चिकनचे पंजे खाणं सुरक्षित आहे का? आधी हे नक्की वाचा

काही देशांमध्ये चिकनचे पंजे खूप आवडीने खाल्ले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काही देशांमध्ये चिकनचे पंजे खूप आवडीने खाल्ले जातात.
    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तामिळ
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

आपल्या आहारात चिकनच्या पंजांचा (कोंबडीचे पंजे) समावेश असावा का? अनेकांना वाटतं की, कोंबडीच्या पंखासारखंच चिकनचे पंजेही खाण्यास योग्य नसतात.

पण सगळीकडेच अशी परिस्थिती नाही. सिंगापूरमध्ये चिकनचे पंजे सुमारे 276 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोच्या काही भागांमध्ये मिळणाऱ्या चिकनपेक्षाही त्यांची किंमत जास्त आहे.

जगभरात 'चिकनच्या पंज्यांना' (चिकन क्लॉज) मोठी मागणी आहे. व्हिएतनाम, चीन आणि उझबेकिस्तानसारखे देश त्यांच्या अन्नाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात चिकनचे पंजे आयात करतात.

2022 मध्ये अमेरिकेने चीनला सुमारे 1 लाख 33 हजार 700 मेट्रिक टन चिकनचे पंजे निर्यात केले होते.

जगाच्या इतर भागांमध्ये चिकनचे पंजे इतके महाग आणि लोकप्रिय का आहेत? यामध्ये कोणते पोषक घटक आढळतात?

महत्त्वाचे पोषक घटक

अनेक देशांमध्ये चिकनचे पंजे खाण्यास योग्य मानले जात नाहीत. परंतु, अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनानुसार, त्यामध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात.

जगातील सर्वात मोठा ब्रॉयलर चिकन उद्योग अमेरिकेत आहे. तिथे तयार होणाऱ्या चिकनपैकी सुमारे 15 टक्के चिकन इतर देशांना निर्यात केले जाते. यामध्ये चिकनच्या पंज्यांचाही मोठा वाटा असतो.

इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू अँड्रोस टाऊनसेंड यांनी एकदा बीबीसीला सांगितलं होतं, "चिकनचे पंजे हे चिकन विंग्जसारखेच असतात. त्यात मांस कमी असतं, पण त्याची चव खूप छान असते."

"चीन, दक्षिण आफ्रिका आणि पोर्तुगालसारख्या देशांमध्ये ते आवडीने खाल्लं जातं. शिवाय ते केवळ 20 मिनिटांमध्ये शिजतात."

चिकनचे पंजे त्वचा, हाडं, स्नायू आणि इतर ऊतींनी बनलेले असतात. एका अभ्यासानुसार, त्यामध्ये साधारण 30 ते 35 टक्के कोलेजन असतं.

चिकनच्या पंज्यांमध्ये कॅलरी, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि फोलेट (व्हिटॅमिन बी 9) सारखे पोषक घटकही आढळतात.

Caption- तज्ज्ञांच्या मते, चिकनच्या पंज्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तज्ज्ञांच्या मते, चिकनच्या पंज्यांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात.

चेन्नईतील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. श्रीविद्या यांच्या मते, "चिकनच्या पंज्यांमध्ये असलेल्या एकूण प्रोटीनपैकी सुमारे 70 टक्के भाग कोलेजनचा असतो."

डॉ. श्रीविद्या सांगतात, "चिकनच्या पंज्यांमधील कोलेजन मानवी शरीर सहजपणे शोषून घेऊ शकतं. हे कोलेजन त्वचा आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं."

त्या म्हणाल्या, "वाढत्या वयानुसार शरीरातील कोलेजन कमी होतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि सुरकुत्या दिसू लागतात. याचा परिणाम सांधे आणि हाडांच्या आरोग्यावरही होतो."

"चिकनच्या पंज्यांमध्ये आढळणारे कोलेजन आणि जिलेटिन त्वचा, सांधे, हाडं आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात", असंही त्या नमूद करतात.

ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या लोकांवर झालेल्या अभ्यासांमध्ये असं आढळून आलं की, कोलेजन घेतल्याने सांध्यांचा कडकपणा कमी होण्यास मदत होते.

श्रीविद्या सांगतात, "चिकनच्या पंज्यांमधील प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन्स (जीवनसत्वे) आणि मिनरल्स (खनिज) स्नायू आणि केसांच्या वाढीसाठीही मदत करतात."

चिकनचे पंजे खाण्याची योग्य पद्धत कोणती?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

श्रीविद्या यांच्या मते, चिकनचे पंजे व्यवस्थित स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे.

