'आशाताई'-दि लास्ट एम्परर', आशाताईंच्या निधनावर प्रंतप्रधान, राज ठाकरेंसह कोण काय म्हणालं?

आशा भोसले

फोटो स्रोत, ANI

वाचन वेळ: 6 मिनिटे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे.

त्यांना शनिवारी (11 एप्रिल) कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं होतं.

ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती बीबीसी मराठीला दिली आहे.

आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या. 'मल्टी ऑरगन फेल्युअर'मुळे त्यांचं निधन झाल्याचं डॉ. समदानी यांनी सांगितलं.

सोमवारी (13 एप्रिल) दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.

राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांनी मराठीत लिहिलंय की, "भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन."

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

फोटो स्रोत, X/Narendra Modi

फोटो कॅप्शन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आशाताईंच्या निधनानंतर आठवणी जागवल्या आहेत.

त्यांनी फेसबुकवर ''आशाताई' -दि लास्ट एम्परर' नावानं एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांचं निधन झालं. मी माझ्या एक दोन भाषणांमध्ये, आणि पुढे एकदा आशाताईंशी झालेल्या संवादात म्हणलं होतं की, लतादीदी आणि तुम्ही म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील, लिओनार्दो द विंची आणि मायकलॅन्जलो आहात."

"लिओनार्दो द विंचीच्या कामाकडे बघताना त्यातील परफेक्शन, कमालीचा आखीव रेखीव पणा, जबरदस्त ठहराव आणि एक सर्रकन जाणवणारी आध्यात्मिक अनुभूती जाणवत राहते. हे सगळं दीदींच्या गाण्यात जाणवत राहतं. सगळं कसं परफेक्ट, आदर्शवत वाटत राहतं.

तर मायकलॅन्जलोच्या कामात नजाकत आहे, आवेग आहे, लडिवाळपणा आणि बंडखोरी पण आहे. कधी कधी त्याची शिल्प त्या दगडातून बाहेर येण्यास आतुर आहेत असं वाटत राहतं. तसंच आशाताईंच्या गाण्यांचं. त्यांच्या गाण्यात ओढ आहे, खेळकरपणा आहे, धिटाई आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडा बेधडकपणा, झुगारून देण्याची तीव्र इच्छा असणारच , ते सगळं आशाताईंच्या गाण्यात जाणवत राहतं."

राज ठाकरे यांनी आशा भोसले यांच्यासमवेतचा फोटो पोस्ट केला आहे.

फोटो स्रोत, Facebook/Raj Thackeray

फोटो कॅप्शन, राज ठाकरे यांनी आशा भोसले यांच्यासमवेतचा फोटो पोस्ट केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, "3 वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे."

"त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली.

आशा भोसले

फोटो स्रोत, X/@Dev_Fadnavis

"आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. 'तोरा मन दर्पण कहलाए' अशा भावपूर्ण गाण्यापासून 'खल्लास'पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला."

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

"मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. 'महाराष्ट्र भूषण'सारखा 'बांगला विभूषण' पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही.

अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन 'अभी ना जाओ छोडकर...' हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि 'पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले', असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही", अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

फिल्म इंडस्ट्रीतून शोक व्यक्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

उदित नारायण यांनी बीबीसी न्यूज हिंदीचे सहयोगी वार्ताहर रवी जैन यांना सांगितलं की, ते लहानपणापासून आशा भोसले यांची गाणी ऐकत आले आहेत. ज्यांनी प्रत्येक उच्चार आणि शैलीवर प्रभुत्व मिळवले होते, अशा एक प्रतिभावान गायिका त्या होत्या.

पुढे ते म्हणाले, "त्यांनी आपल्या गायनाने जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी संगीतविश्वात असा इतिहास घडवला आहे, जो कधीही विसरला जाणार नाही. हे माझे भाग्य आहे की मला त्यांच्यासोबत अनेक गाणी गाण्याची संधी मिळाली."

"आशाजी एक अद्वितीय गायिका होत्या. त्यांनी प्रत्येक गाणे आपल्या अनोख्या शैलीत गायले. त्या एक उत्साही व्यक्ती होत्या आणि त्या आयुष्य पुरेपूर जगल्या. भारतीय चित्रपटसृष्टी आणि गायनविश्वात त्या नेहमीच स्मरणात राहतील. जरी त्या आता या जगात नसल्या तरी, त्या नेहमीच आमच्या हृदयात राहतील," असंही ते म्हणाले.

चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, आशाताईंची ऊर्जेची पातळी अविश्वसनीय होती आणि जेव्हाही त्या रंगमंचावर सादरीकरण करायच्या, तेव्हा त्या सर्वांना थक्क करून सोडायच्या. जेन झीसह सर्व पिढ्यांतील लोक त्यांच्या गाण्यांवर आजही नाचतात.

आशा भोसले

फोटो स्रोत, Getty Images

संगीतकार शंकर महादेवन यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस सर्वात दुःखद आहे.

पुढे ते म्हणाले, "हा आपल्या सर्वांसाठी आणि भारतीय संगीतासाठी एक अत्यंत दुःखद दिवस आहे. आपल्या लाडक्या आशाताई आता आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाही."

