डेटिंग ॲप बर्नआउट म्हणजे काय? असे अ‍ॅप्स भावनांशी कशाप्रकारे खेळतात?

    • Author, थॉमस जर्मेन
  • Published
  • वाचन वेळ: 10 मिनिटे

ॲप डाउनलोड करायचं, कंटाळा आला की ते डिलीट करायचं आणि पुन्हा तीच गोष्ट करायची...

सायन्स सांगतं की, डेटिंग ॲप्स वापरणारे लोक नेमक्या याच चक्रात अडकतात जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

तुम्हीही या जाळ्यात अडकत चालल्याचीच ही लक्षणे आहेत. पण यातून बाहेर कसं पडावं?

दोन वर्षांपूर्वी फर्नांडा आर. यांनी डेटिंग ॲप्स डिलीट केले होते आणि आपण आता हे कधीच वापरणार नाही अशी शपथ घेतली होती.

त्यानंतर त्यांच्या मित्र-मैत्रिणींना ऑनलाईन भेटलेले जोडीदार मिळू लागले आणि प्रत्येक जण तीच आशादायक गोष्ट सांगत होता. त्यामुळे काही आठवड्यांपूर्वी 29 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या सल्लागार ज्यांनी आपले आडनाव न उघड करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि काही डेटिंग ॲप्स पुन्हा डाउनलोड केले.

"मला वाटलं की कदाचित यावेळी गोष्टी काहीतरी वेगळ्या असतील," फर्नांडा म्हणतात. पण त्यांचा अंदाज चुकीचा ठरला.

लवकरच त्या एकाच वेळी अनेक लोकांशी बोलू लागल्या, सतत आपला फोन तपासू लागल्या आणि प्रत्येक संवादात हुशार आणि आकर्षक दिसण्याच्या दबावाखाली आल्या.

"हे खरोखरच खूप मानसिक ताण देणारं वाटतं," फर्नांडा म्हणतात. "हा एक न दिसणारा दबाव असतो तो हळूहळू तुमच्या खऱ्या मैत्रीवर आणि कामावर परिणाम करू लागतो."

अल्गोरिदमने त्यांच्यासमोर लोकांचे अनेक पर्याय (प्रोफाइल्स) आणले. परंतु कोणाशीही त्यांचं सूत जमलं नाही. आपल्याबाबत असे का होत आहे, या विचाराने फर्नांडा सतत अस्वस्थ असायच्या.

दोन वर्षांच्या एकटेपणाच्या काळात जेवढं वाटलं नव्हतं त्यापेक्षाही अधिक एकटेपणा आता त्यांना जाणवू लागला होता.

डेटिंग ॲप बर्नआउट

फर्नांडा यांची कहाणी ही अशीच आहे जी मी शेकडो वेळा ऐकली आहे आणि याला एक विशिष्ट नाव आहे- 'डेटिंग ॲप बर्नआउट'.

रिसर्चनुसार, हे ॲप्स वापरणाऱ्या लोकांमध्ये एक सारखाच पॅटर्न पाहायला मिळतो जो जोडीदार शोधण्याऐवजी एखाद्या अत्यंत तणावपूर्ण नोकरीसारखा वाटू लागतो.

यात मानसिक थकवा, नकारात्मकता आणि 'आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच नीट होत नाही, कदाचित आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे' अशी भावना मनात घर करू लागते. जर वेळीच यातून बाहेर पडलो नाही तर हा त्रास आणखी वाढतो.

अनेक अभ्यासांतून असं समोर आलं आहे की, डेटिंग ॲप्समुळे नैराश्य, अस्वस्थता आणि एकटेपणा खूप वाढतो. आणि ज्यांना आधीपासूनच मानसिक त्रास आहे त्यांच्यासाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण होऊन बसते.

अमेरिकेतील ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या 'रिलेशनशिप अँड टेक्नॉलॉजी लॅब'च्या संचालक लिझेल शराबी म्हणतात, "असे दिसते की, या ॲप्सचे उद्दिष्ट मुळात वापरकर्त्यांच्या (युजर्सच्या) उद्दिष्टांशी पूर्णपणे विसंगत आहे."

जर लोकांना उत्तम पर्याय सुचवत असतील आणि ते चांगल्या डेट्सवर जात असते तर त्यांनी हे ॲप्स कायमचे बंद केले असते.