त्यांनी इशारा देत म्हटलं,"चिकनच्या पंज्यांमध्ये घाण असू शकते. ते नीट स्वच्छ न केल्यास जिवाणू (बॅक्टेरिया) संसर्गाचा धोका वाढू शकतो. फक्त धुणं पुरेसं नाही, तर बाहेरील त्वचा काढून योग्य तापमानावर शिजवणंही खूप महत्त्वाचं आहे. नीट न शिजवलेल्या पंज्यांमध्ये साल्मोनेला आणि कॅम्पिलोबॅक्टरसारखे जिवाणू असू शकतात."

इंडोनेशियातील आयपीबी विद्यापीठाचे प्राध्यापक ओनो सुपर्नो यांनी आपल्या लेखात म्हटलं की, मेंढीच्या पायांसारखेच चिकनचे पंजेही सूपसोबत खायला सर्वात चांगले लागतात.

श्रीविद्या सांगतात, "चिकनच्या पंज्यांमधील कोलेजन आणि जिलेटिन शरीराला सहज मिळावं यासाठी ते योग्य पद्धतीने शिजवलं पाहिजे. त्यामुळे सूप बनवून खाणं सर्वात चांगलं मानलं जातं. तसेच ते शोरबा (एक प्रकारचं सूप किंवा स्टू) किंवा ग्रेव्हीत घालूनही खाता येतात. पण, ते तळून खाणं टाळावं."

"तळलेले चिकनचे पंजे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि सोडियमचं प्रमाण जास्त असतं, जे शरीरासाठी चांगलं नसतं."

"चिकनच्या पंज्यांमध्ये असलेले फोलेट (व्हिटॅमिन बी 9) गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीस मदत करू शकते. मात्र, ते मर्यादित प्रमाणातच सेवन करणं महत्त्वाचं आहे. एखादी व्यक्ती 100 ते 150 ग्रॅम सूप किंवा ग्रेव्ही घेऊ शकते, जे साधारण 4 ते 5 चिकन लेग इतकं असतं," असं त्या नमूद करतात.

Caption- एका अभ्यासानुसार, चिकनच्या पंज्यांमध्ये सुमारे 30 ते 35 टक्के कोलेजन असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका अभ्यासानुसार, चिकनच्या पंज्यांमध्ये सुमारे 30 ते 35 टक्के कोलेजन असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

डॉ. अरुणकुमार यांनी बंगळुरू मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून एमडी पीडियाट्रिक्स आणि चेन्नईच्या स्टॅन्ली मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर ते सध्या इरोड येथील बेबी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट आहेत.

डॉ. अरुण कुमार सांगतात, "चिकनच्या मांसाच्या तुलनेत चिकनच्या पंज्यांमध्ये प्रोटीन कमी असतं. पण, त्यामध्ये कॅलरी आणि फॅटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे."

"उदाहरणार्थ, 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये सुमारे 160 कॅलरी, 25 ते 27 ग्रॅम प्रोटीन आणि 3 ते 5 ग्रॅम फॅट असतं. पण 100 ग्रॅम चिकनच्या पंज्यांमध्ये 200 ते 220 कॅलरीज, 15 ते 17 ग्रॅम प्रोटीन आणि 14 ते 15 ग्रॅम फॅट असतं."

"चिकनच्या पंज्यांमध्ये फक्त कोलेजन आणि जिलेटिनच नाही, तर ग्लायसिन आणि प्रोलाइनसारखे अमीनो ॲसिड देखील असतात," असंही ते नमूद करतात.

चिकनच्या पंज्यांव्यतिरिक्त, चिकन किंवा माशांच्या सूपमध्ये, माशांची त्वचा आणि डोकं, अंड्याचा पांढरा भाग तसेच चिकनची मान (नेक) यामध्येही कोलेजन आढळून येतं.

कोण, किती प्रमाणात खाऊ शकतो?

डॉ. श्रीविद्या म्हणतात, "चिकनच्या पंज्यांमध्ये असलेले फोलेट (व्हिटॅमिन बी 9) गर्भवती महिलांच्या गर्भाच्या वाढीस मदत करू शकते. मात्र, ते मर्यादित प्रमाणातच सेवन करणं महत्त्वाचं आहे.

"एखादी व्यक्ती 100 ते 150 ग्रॅम सूप किंवा ग्रेव्ही घेऊ शकते, जे साधारण 4 ते 5 चिकन लेगइतकं असतं."

"लहान मुलांना चिकनचे पंजे देताना ते नीट चावून खायला सांगावं. ज्यांना दात आलेले नाहीत किंवा गिळताना त्रास होतो, अशा मुलांना आणि दात नसलेल्या आणि गिळताना त्रास होणाऱ्या वयस्कर व्यक्तींना हे न देणं चांगलं. तसेच या पदार्थात फॅटचं प्रमाण थोडं जास्त असतं, हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे," असं त्या सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)