प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी, 'नॉर्वे चेस' जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला; जाणून घ्या त्याचा संपूर्ण प्रवास

प्रज्ञानंद

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, विवेक आनंद
    • Role, बीबीसी तामीळ
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने ऐतिहासिक कामगिरी करत प्रतिष्ठेची 'नॉर्वे चेस' स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

प्रज्ञानंदने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीच्या विन्सेट कीमरचा 3 गुणांनी पराभव करत एकूण 18 गुणांसह नॉर्वे चेसचे विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेरीत प्रज्ञानंदची कामगिरी सामान्य होती. परंतु, नंतरच्या सामन्यांमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केले.

प्रज्ञानंद

फोटो स्रोत, Twitter

स्पर्धेच्या 10 व्या आणि अंतिम फेरीपूर्वी 20 वर्षीय प्रज्ञानंद 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. फिलिपिनो-अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो याच्यापेक्षा तो अर्ध्या गुणाने मागे होता.

वेस्ली सो आणि अलिरझा फिरोझा यांच्यात जेतेपदासाठी जबरदस्त चुरस होती. निर्णायक फेरीत वेस्ली आणि फिरोझा आमनेसामने होते.

मात्र वेस्ली सो आणि अलिरझा फिरोझा यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे वेस्ली सो याचे 17 गुण झाले, तर प्रज्ञानंदने विजय मिळवत 18 गुणांपर्यंत मजल मारली आणि अखेर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या पार्श्वभूमीवर 20 वर्षीय प्रज्ञानंद कोण आहे आणि त्याचा आतापर्यंत प्रवास कसा झाला आहे, तो कसा घडला? याबाबत जाणून घेऊया.

बीबीसीने प्रज्ञानंदच्या प्रवासाचा आढावा घेणारी बातमी 2023 मध्ये केली होती. ती या निमित्ताने पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

प्रज्ञानंदचा प्रवास

प्रज्ञानानंदा फक्त 12 वर्षांचा होता तेव्हा त्याला बुद्धिबळातला ग्रँडमास्टर होण्याचा मान त्याला मिळाला होता. भारतात तर ही कामगिरी करणारा तो वयाने सगळ्यात लहान खेळाडू ठरला होता.

पण, जगभरात हा मान पटकावण्याची त्याची संधी फक्त 3 महिन्यांनी हुकली. 12 वर्षं, 10 महिने आणि 12 दिवसांचा असताना त्याने हा किताब जिंकला.

इटलीतल्या ऑस्टिसी शहरात ग्रेडाईन ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या फायनल पूर्वीच प्रज्ञानंद आवश्यक ते एलो गुण मिळवले आणि ग्रँडमास्टर किताब आपल्या नावावर केला.

प्रज्ञानानंद त्याच्या आईसोबत

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, प्रज्ञानानंद त्याच्या आईसोबत

16 वर्षीय इराणी खेळाडू आर्यन घोलामी याचा पराभव करत तो 8 व्या राऊंडमध्ये पोहोचला होता. त्यानंतर त्याने इटालियन ग्रँडमास्टर मोरोनी ल्युका ज्यनिअर यांचा पराभव केला.

हे दोन्ही खेळाडू फिडे (जागतिक बुद्धिबळ संघटना) क्रमवारीत खूपच वरच्या क्रमांकावर असल्यामुळे प्रज्ञानंदला ग्रँडमास्टर किताब मिळाला.

प्रज्ञानंद आणि सध्याचा नंबर वन खेळाडू कार्लसन

फोटो स्रोत, RAMESHBABU/BBC

फोटो कॅप्शन, प्रज्ञानंद आणि सध्याचा नंबर वन खेळाडू कार्लसन

ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी 2 हजार 482 पेक्षा जास्त एलो रेटिंग असलेल्या खेळाडूला हरवावं लागतं. ही कामगिरी प्रज्ञानानंदाने या स्पर्धेत केली.

प्रगल्भ आणि सुहास्य चेहरा

अगदी 13 वर्षांचा होण्यापूर्वीच प्रज्ञानंदने खेळातला एक कसलेला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या आधी युक्रेनचा सर्जेई कारजकिन 12 वर्षं आणि 7 महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर झाला होता.

सर्जेई ग्रँडमास्टर झाला ते वर्षं होतं 2002.

प्रज्ञानंद, त्याची बहीण आणि वडील

फोटो स्रोत, RB RAMESH/BBC

फोटो कॅप्शन, प्रज्ञानंद, त्याची बहीण आणि वडील

प्रज्ञानंदचा आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे त्याचे वडील रमेश बाबू यांच्यामुळे. रमेश बाबू स्वत: पोलिओग्रस्त आहेत.

रमेश बाबू तामिळनाडू सरकारच्या सहकारी बँकेत चेन्नईमध्ये काम करतात. प्रज्ञानंद आणि त्याची मोठी बहीण यांना बुद्धिबळाच्या स्पर्धांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या पत्नी नागालक्ष्मी करतात.