"परंतु तसं होत नाही. लोक फक्त सतत या ॲप्सवर येणं आणि ते डिलीट करणं अशाच चक्रात फिरत आहेत."

जर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही पुन्हा एकदा ऑनलाईन जोडीदार शोधत असाल तर कदाचित तुम्हीही सध्या याच चक्रात अडकलेले असू शकता.

चांगली गोष्ट ही आहे की, एकदा का तुम्हाला हे समजले की स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही काही ठोस पावले उचलू शकता.

तुम्हीही 'बर्नआउट'च्या चक्रात अडकला आहात का?

2024 मधील एका रिसर्चदरम्यान शेकडो डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या लोकांवर तीन महिन्यांसाठी एक अभ्यास करण्यात आला.

याबद्दल बोलताना शराबी सांगतात, "काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की, हे ॲप्स वापरणारे सर्वच जण कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकले होते (बर्नआउट झाले होते)." आणि हे अगदी स्वाभाविक आहे.

जर तुम्ही अजूनही ॲपवरच स्क्रोल करत आहात याचा अर्थ तुम्हाला हवा असलेला जोडीदार अजून मिळालेला नाही (अर्थात, जर तुम्हाला फक्त कॅज्युअल हुकअप्स हवे असतील तर गोष्ट वेगळी).

पण हा त्रास केवळ किरकोळ नाराजीपुरता मर्यादित नव्हता तर तो त्याहूनही खूप जास्त गंभीर होता.

तज्ज्ञांनी सुरुवातीला 'बर्नआउट' ही समस्या ऑफिसमधील किंवा कामाच्या ठिकाणच्या अतिताणामुळे होते, असं सांगितलं होतं.

नंतरच्या रिसर्चमध्ये असं दिसून आलं की, हा त्रास आयुष्यातील इतर गोष्टींमुळेही होऊ शकतो. शराबी यांच्या मते, ऑनलाईन डेटिंग करणाऱ्या लोकांमध्येही हे स्पष्टपणे दिसून येतं.

मनाचा थकवा ओळखणं खूप सोपं आहे. जर ॲपवर प्रोफाइल्स स्वाइप करून तुम्हाला सतत अपयशी, निरुत्साही किंवा थकल्यासारखं वाटत असेल तर समजून घ्या की हे बर्नआउटचं लक्षण आहे.

शराबी सांगतात की, जेव्हा ॲपवरील सगळ्या प्रोफाइल्स सारखाच वाटू लागतात आणि लोकांसोबत बोलण्यातला जिव्हाळा संपून गेल्यासारखा वाटू लागतो तेव्हा तुमच्यात नकारात्मकता आणि उदासीनता वाढलेली असते.

तिसरी गोष्ट म्हणजे अकार्यक्षमता. म्हणजेच 'मी या ॲपवर काहीही केलं तरी काहीच नीट होणार नाही, कदाचित मला हे जमतच नाही किंवा माझ्यातच काहीतरी दोष आहे' असं मनातून वाटू लागणं.

"सुरुवातीला जेव्हा मी हे ॲप वापरायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल आदर होता. कारण सरतेशेवटी आपण सगळेच माणूस आहोत," असे मॅडलेन डी. म्हणतात. त्या एका टेक कंपनीत मार्केटिंग विभागात काम करतात आणि त्यांनीही आपले पूर्ण नाव न उघड करण्याची विनंती केली आहे.

"परंतु, मी जितका जास्त वेळ तिथे घालवला तितकीच मी या गोष्टींबाबत भावनाहीन होत गेले. जसं की मला समोरच्या लोकांची काहीच पर्वा उरली नव्हती. मला स्वतःचाच हा स्वभाव अजिबात आवडत नव्हता. कारण मी स्वतःला एकच वचन दिलं होतं की, मी किमान समोरच्या व्यक्तीशी सौजन्याने आणि आदराने वागेन."

तिशीच्या जवळ आलेल्या तरुण-तरुणींची ही नेहमीचीच तक्रार असते, अmx म्हणून याकडे दुर्लक्ष करणं सोपं आहे.

जोडीदार शोधणं खरंच कठीण असतं आणि बाहेर प्रत्यक्ष भेटण्यासाठी एखादे बार किंवा कॅफेदेखील काही खूप चांगले पर्याय नसतात. परंतु संशोधन याहून अधिक गंभीर परिस्थितीकडे बोट दाखवते.

