जुलै महिना येऊनही मराठवाडा, विदर्भात सरासरीएवढाही पाऊस झाला नसण्यामागे 'ही' आहेत कारणं

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

जून महिन्यातील पावसाची तूट जुलै महिन्यात भरून निघेल अशी अपेक्षा होती. त्यानुसार महाराष्ट्रात कोकण, मुंबईसह घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झालाही.

पण, मराठवाडा आणि विदर्भ अजूनही कोरडाच आहे. या विभागांमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

मराठवाडा आणि विदर्भात एक-दोन जिल्हे वगळता अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या विभागांमध्ये सगळीकडेच पावसाची तूट आहे.

विदर्भात 1 जून ते 10 जुलैपर्यंत 18 टक्के कमी पाऊस झाला आहे. जुलै महिना आला तरी अद्यापही या दोन्ही भागात पावसाची तूट का आहे? यामागे नेमकं कारण काय आहे? मराठवाडा आणि विदर्भात एल निनोमुळे कमी पाऊस पडतोय का? पाहुयात.

एल निनोचा मान्सूनवर परिणाम होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं आधीच वर्तवला होता.

जून महिन्यात त्याचा परिणामही दिसला. पण, जुलै महिन्यात महाराष्ट्रातील कोकणासह मुंबई आणि घाट माथ्यावर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आपल्याकडेही पाऊस येईल अशी आशा मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांना होती.

पण, त्यांची निराशा झाली. जुलै महिन्यात काही जिल्ह्यांमध्ये थोडा पाऊस झाला. पण, तो देखील सरासरीपेक्षा कमीच आहे.

विदर्भात कोणत्या जिल्ह्यांत पावसाची तूट?

जून महिन्यात विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांत 39 टक्के पावसाची तूट होती. पण, जुलै महिन्याच्या सुरुवातीला गोंदियात दमदार पाऊस झाला.

तसेच बुलढाण्यात पावसानं सरासरी गाठली. पण, तीदेखील काठावर पास झाल्यासारखी आहे. इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची तूट कायम आहे.

सगळ्यात जास्त म्हणजे 46 टक्के पावसाची तूट ही गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडत असतो. पण, यावर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक तूट याच जिल्ह्यात आहे.

त्यानंतर भंडारा जिल्ह्यात 34 टक्के तूट आहे, तर पश्चिम विदर्भातील वाशिममध्ये 29 टक्के पावसाची तूट आहे.

पावसाची ही तूट फक्त एक किंवा दोन दिवसांच्या पावसात भरून निघेल असं नाही. यासाठी चांगल्या दमदार पावसाची गरज आहे.

पण, जुलै महिन्यात देखील पाऊस कमीच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची तूट भरून निघेल का हा प्रश्न आहे.

मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची तूट?

मराठवाड्यात जून महिन्यात पाऊस कमीच झाला. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात पावसाची तूट होती.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसात छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची तूट भरून निघाली. पण, इतर जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.

1 जून ते 10 जुलैच्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात सर्वाधिक तूट हिंगोली जिल्ह्यात 54 टक्के एवढी आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 46, जालना 39, नांदेड आणि परभणी याठिकाणी सरासरीपेक्षा 37 टक्के पावसाची तूट आहे.

एकूण महाराष्ट्रातील पावसाची आकडेवारी पाहिली तर नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाची तूट आहे.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पावसाची तूट ही नंदुरबार जिल्ह्यात असून इथे सरासरीपेक्षा 72 टक्के कमी पाऊस झाला आहे.

जुलै महिना येऊनही तूट का?

कोकण, मुंबई आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस कोसळतो. तेच ढग पुढे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याकडे सरकतात त्यावेळी मधली बाष्प कमी होत जातं.

त्यामुळे तुलनेनं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या भागात कमी पाऊस होतो. कारण, हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

पण, जुलै महिन्यापर्यंत नद्या, नाले दुथडी भरून वाहू शकतील इतका पाऊस पडलेला असतो.

मग यंदा जुलै महिना आला तरी पावसाची तूट का भरून निघलेली नाही? याबद्दल आम्ही भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांशी बोललो.

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविणकुमार पाऊस कमी पडण्यामागची चार कारणं सांगतात.

पहिलं कारण : बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात जास्तीत जास्त पाऊस पडतो.

जून महिन्यात एकदाही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं नाही. त्यामुळे जून महिन्यात पावसात खूप तूट पडलेली आहे.

जुलैमध्ये बंगालच्या उपसागरात दोनवेळा कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातल्या गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि पूर्व यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या भागात जुलै महिन्यात व्यवस्थित पाऊस झाला.

पण, कमी दाबाचं क्षेत्र लवकरच कमजोर झालं. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पश्चिम भारतात राजस्थान, गुजरातपर्यंत सरकतं.

पण, यावेळी कमी दाबाचं क्षेत्र जमिनीवरच लवकरच कमजोर झालं. तसेच ते क्षेत्र उत्तर-मध्य प्रदेशच्या बाजूने गेलं. एऱ्हवी कमी दाबाचं क्षेत्र सेंट्रल मध्य प्रदेशातून जाते. त्यामुळे या भागामध्ये कमी पाऊस झाला.

दुसरं कारण : इंडियन ओशियन डायपोल न्युट्रल फेजमध्ये होते. (इंडियन ओशन डायपोल (IOD) हा हिंदी महासागरातील समुद्रपृष्ठावरील तापमानातील (Sea Surface Temperature) फरक दर्शवणारा हवामानाचा महत्त्वाचा घटक आहे.)

तिसरं कारण : मेडेन ज्युलिएन ऑसिलेशन यासाठी सुद्धा पोषक वातावरण नव्हतं. (मेडेन-ज्युलियन ऑसिलेशन ही विषुववृत्ताजवळ (Equator) पूर्वेकडे सरकणारी ढग, पाऊस आणि वाऱ्यांतील बदलांची लाट आहे. ही लाट साधारण 30 ते 60 दिवसांच्या कालावधीत पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करते. त्यामुळे तिला 30–60 दिवसांचे हवामान चक्र असेही म्हटले जाते.)

चौथं कारण : याबरोबरच भारतीय हवामान विभागानं एल निनोचा मान्सूनवर परिणाम होईल असं सांगितलं आहे. त्यामुळे देखील हा पाऊस कमी पडलेला असू शकतो.

पण, एल निनो आहे म्हणजे पाऊस पडणारच नाही असं नाही. फक्त जो सलग पाऊस पडतो तसा पडणार नाही. पावसात मध्ये मध्ये खूप दिवसांचा खंड सुद्धा पडू शकतो. हंगाम संपेपर्यंत पावसाची तूट भरून निघेल असाही अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.

एल निनोमुळे पाऊस किती कमी झाला? खरंच हा एल निनोचा प्रभाव आहे का? हे दोन महिन्यांच्या पावसावर सांगू शकत नाही. त्यासाठी आणखी हंगाम संपण्याची म्हणजेच सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागेल, असंही शास्ज्ञांचं म्हणणं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.