वैभव सूर्यवंशी : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 'बेबी बॉस'च्या खेळण्याची चर्चा होण्याचं 'हे' आहे कारण

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Oli SCARFF / AFP via Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आयपीएलमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता 'बेबी बॉस' अशी ओळख मिळवलेला वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी कधी खेळणार? असाच प्रश्न चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये वैभव सूर्यवंशीटी संघात निवड झाली. पण अंतिम 11 मध्ये तो अद्याप खेळलेला नाही.

त्यामुळं अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनावर टीकाही केली आहे.

थोड्याच वेळात भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मात्र टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी वैभव सूर्यवंशी या सामन्यातही खेळणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

मॉर्ने मॉर्केल यांनी म्हटलं की, टॉप ऑर्डरमधील फलंदाज (संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन) यांपैकी कोणालाही वगळले जाणार नाही.

गेल्या काही महिन्यांपासून संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मॉर्केल म्हणाले, "संजू सॅमसन टी-20 विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. आयपीएल हंगामही त्याच्यासाठी चांगला ठरला. प्रशिक्षक म्हणून आम्हाला आमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे.

एक युवा खेळाडू संधीची वाट पाहत आहे आणि तो अत्यंत रोमांचक आहे. मात्र आम्हाला केवळ टॉप ऑर्डरचा नव्हे, तर संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो."

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

मॉर्केलनं म्हटलं की, त्यांनी वैभवला नेट्मध्ये सराव करताना पाहिलं असून, त्यानं त्यांना खूप प्रभावित केलं आहे. वैभवनं इतर खेळाडूंशी चांगला रॅपो बनवला आहे. त्यामुळं जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

इंग्लंड विरोधातील टी-20 मालिकेबाबत बोलायचं झाल्यास, पहिला सामना पावसामुळं रद्द झाला होता.

दुसरा सामना आज (4जुलै) मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या टी-20 मालिकेत एकूण पाच सामने खेळवले जाणार आहेत.

पण या सामन्यापूर्वी वैभव सूर्यवंशीच्या एका पोस्टने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

वैभवने एका फोटोसह फक्त दोन शब्द पोस्ट केले आहेत. 'New Chapter' असं त्यानं पोस्ट केलं. पण या पोस्टमधून तो नेमका कोणत्या नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे, याचे स्पष्ट संकेत मिळत नाही.

त्यामुळं या गूढ पोस्टबाबत टॉस होईपर्यंत काही स्पष्ट समजणार नाही. कारण त्यावेळीच अंतिम प्लेइंग इलेव्हन कोण हे स्पष्ट होईल.

'आयर्लंडविरुद्ध संधी मिळायला हवी होती'-डिव्हिलियर्स

वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पणाची संधी न मिळाल्यामुळं टीम मॅनेजमेंटवर सातत्यानं टीका होत आहे. त्यात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स यांनंही आता यावर भाष्य केलं आहे.

ए. बी. डिव्हिलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटलं की, "तो कधी खेळणार? माझ्या मते आयर्लंडविरुद्धची मालिका वैभव सूर्यवंशीसाठी योग्य संधी होती. त्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळाला असता."

"दुर्दैवानं त्याला संधीच मिळाली नाही. टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोसचेट यांच्या सूर्यवंशीला इतर खेळाडूंप्रमाणे प्रक्रियेतून जावं लागंल, या मताशी मी सहमत नाही."

"आयपीएलमध्ये त्यानं ज्या प्रकारे खेळ केला, ते पाहता त्याला मैदानात उतरवण्याची हीच योग्य वेळ होती. विशेषतः आयर्लंडसारख्या कमी रँकिंगच्या संघाविरुद्ध त्याला खेळवून अनुभव देता आला असता."

डिव्हिलीयर्स

फोटो स्रोत, Alex Davidson-ICC/ICC via Getty Images

काही वृत्तांनुसार, टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोसचेट यांनी म्हटलं होतं की, "तो (वैभव सूर्यवंशी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार आहे, यात कोणतीही शंका नाही. पण संजू सॅमसन हा तोच खेळाडू आहे ज्यानं तीन महिन्यांपूर्वी विश्वचषक जिंकण्यात मोठे योगदान दिलं."

भारतीय संघ आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका 2-0 ने हरला होता. तर इंग्लंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला होता.

ए.बी.डिव्हिलियर्सच्या मते, "टीम इंडियाला अजून बरीच मेहनत करायची आहे. त्यांना इंग्लंडमध्ये कामगिरी करण्याचा मार्ग शोधावा लागेल. तिथे खेळणं सोपं नाही. तिथं आयपीएलसारखं वातावरण नसतं. तिथं सहज 250-260 धाना होत नाहीत."

"तिथं 140 किंवा 160 धावा होतात आणि रणनीती व योग्य डावपेचांची गरज असते," असंही डिव्हिलियर्सनं म्हटलं.

टीम मॅनेजमेंटवर टीका

आयर्लंडविरुद्ध वैभवला संधी न दिल्याबद्दल अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी टीम मॅनेजमेंटवर टीका केली आहे.

सुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि मोहम्मद कैफ यांसारख्या अनुभवी खेळाडूंनीही वैभवला न खेळवण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

रवी शास्त्री यांनी म्हटलं होतं की, आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीला संधी मिळायला हवी होती. तसंच त्याला लवकरात लवकर अंतिम संघात स्थान द्यायला हवं.

"त्याने आयपीएलमध्ये सगळ्यांची धुलाई केली आहे. कोणत्या वेगवान गोलंदाजाला त्यानं सोडलं? आणि इथे तुम्ही त्याला बाकावर बसवता," असं रवी शास्त्री म्हणाले होते.

ते पुढे म्हणाले, "तो फक्त 15 वर्षांचा आहे. त्याच्या मनात कोणतीही भीती नाही. तो 2-3 ओव्हर्स टिकला तरी अशी सुरुवात करून देतो की मधल्या फळीला त्याचा फायदा होतो. त्याच्यासाठी संघात जागा निर्माण करावीच लागेल."

गावस्कर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुनील गावस्कर

दरम्यान, इंग्लंडचा सध्याचा कर्णधार हॅरी ब्रूकही वैभवच्या खेळाने प्रभावित झाल्याचं दिसलं.

सामन्यापूर्वी तो म्हणाला, "तो जबरदस्त खेळाडू आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने जे साध्य केले आहे, ते अप्रतिम आहे. आम्ही त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहोत. जर तो खेळला, तर आमच्याकडे त्याच्यासाठी योजना तयार आहे. आम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील, तरच विजयाची संधी मिळेल."

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं, "भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीला आपण विचारायला हवे की त्याला आयर्लंडविरुद्ध का खेळवले गेले नाही?"

त्यांच्यासोबत उपस्थित असलेले इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू अॅलिस्टर कुक म्हणाले, "मी तर उद्या एक चाहता म्हणून त्याचा खेळ पाहायला जाणार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.