आरोग्यावर गंभीर परिणाम?

शराबी यांनी नुकत्याच केलेल्या एका 'मेटा-अनालिसिस' च्या संशोधनानुसार(सर्वसमावेशक विश्लेषण) ज्यामध्ये सुमारे 26,000 लोकांचा समावेश असलेल्या 17 वर्षांच्या अभ्यासांची आकडेवारी गोळा करण्यात आली होती.

या अभ्यासात असे आढळून आलं की, जे लोक डेटिंग ॲप्स वापरतात त्यांचं मानसिक आरोग्य हे ॲप्स न वापरणाऱ्या लोकांपेक्षा खूपच खालावलेलं होतं.

यामध्ये प्रामुख्याने नैराश्य (डिप्रेशन), चिंता, भावनांवर नियंत्रण न राहणे (इमोशनल डिसरेग्युलेशन), एकटेपणा आणि मानसिक त्रास खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाला.

या लोकांची मानसिक स्थिती आधीपासूनच चांगली नव्हती, त्यांना या समस्यांचा अधिक तीव्रतेने सामना करावा लागला.

शराबी यांच्या मते, सिद्धांतानुसार हे ॲप्स अशा लोकांसाठी एक मोठा आधार ठरायला हवेत ज्यांना प्रत्यक्ष भेटून जोडीदार शोधणं सर्वात कठीण जातं.

विशेषतः ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लोकांशी थेट संवाद साधणे अवघड वाटतं . पण शराबी यांना असं आढळून आलं की, हेच वापरकर्ते सर्वात आधी आणि लवकर बर्नआउटचे बळी ठरतात.

शराबी म्हणतात, "हे लोक या समस्येला बळी पडण्याची शक्यता सर्वाधिक असते. या ॲप्समुळे त्यांच्या आधीपासून असलेल्या अडचणी आणखीनच वाढल्या."

डेटिंग ॲप कंपन्यांनाही त्यांच्या युजर्सनी कंटाळावे किंवा बर्नआउट व्हावे असं वाटत नाही. यावर 'हिंज' (Hinge) ॲपच्या प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं की, "बदलत्या काळानुसार लोकांच्या गरजा बदलत आहेत. अशा वेळी त्यांना चांगले आणि अर्थपूर्ण जोडीदार शोधून देणं आणि त्या ओळखीचे रूपांतर एका सुंदर डेटमध्ये करणं, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो."

"हे ॲप अशा रीतीने बनवलं आहे जेणेकरून तुमच्या रोजच्या आयुष्यात त्याचा त्रास होणार नाही आणि युजर्सकडून मिळणाऱ्या फीडबॅकच्या मदतीने या ॲपचा अनुभव आणखी चांगला कसा करता येईल, यावर कंपनी सतत काम करत आहे.

शराबी सांगतात, "जोडीदार शोधणं हे पहिल्यापासूनच कठीण काम आहे. त्यामुळे केवळ टेक्नॉलॉजीला दोष देणं खूप सोपं आहे." पण त्याच सोबत या ॲप्समुळे लोकांचा मानसिक त्रास एका वेगळ्या पातळीवर वाढतो, असंही त्यांना वाटतं. याचं मुख्य कारण म्हणजे 'गेमिफिकेशन'.

डेटिंग ॲप्सची रचना अशा प्रकारे केली जाते की, युजर्सना तिथे खूप फास्ट आणि सहज गोष्टी करता याव्यात जेणेकरून त्यांना एका खेळासारखी मजा येईल.

अनेक जण तक्रार करतात की, याची रचना एखाद्या प्रेमसंबंधासाठी लागणाऱ्या संवादापेक्षा 'स्लॉट मशीन'सारखी (जुगाराच्या मशीनसारखी) अधिक वाटते.

जिथे युजर्सचा आनंद संपल्यानंतरही ते सतत तो ॲप स्क्रोल करत राहतात. लॉस एंजेलिसमध्ये ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणारी कॅरेन कॉर्नेजो सांगते, "फक्त ते प्रोफाइल्स स्वाइप करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो पण त्यानंतर इतर कोणत्याही गोष्टीत रस उरत नाही."

एखादा अनुरूप जोडीदार जेव्हा प्रत्यक्षात भेटायला तयार होतो तोपर्यंत मनातला सगळा उत्साह मावळलेला असतो.

