मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळल्याची घटना; काही जण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

इमारत कोसळली
फोटो कॅप्शन, इमारत कोसळली
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी कचरा डेपो परिसरात ग्राउंड फ्लोअर प्लस दोन मजली (G+2) आरसीसी संरचनेतील कॅन्टीन व कार्यालयाची इमारत जमिनीखालील पाया खचल्यामुळे कोसळली आहे.

घटना दुपारच्या जेवणाच्या वेळेत घडल्याने अनेक कर्मचारी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

या इमारतीखाली पंधरा जण अडकल्याची शक्यता आहे. तर चार जणांना बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही कर्मचाऱ्यांचे आवाज ऐकू येत असून ते जिवंत असल्याचे निदर्शनास येत आहे. बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोशी दुर्घटना : बचावकार्य युद्धपातळीवर; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या तातडीच्या सूचना

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी कचरा डेपो येथे सुरू असलेल्या बांधकामादरम्यान कचऱ्याच्या डोंगराचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) तसेच अन्य बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन बचाव व मदतकार्य सुरू केले आहे.

मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळली
फोटो कॅप्शन, मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळली

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव विनिता वेद सिंगल, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या.

दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच जखमींवर तातडीने आणि प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत.

सलग तिसऱ्या दिवशी आळंदीत इंद्रायणी नदीला पूर

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे.
फोटो कॅप्शन, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील बंधारा फुटला आहे. या घटनेमुळे परिसरात पाणी शिरला आहे. लोकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं.

कर्जतच्या पेठ-आंबिवली गावातील चिल्हार नदीवरचा छोटा बंधारा होता. जामरूंग, सोलनपाडा आणि पेठचा किल्ला ही पर्यटनस्थळे या गावाजवळच आहेत.

बुधवारी मुंबईसह किनारपट्टीतल्या भागात पावसाला सुरुवात झालीय.

मात्र, मुख्यमंत्री कार्यलयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला.

विशेषतः खानदेश (धुळे व नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर व सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.

सलग तिसऱ्या दिवशी आळंदीत इंद्रायणी नदीला पूरस्थिती

सलग तिसऱ्या दिवशी आळंदीत इंद्रायणी नदीला पूरस्थिती आहे. बुधवारी, 8 जुलै रोजी पुराचं पाणी काही प्रमाणात कमी झालेलं दिसलं. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरील पाणीही ओसरलं आहे.

मात्र, नदीच्या पाण्याचा वेग अजूनही जास्त आहे. तसंच पुलाचे कठडे वाहून गेल्याने तो ओलांडणं धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी हा पूल अद्याप खुला करण्यात आलेला नसल्याचं आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

पुराचं पाणी कमी होईपर्यंत मंदिराकडे जाणारे पूल बंदच ठेवावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं.

आळंदी

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या प्रस्थान करण्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. राज्य सरकारने 6 जुलै रोजी वारकऱ्यांना आळंदी आणि देहूकडे न जाता, जिथे आहेत तिथेच सुरक्षित ठिकाणी किंवा पुण्यात थांबण्याचं आवाहन केलं होतं.

मात्र, राज्याच्या विविध भागांतून काही दिंड्या आणि वारकरी देहू आणि आळंदीकडे रवाना झाले होते. सध्या आळंदीत काही वारकरी आहेत ज्यांच्या दिंड्या मंदिराजवळ आहेत, मात्र हे लोक नदीच्या दुसऱ्या बाजूला असल्याने त्यांना तिथे जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था झालेली नाही. जेवण आणि पाणीही त्यांना विकत घ्यावं लागत असल्याचं ते सांगतात.

स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही व्यवस्था अपुरी असल्याचं वारकरी सांगत आहेत.

आज, बुधवारी 8 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठी केवळ 1,660 वारकऱ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.

पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; राज्यातील पावसाचा अंदाज जाणून घ्या

तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहू शकते.

शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तेथील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट

फोटो स्रोत, DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज (8 जुलै) पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.

यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

खडकवासला धरण

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

फोटो कॅप्शन, खडकवासला धरण

या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या. नदीपात्रालगत तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

महापौर म्हणाल्या, "पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल."

पुढील पाच दिवसांचा कसा आहे अंदाज?

मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, विविध भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 7 जुलै रोजी पालघर, नाशिक घाट आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

7 जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरघाट,अहिल्यानगर, धुलेजळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

फोटो स्रोत, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य

फोटो कॅप्शन, मुंबई वेधशाळेने राज्यासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे.

8 जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.

9 जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

10 जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. 11 जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)