वेळ, ग्रहताऱ्यांची स्थिती सांगणारं 'ॲस्ट्रोलेब' हे मुघल काळातील खगोलीय यंत्र काय होतं? त्याला विक्रमी किंमत कशी मिळाली?

फोटो स्रोत, Courtesy Sotheby's
- Author, निखिल इनामदार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
एक अत्यंत नेत्रदीपक पितळी 'ॲस्ट्रोलेब', तोही 17 व्या शतकातील पुन्हा चर्चेत आला आहे. 'ॲस्ट्रोलेब' म्हणजे एकप्रकारचा हातात सहजपणे मावणारे आणि वापरता येणारा खगोलशास्त्रीय यंत्र.
कधीकाळी ते जयपूरच्या राजघराण्याच्या संग्रहाचा भाग होता. आता तो लंडनमध्ये झालेल्या लिलावात तब्बल 27.5 लाख डॉलर्सना (अंदाजे 26.10 कोटी रुपये) विकले गेले आहे.
हा इस्लामी जगातील खगोलशास्त्रीय उपकरणाच्या लिलावातील विक्रीचा विक्रम ठरला आहे, असे हा लिलाव आयोजित करणाऱ्या सदबीजच्या प्रतिनिधीने बीबीसीला सांगितले. या आठवड्यात तो लंडनमधील लिलावगृहाच्या गॅलरीत प्रदर्शित करण्यात आला होता.
सदबीजच्या इस्लामिक आणि भारतीय कला विभागाचे प्रमुख बेनेडिक्ट कार्टर यांनी सांगितले की सध्या अस्तित्वात असलेल्या अशाप्रकारच्या वस्तूंपैकी ही कदाचित सर्वात मोठी वस्तू असावी. तसेच हा ॲस्ट्रोलेब यापूर्वी कधीही प्रदर्शनात मांडण्यात नव्हता आला.
'ॲस्ट्रोलेब' नेमकं काय असतं आणि त्याचा वापर कशासाठी केला जायचा?
जयपूरचे महाराजा सवाई मानसिंग द्वितीय यांच्या शाही संग्रहाचा एक भाग म्हणून हे यंत्र ओळखलं जात होतं.
सवाई मानसिंग यांच्या निधनानंतर हे यंत्र त्यांच्या पत्नी महाराणी गायत्री देवी यांच्याकडे गेलं. गायत्री देवी या त्या काळातील सर्वात 'ग्लॅमरस' महिलांपैकी एक मानल्या जायच्या. त्यानंतर गायत्री देवी यांच्या हयातीतच ही वस्तू एका खासगी संग्रहाचा भाग झाली.

फोटो स्रोत, Courtesy Sotheby's
'ॲस्ट्रोलेब' या धातूच्या तबकड्या असतात. त्यात अनेक स्तर असतात आणि त्याची रचना गुंतागुंतीची असते. ऐतिहासिक काळात त्याचा वापर वेळ पाहण्यासाठी, ताऱ्यांचं स्थान सांगण्यासाठी किंवा त्याचे नकाशे तयार करण्यासाठी, मक्का शहराची दिशा सांगण्यासाठी आणि आकाशातील विविध वस्तूंच्या हालचाली सांगण्यासाठी किंवा त्यांचा वेध घेण्यासाठी केला जायचा.
"मूलत: हे त्रिमितीय विश्वाचं, द्विमितीय प्रक्षेपण आहे. मी या 'ॲस्ट्रोलेब'ची तुलना आजच्या काळातील स्मार्टफोनशी करते. कारण त्यांचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता," असं ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिस्ट्री ऑफ सायन्स, मेडिसिन अँड टेक्नॉलॉजीच्या डॉ. फेडेरिका जिगांटे म्हणाल्या.
"तुम्ही याचा वापर सूर्यास्त, सूर्योद्याची वेळ, एखाद्या इमारतीची उंची, विहिरीची खोली तसंच अंतराची गणना करण्यासाठी करू शकता. अगदी याचा वापर भविष्य वर्तवण्यासाठीही करू शकता. कधीकाळी जन्मकुंडली किंवा राशिभविष्य मांडण्यासाठी पंचांगाच्या बरोबर त्यांचा वापर केला जायचा," असं त्या पुढे म्हणाल्या.
लाहोरमध्ये दोन भावांनी मुघल सरदारासाठी तयार केलं होतं हे यंत्र
'ॲस्ट्रोलेब'चा विकास सर्वात आधी प्राचीन ग्रीसमध्ये इ.स.पू. दुसऱ्या शतकात झाला. नंतर 8 व्या शतकापर्यंत त्यांचा प्रसार इस्लामिक जगतात झाला. त्यानंतरच्या शतकांमध्ये, इराक, इराण, उत्तर आफ्रिका आणि अल-अंदालुस (आजचा स्पेन) या प्रदेशांमध्ये या खगोलीय यंत्रांच्या निर्मितीची केंद्र भरभराटीला आली.
या लिलावातील हे विशिष्ट खगोलीय यंत्र, 17 व्या शतकाच्या सुरुवातीला लाहोरमध्ये (जे आजच्या पाकिस्तानात आहे) तयार करण्यात आलं होतं. त्या काळी लाहोर हे मुघल साम्राज्यातील 'ॲस्ट्रोलेब'च्या निर्मितीचं एक प्रमुख केंद्र बनलं होतं. याची निर्मिती दोन भावांनी केली होती. ते दोन भाऊ म्हणजे कईम मुहम्मद आणि मुहम्मद मुकिम. त्यांनी ते एका मुघल सरदारासाठी तयार केलं होतं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
ही जोडी तथाकथित 'लाहोर शैली'चा भाग होती. लाहोर शैली हे त्या काळातील 'ॲस्ट्रोलेब'च्या निर्मितीचं सर्वात प्रसिद्ध केंद्रांपैकी एक होतं. ही कला फक्त एका कुटुंबापुरतीच जतन करण्यात आली होती. ती एका पिढीकडून पुढच्या पिढीला शिकवली गेली.