कॉर्नेजो म्हणते, "त्या टप्प्यावर मला समोरच्या व्यक्तीत अजिबात रस नसतो" आणि या संपूर्ण प्रक्रियेमुळे शेवटी आपल्याला पूर्णपणे रिकामे किंवा निरुत्साही वाटू लागते.

'अ‍ॅप्स भावनांशी खेळतात'

रुकलिनमध्ये राहणारे लेखक आणि कॉमेडियन डॅलस कोएलिंग गेल्या अनेक वर्षांपासून हे ॲप्स अधूनमधून वापरत आहेत.

ते आपला अनुभव अगदी थेट शब्दांत मांडतात की, "हिंज ॲपवर जेव्हा मला एखाद्याने 'लाईक' केल्याचं नोटिफिकेशन येतं. तेव्हा कोणीतरी माझ्यावर बंदूक रोखली आहे की काय, अशी भीती मनात दाटून येते."

यात आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे यामागची न दिसणारी मेहनत. कोएलिंग सांगतात, "जर तुम्ही शेक्सपिअरच्या काळातील इंग्लंडमध्ये राहत असता तर कदाचित अख्ख्या आयुष्यात तुम्हाला तेवढी माणसं दिसली नसती जेवढी माणसं तुम्ही हिंगवर एका दिवसात स्वाइप करताना बघता."

डेटिंग ॲप्समुळे पार्टनर शोधण्यासाठी खूप मोठे ऑप्शन्स मिळतात. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण समोर एवढे पर्याय उपलब्ध असल्यामुळे जोडीदार शोधणं हे एका कठीण कामासारखे वाटू लागतं.

"हे मला एका दुसऱ्या फुल-टाइम नोकरीसारखे वाटते जी मला माझ्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत किंवा ऑफिस सुटल्यानंतर करावी लागते," असं मॅडलेन म्हणतात.

"मला सतत फोनला चिकटून राहायला आवडत नाही. सोशल मीडियाचा वापर मी बऱ्यापैकी आता कमी केला आहे. परंतु डेटिंगच्या बाबतीत मात्र मनात अशी भावना असते की, पुढचा स्वाइप केला तर कदाचित मला माझा लाइफ पार्टनर मिळेल. मनात निर्माण होणाऱ्या याच आशेचा डेटिंग ॲप्स गैरफायदा घेतात, असे वाटते."

शराबी सांगतात की, प्रोफाइल्सची ही कधीही न संपणारी गर्दी सुद्धा मानसिक थकवा वाढवण्यास कारणीभूत ठरते. कारण एखाद्याच्या प्रोफाइलवरून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल खूप कमी माहिती मिळते.

त्या सांगतात, "तुम्ही एका कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकून पडता जिथे आधी प्रोफाइल पाहणे, नंतर निष्फळ ठरणारे संभाषण आणि शेवटी अयशस्वी ठरणारी डेट... आणि या सगळ्यानंतर तुम्ही पुन्हा त्याच जागी येऊन उभे राहता, जिथून तुम्ही सुरुवात केली होती."

या सगळ्यात, या ॲप्सच्या रचनेतील जो विरोधाभास आहे तो दुर्लक्षित करता येणारा नाही. डेटिंग ॲप्सना खरोखरच असं वाटतं की वापरकर्त्यांना त्यांचे अनुरूप जोडीदार मिळावेत. कारण जर असे कधीच घडले नाही तर आपण सगळेच हे ॲप्स वापरणं बंद करू.

परंतु शेवटी हा एक व्यवसाय देखील आहे जो आपला बहुतांश नफा हा सबस्क्रिप्शन आणि पेड फीचर्समधून कमावतो. याचा अर्थ असा की जर लोकांनी हे ॲप्स वापरणं सोडलं तर कंपन्यांचे नुकसान होईल.

अनेक वर्षांपासून हे ॲप्स वापरणारे युजर्स मला सांगत आले आहेत की, त्यांना यात स्वतःची फसवणूक झाल्यासारखं वाटतं.

ॲप्स मुद्दाम चांगले ऑप्शन्स लपवून ठेवतात आणि आपल्याला सतत स्क्रोल करायला लावण्यासाठी आपल्या भावनांशी खेळतात, असा युजर्सचा आरोप आहे. (डेटिंग ॲप कंपन्या हे आरोप पूर्णपणे नाकारतात. पण हे ॲप्स नेमके कोणत्या फॉर्म्युलावर किंवा अल्गोरिदमवर चालतात हे अजूनही एक गुपितच आहे.)

