समाजात जातीयवाद असल्याचं वास्तव आपण स्वीकारणार की नाही? दलितांवर अत्याचार कोण करतंय?

    • Author, डॉ. अदिति नारायणी पासवान
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

एप्रिल महिना, 'दलित इतिहास महिना' म्हणून साजरा केला जातो. हा महिना आम्हा दलितांना प्रत्येक वर्षी आठवून करून देतो की आपण आपलं अस्तित्वं साजरं करूया. हा जल्लोष, संघर्ष आणि आठवणींचं प्रतीक आहे.

कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेसह जगभरात राहणाऱ्या दलितांना हा महिना एकजुटीची प्रेरणा देतो.

एप्रिल महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता म्हणूनच हे आहे असं नाही. याच महिन्यात जातीव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या अनेक नायकांचा देखील जन्म झाला होता. यामध्ये बाबू जगजीवन राम आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचादेखील समावेश आहे.

4 एप्रिलला भारताच्या स्वांतत्र्या लढ्यातील एक शूर योद्धा, झलकारी बाई यांचा बलिदान दिन देखील असतो.

दलित समाजातील लोक नेहमीच जातीव्यवस्थेत बाजूला सारले जातात. त्यांची दखल घेतली जात नाही. मुख्य प्रवाहातील शब्दप्रयोग, वाकप्रचार आणि उत्सवांमध्ये दलितांची अवहेलना केली जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शेवटी येणाऱ्या पिढ्यांच्या आठवणींच्या पटलावरून देखील त्यांना पुसून टाकलं जातं.

एप्रिल महिना आम्हाला एक अशी संधी उपलब्ध करून देतो की ज्याद्वारे आम्ही आमच्या पूर्वजांच्या समृद्ध वारशाची आठवण करू शकू, त्याला उजाळा देऊ शकू.

दलित समाजाचं नेहमीच दमन करणाऱ्या आणि त्यांचं शोषण करणाऱ्या जातीव्यवस्थेच्या विरोधात आमच्या या पूर्वजांनी जो लढा दिला आणि जे बलिदान दिलं आहे, त्याचं स्मरण करण्याची संधी यातून मिळते. त्यांच्या या योगदानाचा आम्ही या महिन्यात सन्मान करतो.

दलितांनी केलेल्या संघर्षाचा प्रदीर्घ इतिहास

1757 मध्ये दुसाधोंनी मुघल बादशाह विरुद्ध लढलेली आणि त्यांचा पराभव केलेली प्लासीची लढाई असो की 1857 चा स्वातंत्र्यासाठीचा उठाव असो, त्यात दलितांचं मोठं योगदान आहे. झलकारी बाईंपासून मंगू राम आणि ऊदा देवींपर्यंत किती लोकांबद्दल, त्यांच्या कर्तबगारीबद्दल तुम्हाला माहित असतं?

इतिहासात अशा असंख्य घटना, कहाण्या आहेत, ज्यातील दलितांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून राष्ट्र उभारणीपर्यंतच्या अनेक गोष्टींमधील दलितांच्या योगदानाची दखलच घेण्यात आलेली नाही किंवा ते पुसून टाकण्यात आलं आहे.

मात्र दलितांचा रोजच्या जगण्याचा संघर्ष हाच त्यांचा सर्वात मोठा संघर्ष आहे. दलितांनी हा लढा पाण्यासाठी, अस्पृश्यतेपासून सुटका करून घेण्यासाठी, परिश्रमासाठी मानसन्मान मिळवण्यासाठी, मंदिरात प्रवेशासाठी दिला आहे. मात्र, शतकानुशतकं आमच्या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही, असा दावा मी करणार नाही.

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आपल्या संस्कृतीत जी मूल्य रुजलेली आहेत, काळानुरुप बदलण्याचं आपल्या धर्माचं जे वैशिष्ट्यं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्यघटनेत सामाजिक न्यायाचा जो पाया घालण्यात आला आहे, या सर्व गोष्टींमुळे समाजात आम्हालाही भागीदारी मिळेल, संधी मिळेल आम्हालाही स्थान मिळेल याची खातरजमा झाली आहे.

बदलांच्या पार्श्वभूमीवर जातीयवादावर चर्चा

आजच्या काळात जात ही आमच्या रोजच्या बोलण्याचा भाग बनत चालली आहे. आपल्या अवतीभोवती जातीवरून होत असलेल्या चर्चांमुळे जातींबद्दलचं विचारमंथन आणि त्याबद्दलची संवेदनशीलता वाढली आहे.

इतकंच काय बॉलीवूडच्या पात्रांमध्येही बदल होताना दिसत आहेत. 'लगान' सारख्या चित्रपटात 'कचरा' हे पात्र दाखवण्यात आलं होतं.

मात्र, आज बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये दलित पात्रांची मांडणी करताना ती पात्रं अधिक लढवय्यी, बुद्धिमान आणि सक्षम माणूस म्हणून दाखवली जात आहेत.

