लघवीमध्ये फेस दिसणं किती धोकादायक? किडनीत दोष असल्याची 5 लक्षणं कोणती?

लघवीमध्ये फेस दिसतोय? मग किडनीच्या आरोग्याबद्दलची ही माहिती वाचा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

किडनी किंवा मूत्रपिंड आपल्या शरीरात एकाचवेळी अनेक कामं करते. ती शरीरातील घाण आणि नको असलेले पदार्थ बाहेर काढते आणि शरीरातील पाणी व खनिजांचं संतुलनही राखते.

किडनी आपला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते आणि रक्तातील लाल पेशी तयार करण्यासही मदत करते.

परंतु, किडनीची समस्या सुरू झाल्याची सुरुवातीची लक्षणं लोक बहुतेक वेळा दुर्लक्षित करतात किंवा त्यांच्याकडून चुकून दुर्लक्ष होतं.

जर वेळेवर ही लक्षणं ओळखली तर मूत्रपिंडाच्या आजारावर लवकर उपचार सुरू करता येऊ शकतात.

चला पाहूया अशीच पाच लक्षणे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ही किडनीच्या आजाराची किंवा खराब होण्याची शक्यता असू शकते.

1. वारंवार लघवी येणं

लघवी लवकर-लवकर किंवा वारंवार येणं हे किडनी खराब होण्याचं लक्षण असू शकतं. याला 'पॉलीयुरिया' असं म्हणतात.

जेव्हा किडनी खराब होते, तेव्हा आवश्यकतेपेक्षा लघवी कमी येऊ लागते. लघवीत फेस येणं हे त्याचं एक लक्षण असू शकतं.

वारंवार लघवी येणं हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वारंवार लघवी येणं हे किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

परंतु, लघवीत येणारा फेस हा मूत्रपिंड खराब असल्यामुळेच येतो असंही नाही. इतर आजारांमुळेही लघवीत फेस येऊ शकतो, असं सर गंगाराम रुग्णालयातील सीनियर कन्सल्टंट डॉ. मोहसीन वली सांगतात.

2. शरीराला सूज येणे

डोळे आणि पाय सुजणे हे किडनी किंवा मूत्रपिंड खराब होण्याचं लक्षण असू शकतं.

घोट्याला आणि पिंडऱ्यांमध्ये सूज दिसल्यास दुर्लक्ष करू नये. हे किडनीच्या आजाराचे संकेत देतात.

मणिपाल रुग्णालयातील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात की, पाय सुजल्यास सावध व्हावं. डोळे, चेहरा आणि पाय सुजणं ही किडनीच्या आजाराची चिन्हं असू शकतात.

3. ब्लड प्रेशर / रक्तदाब

तज्ज्ञांच्या मते, रक्तदाब ही दुधारी तलवार आहे. उच्च रक्तदाबाचा किडनीवर परिणाम होतो.

त्याचबरोबर किडनी खराब झाल्यामुळेही ब्लड प्रेशर वाढतो. त्यामुळे रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरबाबत सावध राहणं आवश्यक आहे.

उच्च रक्तदाबाचा किडनीवर परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उच्च रक्तदाबाचा किडनीवर परिणाम होतो.

डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात की, काही वेळा रक्तदाब नियंत्रणात राहत नाही आणि औषधांचा डोस वाढवावा लागतो. हेही किडनीच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

4. मधुमेह

मधुमेहामुळे किडनीवर सर्वाधिक परिणाम होतो.

डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात की, किडनीचे 80 टक्के रुग्ण हे मधुमेहानं ग्रस्त आहेत.

30 ते 40 टक्के मधुमेहाच्या प्रकरणात किडनीवर परिणाम होतो.

ग्राफिक्स

मधुमेहानं ग्रस्त लोकांमध्ये किडनीचा आजार वाढू लागला तर त्यावेळी त्यांची शुगर किंवा साखरेची पातळीही कमी होते.

अनेक वर्षांपासून साखरेची पातळी वाढल्यामुळे मूत्रपिंडाचा म्हणजेच किडनीचा आजार होऊ लागतो.

5. थकवा, खाज सुटणे आणि मळमळ

थकवा, शरीराला खाज सुटणं आणि मळमळ होणं हे किडनीच्या आजाराचे संकेत असू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील फॉस्फरस कमी झाल्यास खाज येते. किडनीच्या आजारामुळे शरीरातील फॉस्फरस कमी होतो.

किडनीच्या आजारामुळे काही रुग्णांना मळमळ होते आणि त्यांना काहीही खाण्याची इच्छा होत नाही

किडनीच्या आजारामुळे शरीरातील फॉस्फरस कमी होतो. त्यामुळे शरीराला खाज सुटते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किडनीच्या आजारामुळे शरीरातील फॉस्फरस कमी होतो. त्यामुळे शरीराला खाज सुटते.