वर्ष 2024 मध्ये टिंडर आणि हिंजग ॲप्सची मालकी असलेल्या 'मॅच ग्रुप' या मोठ्या कंपनीवर एक सामूहिक खटला दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात कंपनीवर असा आरोप होता की, त्यांनी आपले ॲप्स मुद्दाम लोकांना व्यसन लागावे अशा पद्धतीने बनवले आहेत जेणेकरून लोकांना जोडीदार मिळण्याऐवजी त्यांना ॲप वापरण्याची सवय लागेल आणि कंपनीला त्याचा फायदा होईल.

मॅच ग्रुपने हे आरोप 'हास्यास्पद' म्हणत फेटाळून लावले. नंतर ही केस कोर्टाबाहेर आपापसात मिटवण्यासाठी (आर्बिट्रेशनकडे) पाठवण्यात आली. (यावर अधिक बोलण्यास मॅच ग्रुपने नकार दिला).

हिंज (Hinge) ॲपच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आमचा सगळ्यात जास्त भर हा आमच्या युजर्सना फ्रीमध्ये सर्वोत्तम अनुभव देण्यावर असतो. आमच्या एकूण युजर्सपैकी 15 टक्क्यांपेक्षाही कमी लोक पैसे देऊन पेड फीचर्स वापरतात. शेवटी आमचा बिझनेस लोकांच्या चांगल्या अनुभवावरच चालतो. जेव्हा लोकांना इथे एखादा चांगला पार्टनर मिळतो आणि ते आनंदाने इतरांनाही हिंग ॲप वापरण्याचा सल्ला देतात त्यातच आमचं खरं यश आहे."

या मानसिक थकव्यातून बाहेर पडण्याचे 4 सोपे मार्ग

डेटिंग ॲप्स अशा प्रकारे डिझाइन केले जातात की लोकांनी त्यावर सतत स्वाइप करत राहावं. आणि जेव्हा या स्वाइपिंगवर आपले नियंत्रण राहत नाही तेव्हाच लोक मानसिकदृष्ट्या थकून जातात. परंतु शराबी यांच्या मते, बर्नआउटची लक्षणे टाळण्यासाठी आणि आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी तुम्ही काही काही सोपे उपाय करू शकता.

1.जोडीदार शोधण्यासाठी फक्त ॲप्सवरच अवलंबून राहू नका

शराबी सांगतात, "मी लोकांना डेटिंग ॲप्स वापरू नका असं कधीच म्हणणार नाही. पण नवीन माणसांना भेटण्यासाठी फक्त याच ॲप्सचा आधार घेऊ नका. यामुळे तुमच्या मनावरचं दडपण खूप कमी होईल." एखाद्या रनिंग क्लबमध्ये जा, मित्रांना सांगा एखादं चांगलं स्थळ सुचवायला किंवा जुन्या पद्धतीनं लोकांना प्रत्यक्ष भेटता येईल अशा ठिकाणी जा. असं केल्यामुळे समजा ॲपवर एखाद्याशी झालेला संवाद चांगला नाही झाला तर तुमचा संपूर्ण आठवडा वाया नाही जाणार.

2.विचारपूर्वक स्वाइप करा

विनाकारण सतत स्वाइप करत राहिल्याने तुमचे तासनतास वाया जाऊ शकतात आणि शेवटी तुमच्या हाती काहीच लागत नाही.

शराबी यांच्या मते, लोक आता ज्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर मर्यादित करत आहेत त्याचप्रमाणे त्यांनी डेटिंग ॲप्सचाही वापर केला पाहिजे. त्या सांगतात, "स्वतःसाठी एक नियम बनवा. जसे की मी आठवड्यातून ठराविक वेळा आणि फक्त एवढ्याच वेळेसाठी हे ॲप वापरेन आणि वेळ संपली की ॲप बंद करेन."

स्वाइप करताना तुमच्या मनःस्थितीकडे लक्ष द्या आणि मानसिक थकवा येण्यापूर्वीच थांबायला शिका. जेणेकरून प्रत्येक वेळी ॲप वापरून झाल्यावर तुम्हाला निराश किंवा रिकामे वाटण्याऐवजी उत्साही वाटेल.

