कोकणात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात पुढचे काही दिवस मान्सूनचा जोर कायम

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असला तरी राज्यभरात पावसाचे चित्र एकसारखे नाही.

1 ते 5 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आज 1 जुलैला रत्नागिरी, 2 जुलैला पालघर व पुण्याचा घाट प्रदेश, 3 जुलैला रायगड व पुण्याचा घाट प्रदेश, 4 जुलैला ठाणे, रायगड व पुण्याचा घाट प्रदेश आणि 5 जुलैला साताऱ्याच्या घाट प्रदेशासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बीबीसी वेदर फोरकास्टनुसार 1 जूनच्या रात्री आणि दोन जूनला कोकण, घाट प्रदेश आणि विदर्भात नागपूरच्या आसपासच्या परिसरात जोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी तीन जुलैला उत्तर कोकणात आणि राज्यातील तुरळक भागांत अतीजोरदार पाऊस पडू शकतो. चार आणि पाच तारखेलाही या परिसरात भरपूर पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा प्रवास

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, मान्सूनचा प्रवास

नैऋत्य मोसमी वारे उत्तर भारतात आणखी पुढे सरकले आहेत. मान्सूननं आता पंजाब, हरयाणातही आगेकूच केली आहे. पुढच्या दोन दिवसांत तो दिल्ली आणि राजस्थानात दाखल होऊ शकतो.

मुंबईतल्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यांत 1 जुलैच्या उत्तरार्धासाठी रेड अलर्ट आहे कोकणातील इथर जिल्ह्यांत आणि पूर्व विदर्भातही ऑरेंज अलर्ट आहे तर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिलेला आहे.

पाऊस अंदाज

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, पाऊस अंदाज

2 जुलै रोजी पालघर तसंच पुण्याच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे, तसंच सातारा आणि कोल्हापूरचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर इथेही थंडरस्टॉर्म्ससाठी ऑरेंज अलर्ट आहे. दोन तारखेला सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदियामध्ये यलो अलर्ट दिला आहे.

दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता पाहता, सिंधुदुर्गातील काही भागांत फ्लॅश फ्लड आणि लँडस्लाईडसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

एकूणच राज्यात कोकण आणि घाटमाथ्याच्या भागांत मान्सूनचा जोर कायम असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत हलका पाऊस किंवा उघडीप असल्याचे चित्र दिसत आहे.

हवामान विभागाने कोकण आणि घाट परिसरात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

नदी पातळीच्या अहवालानुसार सध्या कोणत्याही नदीने धोक्याची पातळी गाठलेली नसली तरी पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

'या' ठिकाणी ऑरेंज अलर्ट

राज्यात मान्सूनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज (1 जुलै) अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, बुलडाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील स्थिती कशी?

राज्यात जुलै महिन्यात बहुतांश भागात सरासरीहुन कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मात्र, विदर्भातील बहुतांश तर मराठवाड्यातील तुरळक भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतीकात्मक छायाचित्र

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हवामान विभागाच्या 30 जून ते 4 जुलै या कालावधीसाठी जारी केलेल्या कृषी हवामान सल्ला पत्रकानुसार, 2 आणि 3 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तसेच एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भातही काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता असून मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शहरी भागांत पाणी साचण्याचा धोका

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुसळधार पावसामुळे शहरी भागांतील सखल रस्त्यांवर पाणी साचणे, स्थानिक पातळीवर पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे, दृश्यमानता कमी होणे आणि कमकुवत बांधकामांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा किंवा भूस्खलनाचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे.

नागरिकांना सावधगिरीचे आवाहन

जोरदार पावसाच्या काळात वाहतूक कोंडीची माहिती घेऊनच प्रवास करावा, पाणी साचणारे भाग टाळावेत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या मैदानात किंवा शेतात काम करू नये तसेच विद्युत उपकरणे वीजपुरवठ्यापासून वेगळी करावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

कोकण, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाट परिसरात भात आणि नाचणीच्या रोपवाटिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. नव्याने लागवड केलेल्या फळबागा, भाजीपाला पिके तसेच वेलवर्गीय पिकांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात पावसाचा जोर पाहता भुईमूग, काकडीवर्गीय पिके आणि काही रोपवाटिकांची पेरणी पुढे ढकलण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच खतांचा वापर व कीटकनाशक फवारणी काही दिवस पुढे ढकलण्याची सूचना करण्यात आली आहे.

कोणत्या भागांत सर्वाधिक पाऊस?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर व दक्षिण कोकणात 4 जुलैपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा भाग, विशेषतः पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.