मान्सून कुठवर पोहोचला? कुठे पडणार पाऊस?

मान्सून कुठंवर पोहोचला?

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

मान्सून आमच्या गावात कधी येणार? पाऊस कधी बरसणार? तुमच्यापैकी अनेकांनी असे प्रश्न विचारले आहेत. कारण एरवी दहा जूनपर्यंत मुंबईत पोहोचणारा मान्सून यंदा थोडा संथ गतीनं वाटचाल करतो आहे. मान्सून कुठवर पोहोचला आहे, तो कधी आणि कुठे आगेकूच करेल? तोवर तुमच्या जिल्ह्यातलं वातावरण कसं असेल, जाणून घेऊयात.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आज 9 जून रोजी ईशान्य भारतातली सगळी राज्य आणि सिक्कीम व्यापलं असून, पश्चिम बंगालच्या उत्तर भागातही आगेकूच केली आहे. महाराष्ट्रात मान्सूनच्या सीमेत काही बदल झालेला नाही. राज्यात हर्णे आणि सोलापूरमधून मान्सूनची उत्तरी सीमा जाते आहे.

सध्या कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर ढगांचं आवरण दिसून येतंय. खाली किनारी भागात दाट ढग जमा झालेले दिसतायत. या परिसरात विशेषतः कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार सरी बरसल्या आहेत.

पुढच्या चोवीस तासांतही कोकणात, विशेषतः दक्षिण भागात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इथे तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसतील.

तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, वीजा आणि गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. 14 तारखेच्या आसपास कोकणात पावसाचा जोर आणखी वाढू शकतो.

मान्सून कुठंवर पोहोचला?

फोटो स्रोत, Getty Images

तापमान कसं राहील?

सध्या विदर्भात आणि उत्तर कोकणातील मुंबई ठाणे, पालघर परिसरात मात्र उष्ण आणि दमट हवामान आहे. विदर्भात कमाल तापमान अजूनही 42 ते 45 अंशांच्या आसपास आहे.

मान्सूनचं लांबणीवर पडलेलं आगमन आणि मान्सूनपूर्व सरींचा अभाव, यांमुळे या प्रदेशांत रात्रीचं किमान तापमानही जास्त राहण्याची शक्यता आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

जिल्हानिहाय कसा असेल अंदाज?

पालघर जिल्ह्यात 9 आणि 10 जून रोजी उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. 9 जून रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. तर उत्तर कोकणातील जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागात तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडरस्टॉर्म्स म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यासह वीजा आणि पावसाची शक्यता असल्यानं यलो अलर्ट आहे.

10 जून रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये वीजा, सोसाट्याचा वारा आणि गडगडाटासाठी यलो अलर्ट आहे. इथे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही, पण उत्तर भारतात पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश तसंच जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. उत्तर भारतात 11 आणि 12 जून रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सोसाट्याचा वारा आणि मध्यम पावसाचीही शक्यता आहे.

हवामानाविषयीचे अपडेट्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.

राज्यात किमान 15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

मान्सून कुठंवर पोहोचला?

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)