"या क्षणी मला जे दुःख आणि भावना जाणवत आहेत, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. एक संगीतकार म्हणून, दीदींचा भक्त म्हणून, एक अत्यंत जवळचा कौटुंबिक मित्र म्हणून आणि त्यांना देवी सरस्वती मानणारा म्हणून, मला खात्री आहे की प्रत्येक भारतीयाचे हृदय तुटलेलं आहे."

जगण्यातील श्रीमंती गमावली - आशिष शेलार

आशा भोसले यांच्या निधनावर मंत्री आशिष शेलार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. एक्सवर त्यांनी आशाजींना पोस्ट करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, "भोगल्या दु:खाचे आनंदी गाणे गाण्याची ताकद असलेल्या, जय शारदे, वागेश्वरी ची प्रार्थना गाणाऱ्या, कॅब्रे, लावणी, भक्ती गीत, ओवी आणि अभंगासह भावगीत, चित्रपट गीत ही विलक्षण ताकदीने गाणाऱ्या, भाषेची बंधने तोडून 20 पेक्षा जास्त भाषेत गाणाऱ्या, स्वतःच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाला लिलया हरवणाऱ्या आणि भाऊबीजेला "सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती अशी अजरामर ओवाळणी गाणाऱ्या आशाताई गेल्या."

पुढे शेलार लिहितात, "माझ्यासाठी तर माझी प्रिय बहिण मी आज गमावली... साक्षात सरस्वतीच्या वीणेची झंकार आज शांत झाली. मला भाऊ म्हणून उदंड प्रेम त्यांनी दिले. मी आज काय गमावले हे शब्दात सांगता येणार नाही...माझ्या जगण्यातील श्रीमंती मात्र आज गमावली..."

आशाताईंनी गाणी अजरामर केली-गडकरी

भारतीय संगीतविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मविभूषण गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली

नितीन गडकरी

फोटो स्रोत, X@@nitin_gadkari

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये गडकरी म्हणतात, "आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर आशाजींनी संगीताच्या क्षितिजावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. नया दौर, तीसरी मंजिल, हरे रामा हरे कृष्णा, उमराव जान यांसह इजाजत आणि रंगीला यांसारख्या काळानुसार बदलणाऱ्या अनेक गाजलेल्या चित्रपटांतील गाणी त्यांनी आपल्या स्वरांनी अजरामर केली. प्लेबॅक गायिका म्हणूनही त्यांनी अनेक संस्मरणीय गाणी दिली.

संगीत क्षेत्रातील त्यांचे 'स्वर' आणि मोलाचे योगदान पिढ्यान्‌पिढ्या स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना धैर्य प्रदान करो. ॐ शांती."

आशाजींनी भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले - पीयूष गोयल

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

त्यांनी एक्सवर लिहिले, "मधुर आवाज आणि अतुलनीय गायनाचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या आशा भोसलेंनी दशकानुदशके भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेले. त्यांचा आवाज म्हणजे केवळ सुरांचा संगम नाही, तर भावनांचे एक असे अव्यक्त बंधन आहे, जे शब्दांत मांडता येणार नाही. त्यांनी गायलेली गाणी कायम अशीच गुंजत राहतील.

हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी, कलाविश्वाशी संबंधित प्रत्येकासाठी आणि लाखो चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे. मी कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. माता सरस्वती त्यांच्या दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती."

आशा भोसले

फोटो स्रोत, J. Quinton/WireImage/Getty

भजन ते कॅबरे, सर्व प्रकारच्या गाण्यांना साजेसा आवाज

8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती.

वयाच्या 90 व्या वर्षापर्यंतही त्यांचं गायन सुरू होतं. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.

रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या कलाकारांसोबत त्यांनी गाणी गायली होती. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीसाठी नामांकन मिळालं होतं.

दिल्लीच्या मदाम तुसाद म्युझियममधील आशा भोसले यांचा पुतळा.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दिल्लीच्या मदाम तुसाद म्युझियममधील आशा भोसले यांचा पुतळा.

आशा भोसले यांनी 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.

संगीत तज्ज्ञ राजीव विजयकर यांच्या मते, "आशा भोसले यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्या काळाबरोबर चालायच्या. फक्त जुन्याच गोष्टी चांगल्या असतात असा हट्ट त्यांनी कधीही धरला नाही. त्यांच्या आवाजात भजनं जेवढी सुरेल वाटतात तेवढाच त्यांचा आवाज कॅबरे सारख्या गाण्यांनाही शोभतो."

"गायनातीव वैविध्य ही त्यांची ताकद आहे आणि त्यामुळेच त्या इथपर्यंत पोहोचल्या. उदाहरणार्थ, 'आगे भी जाने ना तू...' हे गाणं पाहिलं तर, त्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे शिवाय ते एक नाईट क्लब साँगसुद्धा आहे. आशा भोसलेंच्या या गाण्यात विलक्षण वेदना आहेत. नाईट बारमध्ये चित्रित केलेल्या गाण्यात अशा भावना ओतणं हे अवघड काम आहे, जे आशा भोसले यांनी करून दाखवलं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)