या दोन भावांनी संयुक्तपणे तयार केलेले फक्त दोनच 'ॲस्ट्रोलेब' ज्ञात आहेत. यातील दुसरं आकारानं खूपच लहान आहे आणि ते इराकमधील संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे.
आका अफजल या सरदारानं हे ॲस्ट्रोलेब' तयार करवून घेतलं होतं. त्या काळात तो लाहोरचा प्रशासक होता. तो मूळचा इराणमधील इस्फहानचा होता. मुघल बादशाह जहांगीर आणि शहाजहान यांच्या दरबारात तो अनेक वरच्या पदांवर होता. या वस्तूचा प्रचंड आकार आणि त्याचं ऐश्वर्य यातून त्याच्या आश्रयदात्याचं म्हणजे ज्यानं ते बनवून घेतलं त्या सरदाराचं स्थान, प्रतिष्ठा दिसून येते.
लिलाव झालेल्या 'ॲस्ट्रोलेब'ची अद्भूत वैशिष्ट्ये
"या 'ॲस्ट्रोलेब'चं वजन 8.2 किलो आहे. त्याचा व्यास जवळपास 30 सेंटीमीटर आहे. तर त्याची उंची 46 सेंटीमीटर आहे. ते 17 व्या शतकातील भारतातील एखाद्या सामान्य 'ॲस्ट्रोलेब' म्हणजे खगोलीय यंत्राच्या आकाराच्या जवळपास 4 पट आहे," असं कार्टर म्हणाले.
"त्यामध्ये एक लक्षवेधी आंतर-सांस्कृतिक पैलूदेखील आहे. यातील ताऱ्यांच्या पॉईंटर किंवा निर्देशकांवरील त्यांची प्रमाणित नावं पर्शियन भाषेत आहेत. तर त्यासोबतच देवनागरी लिपीत त्याच नावासाठीची संस्कृतमधील नावंदेखील कोरण्यात आली आहेत," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
सदबीजनुसार, या उपकरणात 94 शहरांची नावं कोरलेली आहेत. त्यातील प्रत्येक शहराचं रेखांश आणि अक्षांशदेखील चिन्हांकित करण्यात आलेलं आहे. त्यासोबत, 38 ताऱ्यांचे पॉईंटर्स फुलांच्या अतिशय बारीक नक्षीकामानं जोडलेले आहेत. त्यात 5 अचूकपणे मोजमापन (कॅलिब्रेटेड) केलेल्या पट्ट्या आणि अंशांचं विभाजनदेखील आहे. "ते इतक्या बारकाव्यानं केलेलं आहे की अंशांच्या एक तृतियांश भागापर्यंत त्याची विभागणी करण्यात आलेली आहे."
इतक्या तपशीलपूर्वक केलेल्या कामामध्ये लाहोर शैलीच्या असामान्य, विलक्षण कारागिरीचं प्रतिबिंब उमटलं आहे. त्या काळात ही शैली "त्याच्या सर्वोच्च स्तरावर, शिखरावर होती," असं कार्टर म्हणतात.
या 'ॲस्ट्रोलेब'मध्ये तांत्रिक अचूकता, कार्यक्षमता आणि कलात्मक सौंदर्य या गोष्टी अशाप्रकारे एकत्रित आल्या होत्या की त्यामुळे हे खगोलीय यंत्र मध्यपूर्वेत तयार झालेल्या आधीच्या 'ॲस्ट्रोलेब'पेक्षा वेगळं ठरलं. त्या यंत्रांमध्ये कदाचित फक्त कार्यक्षमता किंवा वापरण्यायोग्य हेच वैशिष्ट्य असावं.
मुघल दरबारातील खगोलशास्त्राबद्दलचा रस
हे यंत्र मुघल दरबाराच्या व्यापक वैज्ञानिक प्रेरणेबद्दलही सांगतं. त्या दरबारात, शासक आणि दरबारींनी खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील प्रगतीमध्ये खूप अधिक रस दाखवला होता.
"हे यंत्र फक्त आकारानं मोठं, सुंदर आणि जड नाही. तर ते कमालीचं अचूक देखील आहे. इतकं की ते तुम्हाला अंतराळातील एखाद्या वस्तूचा अचूक उन्नतांश म्हणजे क्षितिजापासून वरच्या दिशेनं मोजलेला कोन सांगू शकेल," असं जिगांटे म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
याच्याशी तुलना होऊ शकेल असं एकमेव यंत्र म्हणजे पर्शियाच्या अब्बास द्वितीय यांच्यासाठी बनवलेलं यंत्र, असं त्या पुढे म्हणाल्या.
सदबीजनं या लिलावाआधी म्हटलं होतं की, या यंत्राची मूळची उत्तम स्थिती आणि राजघराण्याशी संबंधित असलेलं मूळ यामुळे संग्रहालयं आणि अशा वस्तूंचा संग्रह करणाऱ्यांमध्ये याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
या यंत्रानं, सुलतान बायेझिद द्वितीय याच्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओटोमन 'ॲस्ट्रोलेब'चा विक्रम मोडला. हे ओटोमन 'ॲस्ट्रोलेब' आकारानं खूपच छोटं यंत्र होतं. ते 2014 मध्ये 10 लाख पौंडापेक्षा (आजच्या मूल्यानुसार अंदाजे 12 कोटी 90 लाख रुपये) थोड्या कमी किमतीत विकलं गेलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