3. मित्रांचा आधार घ्या

मानसिक थकवा आणि नैराश्य हे एकटेपणामुळे जास्त वाढतं. आपण जेव्हा एकटे असतो तेव्हाच तासनतास फोनवर स्वाइप करत बसतो. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, अशा वेळी जर मित्रांची साथ असेल तर मनावरचा ताण खूप कमी होतो.

जे लोक तुम्हाला नीट ओळखतात त्यांच्याशी मनातील गोष्टी आणि डेटिंगचे अनुभव शेअर केल्यामुळे एखादा वाईट आठवडा नैराश्याच्या गर्तेत बदलण्यापासून रोखता येतो.

4. कधी थांबायचं हे समजून घ्या

पार्टनर शोधताना कधी कधी निराशा येणं साहजिक आहे. पण जर या ॲप्समुळे तुमची जगण्यातली सकारात्मकताच हरवत चालली असेल आणि फोन हातातून खाली ठेवताना 'मला आयुष्यात कधीच कोणी मिळणार नाही' असं वाटून वाईट वाटत असेल तर समजून जा की आता थांबण्याची वेळ आली आहे.

शराबी सांगतात, "जर तुमच्यासोबत असं घडत असेल तर या सर्व गोष्टी एकच इशारा देतात की तुम्ही या ॲप्सपासून काही दिवस पूर्णपणे लांब राहून एक छान ब्रेक घेतला पाहिजे."

डेटिंग अ‍ॅप्स बदलत आहेत का?

आता कुठे तरी डेटिंग ॲप्स चालवणाऱ्या कंपन्यांनाही या समस्येची जाणीव होऊ लागली आहे. खरं तर, सध्या हा बिझनेस मोठ्या अडचणीत सापडला आहे.

पैसे देऊन प्रीमियम फीचर्स वापरणारे युजर्स खूप वेगाने कमी होत चालले आहेत. आणि आजकालचे तरुण लोक आता ॲप्स सोडून बाहेर प्रत्यक्ष भेटून पार्टनर शोधण्याला जास्त पसंती देत आहेत.

कंपन्यांचे अधिकारी या त्रासाला "स्वाइप फटीग" (सतत स्वाइप करण्याचा कंटाळा) असं म्हणत आहेत. याच कारणामुळे आता स्वतःमध्ये मोठे बदल करण्यासाठी डेटिंग ॲप्स प्रयत्न करत आहेत.

बंबल (Bumble) हे ॲप आता स्वाइप करण्याची पद्धत पूर्णपणे बंद करत असून ते देखील हिंग आणि टिंडरप्रमाणेच एआय-आधारित (AI-driven) जोडीदार शोधण्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

टिंडरच्या सीईओंनी तर ॲपला एक नवीन रूप देण्यासाठी लोकांना प्रत्यक्ष भेटता येईल अशा इव्हेंट्सचं आयोजन करण्याची योजना जाहीर केली आहे.

हिंजच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, लोकांच्या आयुष्यातील एकटेपणा कमी करणं हेच त्यांच्या कंपनीचं मुख्य ध्येय आहे. यासाठी ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पातळीवर लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आता हे सर्व प्रयत्न खरोखरच यशस्वी होणार की लोकांना सतत फोनमध्ये गुंतवून ठेवण्याचा हा कंपन्यांचा एखादा नवीन मार्ग आहे हे येणारा काळच ठरवेल.

सध्या तरी या त्रासातून जाणाऱ्या लोकांना स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागत आहे. मॅडलेनने सध्या डेटिंग ॲप्स वापरणं बंद केलं आहे पण आपण या निर्णयावर जास्त काळ टिकू शकू असं तिला वाटत नाही. ज्या जगात बऱ्याच नात्यांची सुरुवात ऑनलाईन होते तिथे या माध्यमातून बाहेर पडणं म्हणजे प्रेमाच्या भावनेतूनच पूर्णपणे बाहेर पडण्यासारखं वाटू शकतं.

त्या म्हणतात, "हा फक्त काही दिवसांचा ब्रेक आहे आणि मी पुन्हा यावर येईन. परंतु काही लोक या गोष्टी जितक्या गंभीरतेने घेतात तितकं जर नाही घेतले तर डेटिंग खरोखरच मजेशीर असू शकतं."

त्यानंतर थोडं थांबून त्या म्हणाल्या "माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपल्याकडे हे करण्यासाठी एखादा अधिक चांगला मार्ग असायला हवा होता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)