प्रज्ञानंदची बहीण वैशाली सुद्धा बुद्धिबळ खेळते आणि त्याच्याबरोबर इटलीतल्या स्पर्धेत तिनेही भाग घेतला. तिथे दुसऱ्या क्वालिफायर फेरीपर्यंत ती पोहोचली होती.

प्रज्ञानंद खेळताना

फोटो स्रोत, RAMESHBABU/BBC

फोटो कॅप्शन, प्रज्ञानंद चेस खेळताना

घरची आर्थिक परिस्थिती बघता मी प्रज्ञानंदला बुद्धिबळापासून दूर ठेवायचंच ठरवलं होतं. पण, तो 4 वर्षांचा होता तेव्हापासून तो आपल्या बहिणीबरोबर बुद्धिबळ खेळायला लागला,'' असं प्रज्ञानानंदाच्या वडिलांनी बीबीसी तामिळशी बोलताना सांगितलं होतं.

''आपल्या वयाच्या मुलांबरोबर खेळण्यापेक्षा तो बुद्धिबळाच्या पटावरच्या 64 घरांमध्ये जास्त रमायचा.''

"प्रज्ञानंद आणि त्याच्या बहिणीमध्ये 4 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे पहिले धडे त्याने बहिणीकडूनच गिरवले," अशी माहिती प्रज्ञानंदच्या वडिलांनी आम्हाला आणखी माहिती दिली.

असा घडला प्रज्ञानंद

"पोलिओमुळे मला लांबचा प्रवास करता येत नाही. मग माझी पत्नी मुलांबरोबर जाते. दोन्ही मुलांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यामुळे केंद्र सरकार आणि बुद्धिबळ अकॅडमीकडूनही आर्थिक मदत मिळते. त्यामुळे आशियाई स्तरावरच्या स्पर्धा मुलं खेळू शकली.

सुरुवात मात्र सोपी नव्हती. मला कर्ज काढून पैसे उभारावे लागले. पण, माझी गरिबी मुलांच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं वाटायचं," ते बीबीसी तामिळशी बोलताना म्हणाले होते.

प्रज्ञानंद आणि आनंद

फोटो स्रोत, RAMESHBABU/BBC

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रमेश बाबू यांचं कुटुंब चेन्नई शहराच्या सीमेबाहेर राहतं. घरात सगळीकडे मुलांनी जिंकलेले कप आणि पदकं आहेत. 2015मध्ये चेन्नईत आलेल्या पुरात काही कप वाहून गेले.

प्रज्ञानानंदाने 8 वर्षांखालील गटातली जागतिक चॅम्पियनशिप 2013 मध्ये जिंकली. पुढे दोनच वर्षांनी तो 10 वर्षांखालील मुलांच्या गटात विजेता ठरला होता.

5व्या वर्षी स्पर्धेला सुरुवात केलेला प्रज्ञानंद10व्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टर झाला होता. तेव्हा तो वयाने सगळ्यात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर होता.

भारतीय बुद्धिबळ संघाचे कोच आर बी रमेश यांनीही प्रज्ञानंदला मार्गदर्शन केलं आहे.

"आंतरराष्ट्रीय मास्टर झाल्यानंतर पुढचं लक्ष्य होतं ते ग्रँडमास्टर होण्याचं. त्यासाठी काही कठोर नियम आणि अटी असतात. त्यानुसार एलो रेटिंग मिळवणं हे आव्हान होतं. शिवाय 3 प्रकारच्या स्पर्धांसाठी पात्र ठरावं लागतं. तिथे जिंकावं लागतं," ग्रँडमास्टर होण्याचे नियम आर बी रमेश यांनी बीबीसी तामिळला समजावून सांगायला सुरुवात केली.

"त्याने इटलीतली चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. हा पहिला टप्पा होता. तिथे त्याला पहिलं सर्टिफिकिट मिळालं. 2018 मध्ये हेराक्लिऑन स्पर्धेत त्याने दुसरा टप्पाही पूर्ण केला. नंतर इटलीमध्येच ग्रेडाईन स्पर्धा जिंकून तीनही टप्पे त्याने पूर्ण केले," त्याच्या कोचनी सविस्तर माहिती दिली.

प्रज्ञानंदच्या खेळाचं वैशिष्ट्य काय?

या प्रश्नावर कोच यांचं उत्तर होतं, "क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे 3 भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल, तर शेवटही तुम्ही चांगला कराल. प्रज्ञानंदने तेच करून दाखवलं."

ग्रँडमास्टर किताबाचं महत्त्व

"ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. बुद्धिबळ खेळात 2 प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं", असं त्याच्या कोचनी सांगितलं होतं.

"प्रज्ञानानंदाने खेळ सुरू केला तेव्हा त्याला त्याच्या बहिणीला हरवायचं होतं. आता त्याला जागतिक चॅम्पियन व्हायचं आहे. हे खरंच मोठं स्वप्न आहे," असं म्हणताना त्याच्या वडिलांचे डोळेही स्वप्नाळू झाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)