'चक्रव्यूह', 'मांझी द माउंटन मॅन', 'सैराट', 'दहाड', 'जय भीम', 'कांतारा' आणि 'कटहल' सारखे चित्रपट या बदलाची उदाहरणं आहेत.

असं असताना, मी दररोज उच्च वर्णीय-सधन वर्गातील अशा लोकांना तोंड देत असते, जे या गोष्टीवर भर देत असतात की, जातीयवाद ही काही मोठी सामाजिक समस्या नाही. कारण त्यांच्या दृष्टीकोनातून समाजातून जातीवर आधारित भेदभाव संपला आहे.

मात्र, जेव्हा विवाहाची वेळ येते तेव्हा ते त्यांच्याच जातीतील जोडीदाराचा शोध घेऊ लागतात. इंग्रजी वृत्तपत्रात वधू-वर सूचक जाहिरातींचे कॉलम जातीनुसार वेगवेगळे असतात.

लोक फक्त त्यांच्याच जातीतील वर किंवा वधू शोधतात. ही तीच माणसं असतात जी म्हणतात की, आम्ही जातीच्या आधारे भेदभाव करत नाही.

अशी मूलभूत स्वरुपाची विसंगती मला विचार करण्यास भाग पाडते की, एखाद्याला त्याच्या जातीच्या आधारे भेदभावाला तोंड द्यावं लागत नाही, हा दावा लोक इतक्या बेजबाबदारपणे कसा काय करतात.

ते म्हणतात की, त्यांच्या कुटुंबात त्यांनी कधीही कोणाला जातपात मानताना किंवा जातीयवादी वर्तन करताना पाहिलेलं नाही.

मिथकं तयार करण्याचे प्रयत्न

याव्यतिरिक्त जात आणि त्याच्या ऐतिहासिक मूळांबद्दल नवीन कहाण्या तयार केल्या जात आहेत. जातीची नवीन व्याख्या करण्यासाठी धर्मशास्त्रांपासून, जात शब्दाच्या उत्पत्तीचा इतिहास शोधला जातो आहे.

वर्ण आणि जात यामधील फरक दाखवण्यासाठी असंख्य पुस्तकं लिहिली गेली आहेत. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीच्या जगात जात शब्दाबद्दलच्या विचित्र आकलनाच्या माहितीचा खच पडला आहे.

ही बाब उघड आहे की, इंग्रजीमधील 'कास्ट' हा शब्द पोर्तुगीज भाषेतील 'कॅस्टस' या शब्दापासून तयार झाला आहे. याच गोष्टीचा चतुरपणे वापर करून असं म्हटलं जातं की, जात ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. इंग्रजांनी भारतावरील त्यांची पकड घट्ट करण्यासाठी या गोष्टीचा वापर केला होता.

तसं तर, या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल मी कोणताही प्रश्न उपस्थित करत नाही आणि ही गोष्टदेखील नाकारत नाही की, परकीयांनी या गोष्टीचा गैरवापर केला. मला सर्वाधिक वेदनादायी वाटणारी गोष्ट म्हणजे दलितांची सद्यस्थिती.

आज आपली ताकद दाखवण्यासाठी कोण दलितांवर बलात्कार करतं आहे? आजच्या समाज व्यवस्थेत दलितांचं स्थान काय आहे?

आम्हाला आमची ऐतिहासिक भूमिका पुन्हा मिळवायची आहे. जेणेकरून भविष्यात आम्हाला सन्मानानं जगता येईल.

असे अनेकजण आहेत, ज्यांना पूर्ण खात्री आहे की देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव नाही. ते असं सांगायला अजिबात विसरत नाहीत की, त्यांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांना दलितांशी चांगलं वागताना पाहिलं आहे.

मला मात्र पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीसाठी देखील माझ्या समुदायाला शतकानुशतकं करावा लागलेला संघर्ष चांगलाच आठवतो.

मात्र अनेकदा त्यांचे हे दावे ऐकून मन थकून जातं, सुन्न होऊन जातं की देशात आता जातीच्या आधारे भेदभाव होत नाही.

जेव्हा कोणीही असं म्हणतं की, त्यानं जातीयवाद पाहिलेला नाही, तेव्हा या गोष्टीची नक्कीच शक्यता असते की त्या व्यक्तीचा जन्म उच्च वर्णीय-सधन कुटुंबात झाला असेल.

दलितांचं दु:ख त्यांना काय कळणार?

अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो की, ज्या माणसानं कधीही जातीच्या नावावर होणारा अन्याय, त्रास अनुभवलेला नाही, त्या माणसाला आमच्या कित्येक पिढ्यांचं दु:ख, वेदना कशा काय कळणार?

तुम्ही दलितांना असं म्हणू द्या की, त्यांनी जातीयवादाचं दु:ख सहन केलेलं नाही. जे पीडित आणि शोषित आहेत, त्यांना असं म्हणू द्या की, त्यांच्या दु:खाचा, समस्यांचा शेवट झाला आहे.