तज्ज्ञांच्या मते, निरोगी जीवनशैली किडनीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यांचं म्हणणं आहे की, नियमित व्यायाम करणं, पुरेसं पाणी पिणं आणि मीठ व साखरेचा कमी वापर करणं किडनीचा आजार टाळण्यासाठी उपयुक्त आहे.

डॉ. मोहसीन वली आणि डॉ. गरिमा अग्रवाल यांनी बीबीसीला काही असे उपाय सांगितले, ज्यांमुळे किडनीच्या आजारापासून आपल्याला बचाव करता येऊ शकतो.

पुरेसं पाणी प्या

निरोगी किडनीसाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण पुरेसं पाणी पितो, तेव्हा किडनी पुरेशी लघवी तयार करतं, ज्यामुळे शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडतात.

दररोज किमान दोन ते अडीच लिटर पाणी प्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दररोज किमान दोन ते अडीच लिटर पाणी प्या.

यामुळे किडनीत खडे किंवा स्टोन आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. जर आपण पुरेसं पाणी पित असू, तर आपली लघवी स्वच्छ किंवा हलक्या पिवळसर रंगाची होईल.

साधारणपणे एका दिवसात 2 ते 2.5 लिटर पाणी पिलं पाहिजे, असं डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात.

मीठ कमी खा

जास्त मीठ किडनीसाठी चांगलं नाही. कारण यामुळे रक्तदाब वाढतो आणि किडनीला हानी पोहोचते. लोणचं, पापड आणि प्रोसेस केलेलं अन्न टाळा.

नूडल्स, चाऊमीनसारख्या पदार्थांमध्ये मीठ खूप असतं. असे पदार्थ टाळा.

सैंधव मीठ वापरू नका

हल्ली सैंधव मीठ खाण्याचा ट्रेंड सुरू आहे. परंतु, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सैंधव मीठ खाणं टाळलं पाहिजे.

सैंधव मीठ किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सैंधव मीठ किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

डॉ. मोहसीन वली सांगतात की, साधारणपणे असं मानलं जातं की सैंधव मीठ साध्या मीठापेक्षा आरोग्यासाठी चांगलं असतं. परंतु, यामध्ये पोटॅशियम कमी आणि सोडियम जास्त असतं.

साखर कमी करा

किडनीच्या आजारापासून वाचायचं असेल तर गोड कमी खा.

साखर न खाणं खूप चांगलं आहे. केक, कुकीज, पेस्ट्री आणि कोलासारख्या पदार्थांमध्ये प्रोसेस्ड साखर असते.

साखरेमुळं लठ्ठपणा वाढतो आणि यामुळे किडनीचा आजार बळावण्याचा धोका असतो.

वजनावर नियंत्रण ठेवा

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वजन कमी करा. कारण जास्त वजन किंवा लठ्ठ असलेल्या लोकांना किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो.

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) कमी ठेवा. ते 24 पेक्षा कमी असेल तर खूप चांगलं आहे.

किडनीचा आजार टाळायचा असेल तर व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

फोटो स्रोत, Disney via Getty Images

फोटो कॅप्शन, किडनीचा आजार टाळायचा असेल तर व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

हलका शारीरिक व्यायाम आवश्य करा. हे फार महत्वाचं आहे. यामुळे शरीराची पचनक्रिया (मेटाबॉलिज्म) चांगली राहते.

जर हे चांगले राहिलं, तर वयाच्या पन्नाशीच्या आसपास पोहोचाल तेव्हा मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी असेल.

संतुलित आहार घ्या

फळं, भाज्या आणि कड धान्यं यांचा भरपूर समावेश असलेला आहार घ्या. प्रो-बायोटिक पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात, त्यांना प्राधान्य द्या. तळलेले आणि भाजलेले पदार्थ टाळा.

पुरेशा प्रमाणात पाणी पिणं, संतुलित आहार आणि व्यायाम केल्यास किडनी निरोगी राहते आणि संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं.

डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं घेऊ नका

डॉ. गरिमा अग्रवाल सांगतात, 'अनेक वेळा आपण पाहतो की, लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता मेडिकलमधून परस्पर औषधं घेतात.

डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं घेऊ नका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं घेऊ नका

डॉ. अग्रवाल म्हणतात की, सर्वात जास्त लोक पेनकिलर घेतात.

त्यांच्या मते, ''वृद्ध लोक अनेकदा शरीरदुखी आणि आर्थरायटिसमध्ये (सांधेदुखी) पेनकिलर घेतात. काही औषधांमध्ये जड धातू (हेवी मेटल्स) आणि स्टेरॉइड्स असू शकतात. त्यामुळे किडनी खराब होऊ शकते.''

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.