You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सूनची आगेकूच, पण महाराष्ट्रात कधी दाखल होईल?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता अंदमान आणि निकोबार बेटे पूर्णतः व्यापली आहेत. तसंच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही मान्सून थोडा पुढे सरकला आहे.
दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस आधीच मान्सूनचा प्रवास सुरू झाला.
पुढच्या 3-4 दिवसांमध्ये मान्सून आणखी पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 26 मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यात 4 दिवसांचा फरक पडू शकतो.
पुढच्या 3-4 दिवसांत केरळ आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल याचा नेमका अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला नाही. पण काही हवामान तज्ज्ञांच्या मते साधारण 6 जूनच्या आसपास राज्यात मान्सूचं आगमन होऊ शकतं.
पुढचे 2 दिवस राज्यात विशेषतः कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वीजा, मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. पण अंतर्गत जिल्ह्यांमध्ये उष्णता जाणवत असून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिलेला आहे.
यंदा मान्सूनच्या काळात कमी पाऊस
यावर्षी महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं याआधी वर्तवला आहे.
13 एप्रिलला 2026 रोजी यंदाच्या मान्सूनविषयीचा पहिला दीर्घकालीन अंदाज जारी केला होता.
त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 92 टक्के (± 5%) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात या कालावधीत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी यापेक्षाही कमी पाऊस पडू शकतो.
तर काही ठिकाणी सरासरीएवढा आणि गडचिरोलीसारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असंही हवामान विभागानं तयार जाहीर केलेल्या नकाशातून दिसून येतं.
मान्सून ऑनसेट म्हणजे काय?
मान्सून ऑनसेट म्हणजे म्हणजे मान्सूनची सुरुवात. फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं.
तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरुवात झाल्याचं जाहीर करतात.
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर 10 मे नंतर कधीही सलग 2 दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.
मुंबईसारख्या ठिकाणीही मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर करताना सलग 2-3 दिवस झालेला पाऊस आणि नैऋत्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात.
मान्सून कुठे तयार होतो?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.
पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.
पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.
भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते.
विशेषतः मे महिन्यापर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याचवेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे प्रकार कोणते?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.
दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.
तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दक्षिण भारतात, प्रामुख्यानं तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो.
नैऋत्य मान्सूनच्याही 2 शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.
मान्सून आपल्यासारखं कॅलेंडर मानत नाही, पण आकडेवारीसाठी सोयीचं म्हणून भारतीय हवामान विभागातर्फे 1 जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा कालावधी म्हणून गणला जातो.
तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो, तर साधारण 11 टक्के पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.
मान्सून का महत्त्वाचा?
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.
1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. 100 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.
एल निनो, ला निना आणि मान्सून
एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या 4 गोष्टी आहेत :
1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)