जर एखाद्या व्यक्तीनं जातीयवादाचा त्रास सहन केला नसेल तर हे त्याचं सुदैवं आहे. मात्र ही वस्तुस्थिती नाही की प्रत्यक्षात समाजात जातीयवाद नाही. समाजातील वास्तवाबद्दलचा हा अनभिज्ञपणा किंवा गाफीलपणा खूप वेदना देतो.

जातीयवादाच्या गोष्टी ऐकून आणि विशेषकरून, जेव्हा एक दलित महिला म्हणून मी माझे अनुभव सांगते, तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर जे आश्चर्याचे भाव येतात, त्यातून त्यांच्या अडाणीपणाची, वास्तवाची जाणीव नसण्याची साक्ष मिळत असते.

त्यांचा बालिशपणा, बेजबाबदारपणा, आमच्या संघर्षाला अधोगतीकडे ढकलतो. आज जेव्हा आम्ही आमचे अनुभव सांगतो, तेव्हा आम्हाला अशी जाणीव करून दिली जाते की हे सर्व आरक्षण मिळावं म्हणून सांगत असतो.

आरक्षण ही काही भीक नाही आणि जुन्या कृत्यांबद्दलचं प्रायश्चित देखील नाही. ज्या समानतेसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता आणि ज्याच्यासाठी आजदेखील आम्ही संघर्ष करत आहोत, ती समानता मिळवण्यासाठी आणि त्या दिशेनं वाटचाल करण्यासाठीचा तो आमचा अधिकार आहे.

आज परकीय शक्ती आपला देशात नाही, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता आपल्या देशात असं कोणी म्हणू शकत नाही की त्याचा जातीव्यवस्थेवर विश्वास आहे किंवा त्याचं वर्तन जातीयवादी आहे.

मग हे सर्व कोण करतं आहे?

अशा वेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण होतात की मग कोण दलित मुलींवर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळत आहे? गटारी, ड्रेनेजची साफसफाई करताना दलित का मरत आहेत? घोड्यावर चढण्यासाठी आज देखील गोळी का मारली जाते आहे?

आजसुद्धा मिशा ठेवल्या म्हणून दलितांची हत्या का होते आहे? आजदेखील शक्तीप्रदर्शन करण्यासाठीची गोष्ट म्हणून दलिताच्या शरीराकडे सार्वजनिक व्यासपीठ म्हणून का पाहिलं जातं? हे अत्याचार कोण करतं आहे?

उदाहरणांद्वारे मी स्वत:ला पीडित म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र प्रश्न आहे की हे सर्व कोण करतं आहे? नेहमी ऐकलं जातं की अमुक अमुक दलित नेता सत्तेला हपापलेला आहे.

नक्कीच, आम्हाला सत्तेच्या केंद्रस्थानी राहायचं आहे. शतकानुशतकं आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. आता आम्हालादेखील सत्तेत सहभागी व्हायचं आहे.

आम्हाला एक असं नेटवर्क, एक अशी इकोसिस्टम, व्यवस्था बनवायची आहे, जिथे अॅमेझॉनमध्ये काम करणारे, सिएटलमध्ये राहणारे लोक आम्हाला देखील ओळखत असावेत, जेणेकरून ते आमचा बायोडाटा पुढे देऊ शकतील.

आम्हाला देखील केंब्रिजमध्ये राहण्यांबरोबर आमची ओळख वाढवायची आहे. ज्यामुळे करियरमध्ये पुढे जाण्यासाठी ते आमची मदत करू शकतील.

या सर्व गोष्टींपासून आम्हाला वंचित ठेवलं गेलं आहे. आता आम्हाला हे सर्व हवं आहे आणि आमचा हा अधिकार भक्कमपणे मांडण्याचा निर्धार देखील आमच्याकडे आहे.

दलित इतिहास महिन्यात हे मान्य करूया की आपण सर्व जातीयवादी आहोत. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या रुपात जातीयवादी असतो. जातीव्यवस्था आमच्या अंतरंगात भिनलेली आहे.

एक संस्थात्मक व्यवस्था म्हणून जातीची मूळं खोलवर रुजलेली आहेत, हे वास्तव जर आपण मान्य करणार नसू, तर मग बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सोशल मीडियाच्या पोस्टवर लिहिणं निरर्थक आहे.

सर्वात आधी आपल्याला हे मान्य करावं लागेल की जातीचं असित्वं आहे, जातव्यवस्था अस्तित्वात आहे. हे वास्तव स्वीकारावं लागेल, त्याबद्दल संवेदनशील व्हावं लागेल. त्यानंतरच आपण स्वत:ला जातीच्या बंधनातून, जोखडातून स्वंतत्र करण्याची चर्चा सुरू करू शकतो.

(लेखिका दिल्ली विद्यापीठात शिकवतात. लेखात मांडलेले मुद्दे हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.

बीबीसी हिंदीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हा लेख प्रकाशित केला होता. या लेखातील मुद्दे अजूनही प्रासंगिक असल्यामुळे आम्ही हा लेख प्रसिद्ध करत आहोत.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)