'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये', मुख्यमंत्र्यांचं आवाहन; असा आहे राज्याच्या हवामानाचा अंदाज

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये', मुख्यमंत्र्यांचं आवाहन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये', मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने म्हटले आहे की दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास या सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही तुरळक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे की, 1 जून रोजी धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना वादळी पाऊस, विजेच्या कडकडाटासह वादळ आणि तुरळक ठिकाणी 50-60 किमी प्रति तासाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

धुळे आणि नाशिकमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेला इशारा

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, हवामान विभागाने दिलेला इशारा

विदर्भात भंडारा, गोंदियामध्ये काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले आहे की, 1 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदूरबाद, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास या सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे.

अहिल्यानगर, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटसह वादळ आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाने 31 मे रोजी म्हटले की, उत्तर-पश्चिम, मध्य आणि लगतच्या पूर्व भारतातील भागांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. या दरम्यान ताशी 90 किलोमीटर वेगाने झोतदार वारे वाहू शकतात. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये' - मुख्यमंत्री

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या वादळी पावसाचा मान्सूनशी संबंध नाही, स्थिर पाऊस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकहून केले आहे.

"राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

"विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो.

"शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे.

"विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

जूनमध्ये असं असेल हवामान

महिन्याचा पावसाचा विचार केला तर जून महिन्यात पावसाचं प्रणाम सरासरीच्या 92 टक्केच राहील.

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

एल निनोचा परिणाम

मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यासाठी काही वातवरणीय परिस्थिती आणि घटनांचा आधार घेतला जातो.

त्यातल्या 3 प्रमुख गोष्टी म्हणजे एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि उत्तर गोलार्धातील हिमवर्षाव.

एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी या भागातजमा होते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो.

साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

सध्या पॅसिफिक महासागरातलं तापमान न्यूट्रल स्थितीत आहे, पण वेगानं तिथे एल निनो तयार होत असून, यंदा नेहमीपेक्षा जास्त तीव्र एल निनो तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं, आफ्रिकेजवळचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतातमान्सूनला पोषक ठरताना दिसते.

यंदा सकारात्मक IOD तयार होण्याची शक्यता तर आहे, मात्र त्याची तीव्रता कमी असेल, असं भाकित काही हवामान मॉडेल्सनी वर्तवलं आहे.

मान्सूनवर परिणाम करणारी आणखी गोष्ट म्हणजे उत्तर गोलार्धात वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव. हा हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)