल."
तज्ज्ञ इशारा देतात की, "यामुळे कार चालवणाऱ्यांच्या आरोग्य आणि सवयींबाबत खूप मोठी माहिती उपलब्ध होईल. या माहितीचा वापर कंपन्या त्यांना हवं तसं करू शकतील, कारण त्यावर नियंत्रण ठेवणारे कोणतेही स्पष्ट नियम नाहीत."
जसजशा कार कंपन्या आपला डेटा गोळा करण्याचा विस्तार करत आहेत, तसतसं कारच्या आत नेमकं काय चाललं आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं झालं आहे.
नक्कीच, इंटरनेटला जोडलेल्या कार अधिक सोयीस्कर असू शकतात. त्यातील सेन्सरमुळे ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि आरामदायक होऊ शकतं. इतकंच नाही तर, आपण चांगले ड्रायव्हर असल्याचं जाणून विमा कंपन्या आपल्याकडून कमी प्रीमियम आकारू शकतात.
तरीही, कार कंपन्यांच्या या डेटा गोळा करण्याच्या काळात पडद्यामागे नेमकं काय घडतंय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे समजून घेणं गरजेचं आहे.
इंटरनेट असलेली कार वापरताय? मग सावध व्हा
जर तुमची कार नवीन असेल, तर ती कंपन्यांच्या डेटा गोळा करण्याच्या जाळ्याचा भाग असू शकते.
कन्सल्टिंग कंपनी मॅकेन्झी यांना आढळून आलं की, "2021 मध्ये रस्त्यावर धावणाऱ्या 50 टक्के कारमध्ये इंटरनेट कनेक्शन होतं. आणि 2030 पर्यंत ही संख्या 95 टक्के पर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. म्हणजेच, जर आपली कार इंटरनेटशी कनेक्ट असेल तर गोपनीयतेबाबत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे."
त्याचबरोबर, आपण आपला फोन इन्फोटेनमेंट सिस्टिमला कनेक्ट करतो किंवा ड्रायव्हिंगसाठी काही ॲप्स वापरतो, तेव्हाही कार कंपन्या आपली माहिती गोळा करू शकतात.
खासगी किंवा वैयक्तिक डेटा गोळा करण्याच्या प्रक्रियेत ड्रायव्हरही काही प्रमाणात सहभागी होत आहेत.
काही ड्रायव्हर विमा कंपन्यांच्या टेलिमॅटिक्स सिस्टिमचाही वापर करतात. ही प्रणाली कारमध्ये बसलेल्या लोकांवर लक्ष ठेवते आणि त्याबदल्यात वापरकर्त्याला सवलत देण्याचे आश्वासन देते.
'कारची प्रायव्हसी पॉलिसी सर्वात वाईट'
2023 मध्ये 'मोझिला'ने 25 कार ब्रँड्सच्या प्रायव्हसी पॉलिसींचा अभ्यास केला. या अभ्यासात आढळून आलं की, कोणतीही कंपनी ठरलेल्या प्रायव्हसी आणि सुरक्षा मानकांवर खरी उतरली नाही.
'मोझिला'ने कारचं वर्णन 'आतापर्यंतची सर्वात वाईट प्रायव्हसी असलेली प्रॉडक्ट कॅटेगरी' असं वर्णन केलं आहे.
या अहवालानुसार, "कार कंपन्यांना लोकांची नावं, वय, वंश, वजन, आर्थिक माहिती, चेहऱ्यावरील हावभाव आणि अगदी मानसिक प्रवृत्तीसारखी अनेक प्रकारची माहिती संग्रहित करण्याचा अधिकार असतो."
उदाहरणार्थ, दक्षिण कोरियातील ऑटोमोबाइल कंपनी 'किया'च्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये म्हटलं आहे की, ते कारमध्ये असलेल्या व्यक्तीच्या 'लैंगिक जीवनाशी' आणि आरोग्याशी संबंधित माहितीही गोळा करू शकतात.
या प्रकरणात कियाचे प्रवक्ते जेम्स बेल यांनी सांगितलं की, "कंपनीने कधीही ड्रायव्हरच्या लैंगिक जीवनाची किंवा आरोग्याची माहिती गोळा केलेली नाही. कॅलिफोर्नियातील नियमांनुसार संवेदनशील माहितीची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी या गोष्टींचा पॉलिसीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे."
बेल म्हणतात की, "कियाची प्रायव्हसी पॉलिसी पारदर्शक आहे. ड्रायव्हरची परवानगी असेल तेव्हाच कंपनी हा डेटा विमा कंपन्यांसोबत शेअर करते."
पण कंपनी ते नेमका कोणता 'संवेदनशील डेटा' गोळा करतात, हे स्पष्ट केलेलं नाही.
कारमध्ये सीट, डॅशबोर्ड, इंजिनपासून ते स्टिअरिंग व्हीलसारख्या अनेक ठिकाणी सेन्सर बसवलेले असतात.
काही कारमध्ये आत आणि बाहेरही कॅमेरे असतात. त्यामुळे आजच्या कारमध्ये तुम्ही काहीही करत असाल, तर कंपन्यांना त्याची माहिती मिळण्याची शक्यता असते.
