कुठे मुसळधार, तर कुठे तुरळक; जाणून घ्या राज्यात पावसाची स्थिती काय, कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात पाऊसाची दमदार सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली. पुढील 3 दिवस महाराष्ट्रात मान्सून मजबूत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच आज (26 जून) हवामान विभागाने राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा घाट प्रदेश, साताऱ्याचा घाट प्रदेश, पुण्याचा पठारी भाग इथे जोरदार सरी बरसू शकतात.
तर रायगड, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरमध्येही यलो अलर्ट दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यात कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस पडू शकतो.
धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणसह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, @RMC_Mumbai
रत्नागिरीत सर्वाधिक 64.9 मिमी पावसाची नोंद
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मागील 24 तासांत कोकणात रत्नागिरी येथे सर्वाधिक 64.9 मिमी पावसाची नोंद झाली. तर, गोवा (पणजी) 19.6 मिमी, डहाणू 17.6 मिमी, मुंबई (कुलाबा) 5.4 मिमी तसेच हरनाई येथे 1.4 मिमी पाऊस नोंदवण्यात आला.
मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि सातारा येथे प्रत्येकी 9.6 मिमी पाऊस, जेऊर 6 मिमी आणि सोलापूर 4.2 मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिवमध्ये 30 मिमी, नांदेडमध्ये 17 मिमी, तर विदर्भात वर्धा येथे 27.2 मिमी आणि अकोला येथे 1.4 मिमी पाऊस नोंदवण्यात आला.
पुढच्या 2 आठवड्यांसाठीचा अंदाज
हवामान विभागानं जारी केलेल्या एक्स्टेंडेड रेंज फोरकास्ट म्हणजे विस्तारीत अंदाजानुसार पुढचे 2 आठवडे राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. पण कुठे किती पाऊस पडेल?
तर 25 जून ते 2 जुलैदरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तर भाग आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तर त्यापुढील आठवड्यात म्हणजे 2 जुलै ते 9 जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा बराच जास्त तर मराठवाड्यातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
थोडक्यात पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं, पण त्यानंतरच्या आठवड्यात थोडी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
यात स्थानिक पातळीवर पावसाचं प्रमाण वेगवेगळं राहू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना आपापल्या विभागासाठी जारी केलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