विमा कंपनीला डेटा विकला; प्रीमियम वाढला
कार कंपन्यांनी वैयक्तिक डेटा विकल्याचं एक उदाहरण जनरल मोटर्सशी संबंधित आहे. या कंपनीने लेक्सिस-नेक्सिस या डेटा ब्रोकर कंपनीला माहिती विकली. ही कंपनी डेटा खरेदी-विक्रीचं काम करते.
एका ड्रायव्हरने द न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं की, त्याला त्याच्या वैयक्तिक डेटाशी संबंधित फाईल मिळाली. ती फाईल तब्बल 130 पानांची होती. या नोंदींमध्ये सहा महिन्यांच्या काळात ड्रायव्हरने त्याच्या पत्नीबरोबर केलेल्या प्रवासाचा तपशील होता.
ड्रायव्हरने सांगितलं की, त्याचा विमा प्रीमियम 21 टक्क्यांनी वाढला. ड्रायव्हरने एका एजंटचा हवाला देत सांगितलं की, यामागे त्याचा डेटा कारणीभूत होता. परंतु, कंपनीने या प्रश्नावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
तरीही, अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने या प्रकरणात कारवाई करून जनरल मोटर्सवर 5 वर्षांसाठी डेटा विक्रीवर बंदी घातली. परंतु, त्यानंतरही कंपनी ग्राहकांची परवानगी घेऊन आणि ठराविक अटींचे पालन करून भविष्यात डेटा गोळा करू शकते.
दुसरीकडे, लेक्सिस-नेक्सिस आणि इतर कंपन्या अजूनही इतर कार उत्पादकांकडून आणि कार ड्रायव्हिंगशी संबंधित ॲप्सकडून खरेदी केलेला वैयक्तिक डेटा विकत आहेत. जनरल मोटर्स आणि लेक्सिस-नेक्सिस यांनी आमच्या प्रश्नांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
कार कंपन्यांचा डेटा गोळा करण्याबाबतचा युक्तिवाद
अमेरिकेतील कंझ्युमर फेडरेशन नावाच्या ना-नफा संस्थेसाठी काम करणारे संशोधक आणि ग्राहक हक्कांचे समर्थक वकील मायकेल डेलाँग हे ऑटो इन्शुरन्स क्षेत्रावर लक्ष ठेवतात.
"विमा कंपन्या ग्राहकांचा डेटा गोळा करून त्याचा वापर जास्त प्रीमियम घेण्यासाठी किंवा विमा कव्हरेज नाकारण्यासाठी करत आहेत," असं ते म्हणतात.
ते म्हणतात की, "कार कंपन्या सांगतात की ते हे ट्रॅकिंग ग्राहकांच्या परवानगी नंतरच करतात. पण प्रत्यक्षात ही परवानगी लांबलचक फॉर्म आणि प्रायव्हसी पॉलिसीच्या माध्यमातून घेतली जाते, जी लोकं सहसा वाचतही नाहीत."
ड्रायव्हरकडे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते पर्याय आहेत?
'मोझिला'मध्ये कार प्रायव्हसीवर संशोधन करणाऱ्या विश्लेषक जेन कॅलट्रिडर यांच्या मते, अमेरिकेत व्यापक किंवा सर्वसमावेशक प्रायव्हसी कायद्यांचा अभाव आहे. तर युरोपमध्ये काही चांगले नियम आहेत, पण तरीही ही समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.
या परिस्थितीत ग्राहकांकडे काही मर्यादित पर्याय आहेत. जेन कॅलट्रिडर यांचा सल्ला आहे की, जर प्रायव्हसीची काळजी वाटत असेल तर इन्शुरन्स टेलिमॅटिक्स प्रोग्रामपासून दूर राहणं चांगलं.
मेरीलँडमधील एका विश्लेषणात आढळून आलं की केवळ 31 टक्के ड्रायव्हर्सचा विमा प्रीमियम कमी झाला. केवळ 31 ड्रायव्हर्सना खासगी डेटामुळे कमी विम्याचा फायदा झाला, तर 24 टक्के लोकांचा प्रीमियम वाढला आणि 45 टक्के लोकांवर कोणताही परिणाम झाला नाही.
त्याशिवाय, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि काही अमेरिकन राज्यांमध्ये ग्राहक आपल्या डेटाची प्रत मागू शकतात. तो डेटा हटवण्यास सांगू शकतात आणि तो कोणाशीही शेअर करू नये, अशी विनंतीही करू शकतात.
काही कार कंपन्या प्रायव्हसी सेटिंग्सही देतात. त्या बदलून ग्राहक आपला डेटा संकलन मर्यादित करू शकतात.
तरीही, कॅलट्रिडर यांचं मत आहे की आपली गोपनीयता वाचवण्याची जबाबदारी फक्त ग्राहकांची नसावी. कंपन्यांनीच लोकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवली पाहिजे.
त्या म्हणतात की, जोपर्यंत संपूर्ण व्यवस्था बदलत नाही, ग्राहकांना डेटावर हक्क मिळत नाही आणि कंपन्यांना प्रत्येक वेळी परवानगी घ्यावी लागते, तोपर्यंत ही समस्या वाढतच राहील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.